सिंगल स्क्रीन थिएटर्स- भवितव्य अंधरात

सत्तरच्या दशकात देशात साडेबारा हजार अशी सिंगल स्क्रीन थिएटर्स होती. आणि त्या काळात त्यात अतिशय हाऊसफुल्ल गर्दीत अनेक चित्रपट चालले. पण ऐंशीच्या दशकात रंगीत दूरदर्शन व व्हिडिओ आला आणि या थिएटर्सना गळती लागली. नव्वदच्या दशकात उपग्रह वाहिन्यांचे पेव फुटले. मग दशकभरात मल्टीप्लेक्सचे युग आले, असे करता करता आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट रिलीज होऊ लागले आणि ही संख्या कमी कमी होत गेली. सध्या देशभरात साडेसहा हजार सिंगल स्क्रीन थिएटर्स आहेत आणि त्यांचीही संख्या आणखीन रोडावत जाण्याची शक्यता आहे.

  दिलीप ठाकूर

  बरोब्बर वर्षभरापूर्वी याच दिवसात गिरगावातील सेन्ट्रल प्लाझा थिएटर ( मूळचे सेन्ट्रल) बंद होत असल्याचे वृत्त आले. थोड्याच दिवसात भायखळा स्टेशनबाहेरील पॅलेस सिनेमा थिएटरही बंद होत असल्याचे वृत्त आले. ते होतेय न होतेय तोच ग्रॅन्ट रोड परिसरातील ड्रीमलॅन्ड थिएटरही बंद झाले असे वृत्त आले. हळूहळू लक्षात आले की एकूणच देशभरातील अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे यांची बंद होत असल्याकडे वाटचाल सुरु आहे.

  मुंबईतील जुन्या सिंगल स्क्रीनवर फोकस टाकताना ही घसरण लक्षात येईलच. दक्षिण मुंबईतील कुलाब्याच्या स्ट्रॅण्ड थिएटर, क्रॉफर्ड मार्केटच्या रेडिओ या थिएटर्सपासून दहिसरच्या राजश्री तसेच मुलुंडच्या मेहुल थिएटर्सपर्यंत अनेक थिएटर होती. त्यातही सत्तर, ऐंशी आणि नव्वदच्या दशकात मेन थिएटर कल्चर होते.

  जुन्या पिढीला नक्कीच माहीत असेल. त्या काळात अनेक फिल्म दीवाने प्रेक्षक या थिएटरचे कायमच पडद्याच्या अगदी जवळचे म्हणजे ‘स्टॉलचे हुकमी पब्लिक ‘ होते, याचे कारण म्हणजे खिशात मोजून तेवढेच पैसे असत. ग्रॅन्ट रोड परिसरातील सुपर थिएटरपर्यंत राजेश खन्ना आणि नंदाची भूमिका असलेल्या रवि नगाईच दिग्दर्शित ‘द ट्रेन ‘ ( १९७०) या चित्रपटाच्या वेळी स्टॉलचे तिकीट दर पंचाहत्तर पैसे असे होते. आज यातील एकेक थिएटर बंद होताना दिसतेय. आणि राहताहेत केवळ आठवणी.

  सगळ्यात पहिले बंद पडल्याने गाजलेले थिएटर म्हणजे मॅजेस्टिक सिनेमा! १९७२ ला ते बंद पडल्याची मोठी आठवण आहे. गिरगावातील अनेकानी आपल्या कुटुंबासोबत येथे अनेक मराठी आणि हिंदी पौराणिक चित्रपट पाहिले. त्या काळात थिएटर डेकोरेशन पाह्यला जायचं जबरा फॅड होते आणि त्यात मॅजेस्टिक हुकमी. तेव्हाचे गिरगाव म्हणजे मराठी माणसाचा हुकमी बालेकिल्ला. त्यामुळे मॅजेस्टिक थिएटरमध्ये अगणित मराठी चित्रपट रिलीज झाले.

  वाट चुकलेले नवरे, पाठलाग, दाम करी काम, मुंबईचा जावई, घरकुल, अशीच एक रात्र होती, सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव येथेच रिलीज झाले. येथे मोठ्या प्रमाणावर हिंदी पौराणिक चित्रपटही रिलीज होत. येथे रिलीज झालेला शेवटचा चित्रपट होता, ‘सती सावित्री ‘) त्याच वर्षी बेलॉर्ड पियरचे रेक्स थिएटर बंद पडले.

