Shivrajyabhishek Day Special 2021: हुंकार सार्वभौमत्वाचा, स्वाभिमानाचा!

१६७४ साली तिथीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. तारीख होती ६ जून, तारखेने आज राज्याभिषेक दिन. त्या अगोदर हिंदू राजे नव्हते असे नाही. तथापि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा त्या पेक्षा आगळा. याचे कारण ते राजेपद केवळ नावापुरते नव्हते आणि मुख्य म्हणजे मोघलांचे मांडलिकत्व अमान्य करणारे होते; त्यात सार्वभौमत्वाचा अभिमान होता. त्यामुळेच शिवराज्याभिषेकाचे मोल अन्य कोणत्याही घटनेला येणार नाही.

  राहुल गोखले

  १६७४ साली तिथीने ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. तारीख होती ६ जून, तारखेने आज राज्याभिषेक दिन. त्या अगोदर हिंदू राजे नव्हते असे नाही. तथापि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा त्या पेक्षा आगळा. याचे कारण ते राजेपद केवळ नावापुरते नव्हते आणि मुख्य म्हणजे मोघलांचे मांडलिकत्व अमान्य करणारे होते; त्यात सार्वभौमत्वाचा अभिमान होता. त्यामुळेच शिवराज्याभिषेकाचे मोल अन्य कोणत्याही घटनेला येणार नाही.

  रयतेचा राज्यकर्ता होणे ही सहजसाध्य बाब नव्हे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श राजवटीचे महत्व किती अनन्यसाधारण होते याची जाणीव होते. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक अपूर्व घटना होती. राजपूत राजे असोत; किंवा गोवळकोंडा अथवा विजापूर सारखी राज्ये असोत; ती जरी राज्ये असली तरी ती स्वतंत्र म्हणता येतील अशा स्वरूपाची मुळीच नव्हती. राजपूत राजांना तर वारसाहक्काने राजेपद मिळण्याची मुभाही नव्हती.

  किंबहुना राजाचे निधन झाले तर त्याच्या वारसाला ते राज्य हे वंशपरंपरेने मिळत नसे; उलट मोघल सम्राटाकडून रितसर मान्यता मिळवावी लगे. ते राज्य त्या राजाचे किती आणि मोघलांच्या मर्जीवर चालणारे किती याचा अंदाज यावरून यावा. सेतुमाधवराव पगडी यांनी आपल्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे: ‘गादीवर येण्याची वारसाला मान्यता मिळाल्यावर राजाची नेमणूक एखाद्या मनसबीवर करण्यात येत असे. याचा अर्थ असा की आवश्यक असेल तेव्हा त्या राजाला आपल्या राज्याबाहेर साम्राज्यात कोठेही नोकरी करावी लागे.

  कधी राजांच्या बदल्या किल्ल्यांचे किल्लेदार म्हणून; कधी लष्करी ठाण्याचे ठाणेदार म्हणून तर कधी दुय्यम सेनापती म्हणून तर कधी सेनापती म्हणून होत’. या सगळ्याचा अर्थ एकच होता की हे सगळे जरी राजे असले तरी ते नामधारी होते आणि त्यांना स्वायतत्ता नव्हती. अशांकडे बघण्याची दृष्टी हे देखील मग काहीशी दुय्यमतेचीच राहणार यात नवल नाही. शिवाजी महाराजांनी रूढ पद्धतीनुसार आपले राज्य असूनही मोघलांचे मांडलिकत्व मान्य केले असते तरी ते राजे ठरलेच असते. तथापि येथेच त्यांच्या युगप्रवर्तकतेचा प्रत्यय येतो. भारतात भारतीयांचे स्वतंत्र राज्य नसावे हे अशोभनीय.

  यात स्व-तंत्र ही संकल्पना महत्वाची. ते राज्य कोणाही सम्राटाच्या मर्जीने चालणार नाही किंवा हे राज्य कोणाचेही बटीक होणार नाही; तर ते ‘स्व-तंत्र’ असेल ही त्यातील ऊर्मी महत्वाची. तेंव्हा आपले हे ‘स्व-तंत्र’ घोषित करणे हे गरजेचे होते आणि त्यातूनच राज्याभिषेक करण्याचा विचार पुढे आला आणि बळावला.

  शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक वैदिक पद्धतीने करण्यात आला. काशीहून आलेल्या गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली तो सोहळा झाला. या सोहळ्यात कोणतेकोणते संस्कार करायचे यासाठी त्यांनी एक पुस्तकच सिद्ध केले होते. या राज्याभिषेकाचे किती अभूतपूर्व कौतुक शिवाजी महाराजांच्या रयतेला होते. त्याचा प्रत्यय कृष्णाजी अनंत सभासद यांनी केलेल्या वर्णनावरून येऊ शकतो. सभासद यांनी लिहिलेली बखर प्रसिद्ध आहे आणि शिवचरित्राविषयीचा तो अतिशय महत्वाचा दस्तावेज मानला जातो.

  राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन करून नंतर ते जे लिहितात ते त्या सोहळ्याचे खरे मर्म. ते लिहितात: ‘.. येणेप्रमाणे राजे सिंहासनारूढ जाले .. या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंछ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही’. येथे म्लेंछ या शब्दाचा अर्थ धर्मवाचक घेतला नाही तरी बिगरभारतीय असा घेणे आवश्यक. तेंव्हा भारतात भारतीय राजा होणे ही अभूतपूर्व आणि असामान्य घटना होती. राजधानी म्हणून रायगडाची निवड करणे हाही किती अचूक निर्णय होता याचा अंदाज ब्रिटिशांचा वकील हेन्री ऑक्झेनडन याने केलेल्या वर्णनावरून येऊ शकेल:

  रायगडाच्या डोंगराचा रस्ता इतका अवघड आणि धोक्याचा असा असूनही हत्ती वगैरे इतक्या वर कसे आणण्यात आले असतील याचे आम्हाला कोडे पडले’. तेंव्हा राज्याभिषेक हा केवळ स्वतःला राजा म्हणून घोषित करण्यापुरता केलेला उपचार नव्हता. आपली राजधानी सुरक्षित असावी येथपासून आपला कारभार यापुढे स्वतंत्र असेल याचा स्वाभिमानी उद्गोष त्यात होता. त्यामुळेच राज्याभिषेक करून घेण्याबरोबरच शिवाजी महाराजांनी जे परिवर्तन कारभारात केले ते तितकेच महत्वाचे आणि मूलभूत.

  शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरु केला. याचाच अर्थ राज्याभिषेक ही घटना म्हणजे एक मन्वंतर होते असाच संदेश शिवाजी महाराजांनी त्यातून दिला. याच शकाला पुढे शिवशक म्हटले जाऊ लागले तरी शिवाजी महाराजांनी स्वतःचे नाव नव्या शकाला दिले नव्हते याचे स्मरण येथे ठेवले पाहिजे. ‘हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा’ असे जेंव्हा शिवाजी महाराज म्हणतात तेंव्हा त्या भावनेचे प्रतिबिंब त्यांच्या या आणि प्रत्येक कृतीत पडलेले दिसते.

  फार्सी भाषेचे इतके आक्रमण झाले होते की ते तसेच चालू ठेवून स्वराज्याची कल्पना करणे शिवाजी महाराजांना संयुक्तिक वाटणे शक्यच नव्हते. मात्र केवळ एखाद्या आक्रमणाविषयी चिंता वाटून चालत नसते; ते आक्रमण निष्प्रभ करायचे तर तितकाच समर्थ पर्याय उभा करावा लागतो. शिवाजी महाराजांनी फार्सीचे हे आक्रमण रोखण्यासाठी अतिशय मूलभूत कार्याला चालना दिली.

  प्रतिशब्दांचा राज्यव्यवहारकोश सिद्ध करण्याची आज्ञा शिवाजी महाराजांनी पंडित रघुनाथपंतांस केली. राजपत्रलेखनाविषयी नवीन नियम बनविले. भाषेबरोबर व्यवहारात येणाऱ्या नाण्यांत देखील ‘स्वतंत्रता’ आणण्यासाठी शिवाजी महाराजांनी आपल्या मुद्रेची सुवर्णाची आणि तांब्याची नाणी पाडून घेतली. स्वतंत्र मुद्रेची त्यांनी योजना केली.

  वास्तविक शिवाजी महाराजांनी स्वराज्य आपल्या पराक्रमातूनच निर्माण केलेले होते. तथापि तरीही त्याला कायदेशीर दर्जा देणे गरजेचे होते ते दोन दृष्टींनी. एक तर मोघलांच्या अधिपत्याखालील अन्य राज्यांप्रमाणे हे राज्य नाही याची द्वाही फिरविणे गरजेचे होते; पण त्यापेक्षाही स्वकीयांच्या सर्व शंकांचे निरसन करून त्यांच्या मनात स्वराज्याविषयी जाज्वल्य अभिमान जागृत करणे आवश्यक होते. त्यासाठी राज्याभिषेक आणि मुख्य म्हणजे स्वतंत्र कारभार गरजेचा होता.

  शिवाजी महाराजांनी कारभाराचे तंत्र हे ‘स्व-तंत्र’ केले. भाषा, चलन, मुद्रा, पत्रव्यवहार या सगळ्यात स्वतंत्रता आणि स्वत्व आले की पारदास्याचे जू झुगारून देण्याची उर्मी आपोआप जागृत होत असते. रयतेत हा स्वाभिमान जागृत करण्यासाठी आणि तो स्थायी करण्यासाठी म्हणून हा राज्याभिषेकाचा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतला होता. तो किती अचूक होता याचा प्रत्यय त्यांच्या महानिर्वाणानंतर देखील आला.

  एरव्ही नेतृत्वाअभावी साम्राज्ये कोसळतात. पण शिवाजी महाराजांनी जी स्वराज्यांकांक्षा रयतेत निर्माण केली त्यामुळे पुढची सत्तावीस वर्षे संघर्ष करूनही औरंगजेब हिंदवी स्वराज्याला धक्का लावू शकला नाही. एवढेच नव्हे तर महाराष्ट्रातच त्याचा अंत झाला. शिवराज्याभिषेकाचा दुसरा दूरगामी परिणाम असा झाला की मोघलांचे देशव्यापी साम्राज्य तर कालांतराने लयास गेलेच; पण अन्य राजांना देखील अशा राज्याभिषेकाची प्रेरणा मिळाली.

  बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याने १६७८ मध्ये राज्याभिषेक करून घेतला. तेंव्हा शिवराज्याभिषेक ही केवळ अन्य घटनांप्रमाणे एक ऐतिहासिक घटना नव्हे तर इतिहासाला कलाटणी देणारी घटना आहे. स्वावलंबन, सार्वभौमत्व, स्वाभिमान, स्वातंत्र्य या मूल्यांच्या उद्घोषात त्या घटनेचे मर्म होते. राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करताना या मर्माचे स्मरण ठेवणे आवश्यक.

  Shivrajyabhishek Day Special 2021 The roar of sovereignty of self respect