अडकलेले आयुष्य…

लॉकडाऊन सुरू झाल्यावर आपण घरी आहोत आणि सुरक्षित आहेत या आनंदापेक्षा आपण घरात ‘अडकलो’ आहेत असाच सूर अगदी पहिल्या दोन-चार दिवसातच ऐकू येऊ लागला. मोठी मंडळी असे बोलू लागल्यावर

 लॉकडाऊन सुरू झाल्यावर आपण घरी आहोत आणि सुरक्षित आहेत या आनंदापेक्षा आपण घरात ‘अडकलो’ आहेत असाच सूर अगदी पहिल्या दोन-चार दिवसातच ऐकू येऊ लागला.  मोठी मंडळी असे बोलू लागल्यावर मुलांचे फावले तर नवल ते काय!  शाळा नाही, परीक्षा नाही आणि बाहेर जाऊन खेळताही येणार नाही म्हटल्यावर टिव्ही/मोबाईलखेरीज इतर काही करमणूक असूच शकत नाही असा सोईस्कर समज मुलांनी करून घेतला.  

मुलांना टिव्ही/मोबाईलच्या पलिकडे करमणुकीची काही साधने असतात हेच माहित नाही याची जबाबदारी कोणाची?  घरातल्या माणसांच्या आवाजापेक्षा टिव्ही/मोबाईलचा आवाज ऐकतच ही पिढी लहानाची मोठी होत आहे.  खेळण्यांनी खेळण्याच्या वयात मुले टिव्ही/मोबाईलसमोर बसलेली असतात आणि ‘गाणी-नाच बघितल्याशिवाय जेवतच नाहीत’ हे वाक्य कौतुकाने सांगताना आपण पालक म्हणून खूप कमी पडतो आहोत हे या मंडळींच्या लक्षातही येत नाही. 

आपण स्वत: मुलांशी खेळत-बोलत राहिलो की मुलांना या सगळ्याची गरज भासत नाही.  लहानपणापासून मुलांना त्यांच्या वयाला योग्य असणारी पुस्तके वाचायला (पुस्तकातील चित्र बघणे हे देखील वाचनच असते) दिली, काहीतरी रंगवायला दिले, त्यांच्या हातात खरी खरी खेळणी (मोबाईल गेम्स नव्हे) दिली की मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास विधायक पद्धतीने व्हायला मदत होते.  पण मुळात प्रश्न हा आहे की पालक या सगळ्याचा गांभीर्याने विचार करतात का?  मूल म्हणजे काही वेळ घालवण्याचे साधन नसते- ती पूर्ण वेळ जबाबदारी असते.  नोकरीमुळे वेळ मिळत नाही हे कितीही खरे असले तरी जी जबाबदारी आपण स्वीकारली आहे तिला न्याय देणे देखील आवश्यक आहे आणि कामवाली बाई किंवा टिव्ही/मोबाईलसारख्या वस्तूंकडे त्यांचे पालकत्व देणे योग्य नाही.   

मूल जेवत/झोपत/ऐकत नाही, सारखे रडत आहे…कारण काही असो- रामबाण इलाज एकच… टिव्ही लावा नाहीतर हातात मोबाईल द्या!!  याचे गंभीर परिणाम किती वेळा आपल्या समोर आले?  काही वर्षांपूर्वी ब्ल्यू व्हेल चॅलेंज नावाच्या एका मोबाईल गेममुळे कितीतरी जणांनी आपले जीव गमावले.  आता टिकटॉक/पब्जीने तरुण पिढीला वेड लावले आहे.  आईने टिव्ही बंद केला म्हणून चौदा वर्षाच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. पौगंडावस्थेतील मुलांमध्ये भावनिक चढ-उतार होत असतात.  पालकांनी अतिशय समजूतदारपणे त्याकडे बघितले पाहिजे.  ‘आम्हाला कोणी समजून घेतले होते?’ हे किंवा यासारखी वाक्ये तोंडावर फेकून आजच्या सुशिक्षित पालकांची सुटका होणार नाही.   

लहानपणापासूनच पालक-मुलांमध्ये संवाद होत असला की आपले मूल नक्की कशाप्रकारे विचार करते, त्याची संगत कशी आहे, एखादी गोष्ट त्याच्या गळी उतरवायची असेल तर काय करावे लागते हे समजून घेणे फार अवघड नसते आणि यासाठी पालकांकडे शैक्षणिक पात्रता असण्याची देखील गरज नसते.  

उठता लाथ-बसता बुक्कीचा काळ गेला आणि पालक-मुलांमध्ये मैत्रीचे नाते असले पाहिजे अशा चर्चा रंगायला लागल्या.  पण कोवळ्या वयातल्या मुलांना शिस्त लावणे, त्यांना चांगले-वाईट काय आहे त्याची ओळख करुन देणे, नात्यांचा आब राखायला शिकवणे, निसर्गातून जे सहज शिकता येऊ शकते त्या संधी मुलांना उलगडून दाखवणे हे मैत्रीच्या नात्याने नाही तर पालक म्हणून, मोठी-अनुभवी व्यक्ती म्हणून जाणीवपूर्वक करण्याच्या गोष्टी आहेत.  पूर्वी म्हटले जायचे तसे- बापाची चप्पल पोराच्या पायात आली की मग मैत्री!!  