  या थिएटरचा शेवटचा चित्रपट मोहन सैगल दिग्दर्शित ‘राजा जानी ‘ ( धर्मेंद्र आणि हेमा मालिनी) हा आहे. त्याच आसपास क्रॉफर्ड मार्केटचे रेडिओ नावाचे थिएटर बंद पडले आणि तेथेच मनिष मार्केट उभे राहिले. चर्चगेटला आकाशवाणी इमारतीत त्याच नावाचे थिएटर होते. तेथे ऐशीच्या दशकात विधु विनोद चोप्राचा ‘सजा ए मौत ‘ नावाचा चित्रपट पाहिला. वेगळ्या प्रवाहातील चित्रपटांसाठी हे परफेक्ट असलेले थिएटर ऐंशीच्या दशकातच बंद पडले.

  आज मराठी आणि हिंदी चित्रपटात खूपच विविधता आली असताना ‘आकाशवाणी ‘ थिएटर उपयुक्त ठरले असते. महत्वाचे म्हणजे राजेश खन्ना आणि मग अमिताभ बच्चनच्या क्रेझमध्ये दक्षिण मुंबईतील अनेक सिंगल स्क्रीनचे थिएटर अनेक आठवडे हाऊसफुल्ल असत. पण एकेक करत अनेक थिएटर बंद होत गेली.

  कुलाब्याचे स्ट्रॅण्ड, कॅपिटॉल, जवळचेच न्यू एम्पायर, ऑपेरा हाऊस ( लहानपणी येथे ‘दो रास्ते ‘ सर्वात वरच्या बाल्कनीतून पाहिला. तेव्हापासून ‘दोन बाल्कनी ‘चे थिएटर हेच डोक्यात बसले. याचे थिएटर डेकोरेशन पाहण्यातही मजा असे. १९९४ ला येथील चित्रपट रिलीज थांबले. त्यानंतर येथे नवीन चित्रपटांचे शूटिंग होऊ लागले. दिग्दर्शक एन. चंद्रा यांनी ‘वजूद ‘ची नाना पाटेकर आणि माधुरी दीक्षित यांच्यावरील महत्वाची दृश्ये येथेच चित्रीत केली. काही वर्षांपूर्वी नूतनीकरण करुन पुन्हा सुरु करताना मामी चित्रपट महोत्सव तसेच नाटकाला प्राधान्य आहे), नाझ ( थिएटर आणि इमारत अशा दोन गोष्टी . इमारतीत लहान मोठ्या वितरकांची कार्यालये. ‘सिनेमा चालतो म्हणजे काय आणि पडतो म्हणजे कसा ‘ याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करण्यासाठीचा हा स्पॉट. चित्रपटसृष्टीचे मार्केट. हिंदी चित्रपटाच्या अनेक टॉपच्या ड्रिस्ट्रीब्युटर्सची ऑफिसेस.

  ती देखील कालांतराने एकेक करत बंद पडली आणि एकूणच या परिसरात शांतता पसरली. ती भयावह आहे. याच नाझ थिएटरमध्ये तिसरी मंझिल, वक्त, आप की कसम, यादो की बारात, लोफर, हम किसीसे कम नही, संतान हे चित्रपट खणखणीत रौप्यमहोत्सवी यशस्वी ठरले). स्वस्तिक ( बाल्कनी नसलेले थिएटर अशीच ओळख. जुने अनेक चित्रपट येथे मॅटीनी शोला देव आनंद, शम्मी कपूरचे जुने म्युझिकल हिट चित्रपट एकेका आठवड्यासाठी येत. आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळे. मूळचे हे पाथे नावाचे थिएटर. ते पाडून स्वस्तिक थिएटर उभे राहिले ), नॉव्हेल्टी ( याची स्टॉलची तिकीटे शोच्या पंधरा मिनिटे अगोदर सुरु होत आणि त्यासाठी कार पार्किंगमध्ये एका टोकाला अगदी दोन तास अगोदरपासूनच हिट सिनेमासाठी रांग लावायची सवय अनेकांनी लावून घेतली.

  राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचा सामना रंगलेला ‘नमक हराम ‘ येथेच ज्युबिली हिट झाला. तर राज कपूरचा बहुचर्चित आणि बहुखर्चित ‘मेरा नाम जोकर’ येथेच सुपर फ्लॉप ठरला. ), अप्सरा ( यात शिरताच बाल्कनीकडे जाण्याचा रस्ता आणि त्याखालचे पाणी लक्ष वेधून घेई, मूळचे लॅमिन्टन नावाचे थिएटर पाडून त्या जागी भव्य आलिशान असे अप्सरा थिएटर उभे राहिले आणि राज कपूर अभिनित, निर्मित आणि दिग्दर्शित ‘संगम ‘ या दोन मध्यंतर असलेल्या पहिल्या चित्रपटाने याचे १९६४ साली यशस्वी उदघाटन झाले.), मिनर्व्हा ( ‘शोले ‘वाले थिएटर अशी कायमस्वरुपी ओळख आहे.

  जुने मिनर्व्हा पाडून नवीन बांधले. ‘शोले ‘च्या दिवसात कधीही जावे तर ॲडव्हान्स बुकिंगचा चार्ट बराचसा फुल्ल आणि भली मोठी रांग हे ठरलेले दिसे. सत्तरच्या दशकात हेदेखील आवर्जून पाहणारा वर्ग होता. कालांतराने मिनर्व्हाची इमारत पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे, पण तेथून जाताना गब्बरसिंगची दहशत आजही जाणवते.), डायना ( ताडदेवच्या या थिएटरमध्ये कायमच रिपीट रनला पिक्चर लागत. रिपिट रन म्हणजे एकादा चित्रपट दोन तीन वर्षांनंतर पुन्हा रिलीज करणे.)

  गंगा आणि जमुना ( मीनाकुमारी, राजेश खन्ना आणि मुमताज यांच्या भूमिका असलेल्या ‘दुश्मन ‘ या चित्रपटाने या जुळ्या थिएटरचे उदघाटन झाले. या थिएटर्समध्ये मॅटीनी शोला राजश्री प्रॉडक्शन्सच्या दुल्हन वही जो पिया मन भाये, अखियों के झराखो से या चित्रपटांनी सुवर्ण महोत्सवी यश संपादले.) आणि सेन्ट्रल (चित्रपती व्ही. शांताराम यांच्या ‘पिंजरा ‘ या चित्रपटाने येथेच ज्युबिली हिट यश प्राप्त केले.) सेन्ट्रल थिएटरचे कालांतराने सेन्ट्रल प्लाझा झाले. ही सगळी बंद पडत गेलेली थिएटर्स. कुलाब्याचे डिफेन्स थिएटरही बंद पडले. आता दक्षिण मुंबईतील जुन्या थिएटर्समध्ये न्यू एक्सलसियर, स्टर्लिंग (वर्षानुवर्षे पूर्णपणे इंग्रजी चित्रपटाच्या या थिएटरमध्ये अलिकडे मराठी चित्रपट रिलीज होऊ लागले आणि अर्थात प्रेक्षक नाहीत. आणि आपणच म्हणायचे, मराठी माणूस मराठी चित्रपट पाहत नाहीत. वाईट वाटतं. स्टर्लिंग थिएटरला कधीच मराठी चित्रपटाचे वळण नव्हते हे लक्षात घ्यायला हवे.)

  प्रत्येक सिंगल स्क्रीन थिएटरची आपली स्वतंत्र ओळख असते आणि प्रेक्षकांची सवय असते ही दीर्घकालीन परंपरा आहे. स्टर्लिंग म्हटलं की विदेशी चित्रपट, इतकं सोपं आहे. इरॉस, लिबर्टी ( हम आपके है कौनने येथे शंभर आठवड्यांचा मुक्काम केला), रिगल, मेट्रो ( जुन्या मेट्रोच्या अगणित आठवणी, आता ते मल्टीप्लेक्स केले. फार पूर्वी याच साहेबी थाट असलेल्या मेट्रो थिएटरमध्ये जाताना गिरगावातील मराठी माणसाला काहीसा संकोच वाटे.

  कालांतराने त्याचे मल्टीप्लेक्समध्ये रुपांतर केल्यावर तेथे अधिक प्रमाणात मराठी चित्रपट रिलीज होऊ लागले ), रॉक्सी ( जुने पाडून दोन तीनदा नवीन बांधले. राजेश खन्नाचे येथे एकूण नऊ चित्रपट प्रदर्शित झाले. ), इम्पिरियल ( या थिएटरला शंभरपेक्षा जास्त वर्षे झालीत. या थिएटरमध्ये १९५१ साली मा. भगवानदादांच्या ‘अलबेला ‘या म्युझिकल हिट चित्रपटाला रसिकांचा असा काही उत्फूर्त प्रतिसाद मिळाला की भोली सुरत दिल के खोटे, शाम ढले खिडकी तले या लोकप्रिय गाण्यांचा वेळी प्रेक्षक पडद्यावर पैसे उडवत. येथेच ‘जंजीर ‘ सुपर हिट ठरला आणि अमिताभ बच्चन नावाचे ॲग्री यंग मॅन प्रतिमेचे वादळ निर्माण झाले ) शालिमार, सुपर, अलंकार आणि मराठा मंदिर इतकीच थिएटर आज सुरु आहेत.