लॉकडाऊनच्या निमित्ताने मुलांना शाळा किंवा इतर कोणतीही ‘आवश्यक’ व्यवधाने नसताना घरातल्या कामात सहभागी करून घेऊन सहज-सोप्या पद्धतीने जीवनावश्यक कौशल्ये शिकविण्याची आयती संधी पालकांकडे होती.  पण पालक स्वत:च घरातल्या कामांनी/घरात बसून कंटाळत असतील, टिव्ही, मोबाईल, फोनवरच्या गप्पा याखेरीज इतर काही करत नसतील तर मुलांनी आदर्श घ्यायचा तो कोणाचा?  मोबाईल ही खेळण्याची वस्तू नसून कामाची वस्तू आहे हे आज किती पालक मुलांना सांगतात?  ते स्वत: तसे वागतात का?  इतकी महागाची वस्तू मुलांना ‘खेळ’ म्हणून देता येत असेल तर भारताची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे, असे म्हणावे लागेल कारण स्वत:ला गरीब घोषित करुन सगळ्या सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या घरांमधील चित्र फारसे वेगळे नाही.  

या काळात मुलांना टिव्ही/ मोबाईल नसताना स्वत:ला कसे रमवता येऊ शकते हे शिकवता येऊ शकले असते.  पण त्यासाठी मुळात पालकांना ते माहित आहे का हा खरा प्रश्न आहे.  ‘जे जे आपल्याला लहानपणी मिळाले नाही ते ते सर्व मुलांना द्यायचे’ या अट्टाहासापोटी पालकांनी मुलांना स्वत:चा वेळ सोडून पैशांनी विकत घेता येऊ शकणा-या गोष्टी द्यायला सुरुवात केली.  याचा परिणाम म्हणून मुलांमध्ये एकलकोंडेपणा, हट्टीपणा, स्वार्थीपणा, संकुचित वृत्ती आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येऊ लागले आहे.  आई/आजी ओरडली, बाबा/आजोबा रागावले तर पूर्वीची मुले चिडून कट्टी घ्यायची, एक वेळ उपाशी राहायची, काही मुले आदळ-आपट करायची आणि मग थोड्यावेळाने कोणीतरी समजूत काढली की तो विषय संपून जायचा.  गेल्या काही वर्षात पालकांचा ‘नकार’ पचवता न येऊन बारा-तेरा वर्षांच्या मुलांनी आत्महत्या केल्याच्या किती घटना घडल्या?  वाद संपायच्या ऐवजी मूल/नातेच संपण्याचा प्रवास हे प्रगतीचे लक्षण नक्कीच नाही.  हे सगळे बघितल्यावर पालकांचे शिक्षण, गलेलठ्ठ पगाराच्या नोक-या, हॉटेल्सशी स्पर्धा करणारी घरांची रचना, भरमसाठ शुल्क आकारणाऱ्या शाळेत जाणारी मुले, ‘प्रोजेक्ट्स’ वर भर देऊन (म्हणजे आई-वडीलांच्या खिशात हात घालून आणि त्यांच्याच बुद्धीमत्तेची परीक्षा घेऊन) शिकविणाऱ्या शाळा या सगळ्याचा आणि तारतम्याचा काही संबंध आहे की नाही असा प्रश्न पडतो.

एकीकडे ‘स्क्रीन टाईम’ वर चर्चा तर दुसरीकडे ‘ऑनलाईन शाळा’, एकीकडे मुलांची मानसिकता/ त्यांचे भावविश्व यावर चर्चासत्रे तर दुसरीकडे कोवळ्या वयात आवश्यक-अनावश्यक सगळ्याच विषयांचा खुला बाजार!  आपल्या पाच वर्षांच्या मुलांच्या तोंडून आपल्याला शिवराळ भाषा ऐकायची नसेल तर आपण काय केले पाहिजे हे पालकांनाच शिकवावे लागते आहे, यासारखे दुर्दैव नाही.  शब्दांचा वापर अतिशय जबाबदारीने केला गेला पाहिजे याचे भान आज मोठ्यांना तरी कुठे आहे?  आपल्या शब्दांचा/कृतीचा आपणच आदर केला गेला पाहिजे आणि त्याची जबाबदारी देखील घेतली पाहिजे हे एका ठराविक वयात आल्यावर एका वाक्यात सांगण्याचे शहाणपण नाही.  घरातल्या मोठ्यांच्या वागण्या-बोलण्यातून हे संस्कार लहानपणापासूनच मुलांवर जाणीवपूर्वक बिंबवले गेले तर असतील तर छोटे-मोठे नकार, अपयश, दुःख पचविण्याची ताकद मुलांमध्ये नक्की येते.  ‘सॉरी’ म्हणून प्रमाणिकपणे आपली चूक मान्य करणे, कमीपणा घेणे आणि वेळ मारुन नेण्यासाठी ‘सॉरी’ म्हणणे यातला फरक आपल्या वागण्या-कृतीतून मुलांना समजावता आला पाहिजे.  

सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरातील लोकांशी ‘बोलणाऱ्या’ मंडळींना घरातल्या लहान-मोठया नातेवाईकांशी गप्पा मारता येत नसतील, फेसबुकवरची   चॅलेंजेस स्वीकारणाऱ्यांना आयुष्यातील लहान-मोठ्या आव्हानांना सामोरे जाता येत नसेल? सुसंस्कृत समाज, माणुसकी या सगळ्या गोष्टी आपल्यापासून सुरू होतात याची पक्की खूणगाठ जर आपण आपल्या मनाशी बांधली, अर्थहीन स्पर्धा टाळली तर या विश्वातल्या प्रत्येक सजीव-निर्जीव गोष्टींचा मान ठेवण्याची जाणीव आपल्यात निर्माण होऊ शकेल.  ही जाणीवच आपल्या मुलांमध्येही झिरपणार आहे.  खरेतर आपण घरांमध्ये नाही तर चुकीच्या कल्पनांमध्ये अडकलो आहोत. गरज आहे ती सजग असण्याची आणि थोडे थांबून विचार करण्याची.   

   (या लेखाच्या  लेखिका विशेष प्रशिक्षिका आहेत.)

   अमिता कुलकर्णी

    anaquami@gmail.com