  एकेकाळी चित्रपट जगताचे थिएटर हे वैभव होते. सुरु असलेल्यातील काही बंद झालीच तर अनेकांना नक्कीच वाईट. यातील एकाद्या थिएटरचा डोअरकिपर अथवा बाहेरचा ब्लॅकमार्केटमध्ये तिकीट विकणारा मला ओळखतो याचा त्या काळात अनेकांना कायमच अभिमान वाटे. नवीन चित्रपटात दम आहे का, तो पब्लिकला आवडतोय की नाही याचा खरा रिपोर्ट याच ब्लॅकमार्केटवाल्यांकडे आणि थिएटरबाहेरच्या फेरीवाल्यांकडे असे. ते थिएटर, त्यातील चित्रपट आणि प्रेक्षकांची आवडनिवड यांच्याशी अतिशय उत्तम रितीने जोडले गेलेले असत ही महत्वाची गोष्ट दुर्दैवाने कायमच दुर्लक्षित राहिली.

  आज एकेक थिएटर बंद होताना याच थिएटरमध्ये पाहिलेल्या चित्रपटाची तर झालेच पण अगदी तिकीट कसे मिळवले यापासूनच्या आठवणी अनेकांना येतात. काही जणांनी तर अशा जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सची तिकीटे जपलीत. त्यांच्यासाठी तो आठवणीचा ठेवा आहे. हे सत्तरच्या दशकातील प्रेक्षकांचे खास वैशिष्ट्य होते. त्यांना त्यात विशेष आनंद मिळे. पूर्वी तर या थिएटरबाहेर अवघ्या एक आण्यात सिनेमाच्या गाण्यांचे पुस्तक विकणारा असे.

  दक्षिण मुंबईतील अशी एकेक करत अनेक थिएटर बंद होत गेली आणि प्रत्येक वेळी मिडियात ‘एका दिवसाची बातमी झाली ‘ तर अगणित चित्रपट रसिकांनी त्या थिएटरमध्ये पूर्वी पाहिलेल्या चित्रपटाच्या आठवणी काढल्या. दक्षिण मध्य मुंबईतील अशीच काही जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद पडली. वरळीचे लोटस बंद झाले. तर पिला हाऊस परिसरातील रॉयल, दौलत, ताज ही थिएटर बंद होत गेली. बहुचर्चित असे अलेक्झांड्रा थिएटरही बंद झाले. तेथे इंग्रजी चित्रपट गंमतीदार हिंदी नामकरणाने रिलीज होत. काळा चौकीचे गणेश, डिलाईट रोडवरचे प्रकाश, वरळीची सत्यम, सचिनम, सुंदरम, प्रभादेवीचे किस्मत, दादरच्या पूर्वेची ब्रॉडवे, चित्रा आणि शारदा तर माहिमची बादल, बरखा आणि बिजली बंद होऊन त्या जागी स्टार सिटी आले इतकेच.

  जस जसे आपण मुंबईत पुढे सरकतोय तस तशी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स बंद होत गेल्याचे दिसेल. आणि असाच जर आपण अन्य शहरांचा विचार केला तर? तर संख्या निश्चितच वाढत वाढत जाईल. मल्टीप्लेक्सच्या आगमनानंतर जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सना वेगाने गळती लागली, ग्लोबल युगातील रसिकांना चित्रपटगृहे चकाचक आकर्षक असावी असे वाटू लागले आणि ओटीटी प्लॅटफॉर्मने त्यात बरीच भर पडली.

  विशेषतः लॉकडाऊनच्या काळात सगळ्यांनाच घरबसल्या मालिका, गेम शो, रिॲलिटी शो, वेबसिरिज, अनेक भाषांतील चित्रपट पाहायची सवय वाढत गेली आणि या मोठ्या सांस्कृतिक सामाजिक स्थित्यंतराचा अतिशय मोठा तडाखा या जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सना बसला. दुर्दैवाने या गळतीची अथवा घसरणीची फारशी कुठेही दखल घेतली जात नाही आणि त्याला सहानुभूतीही मिळत नाही.