ऐसा व्यंगचित्रकार पुन्हा होणे नाही!

आज २३ जानेवारी अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. बाळासाहेबांचे खास वैशिष्ट्य म्हणजे एक व्यंगचित्रकार म्हणून तर ते अव्वळ आहेतच. पण ते एक वक्ता, नेता म्हणूनही थोर आहेत. एक संपादक म्हणूनही ते अव्वळ होते. बाळासाहेबांची व्यंगचित्रे म्हणजे ब्रशचे फटकारे !

भरत सावंत, व्यंगचित्रकार, खोपोली 

बाळासाहेब ठाकरे, सिर्फ नाम ही काफी है. मुळात व्यंगचित्रकार असलेल्या बाळासाहेबांचे अनेक पैलू जीवनात पहायला मिळाले. ते एक महान अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. व्यंगचित्रकार ते शिवसेनाप्रमुख हा बाळासाहेबांचा प्रवास संघर्षात्मक, आव्हानात्मक आणि प्रेरणादायी असा आहे.

माझ्याबाबत बोलायचे झाले तर बाळासाहेबांच्या प्रभावी, आकर्षक आणि सडेतोड व्यंगचित्रांमुळेच मी व्यंगचित्रकलेकडे आकृष्ट झालो. व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे हेच माझे या क्षेत्रातील गुरूवर्य आहेत. त्यामुळेच माझे व्यंगचित्रांचे पहिले पुस्तक ‘व्यंग कॉर्नर’ हे त्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करताना मला विशेष आनंद झाला.

आज २३ जानेवारी अर्थात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती. बाळासाहेबांचे खास वैशिष्ट्य म्हणजे एक व्यंगचित्रकार म्हणून तर ते अव्वळ आहेतच. पण ते एक वक्ता, नेता म्हणूनही थोर आहेत. एक संपादक म्हणूनही ते अव्वळ होते. बाळासाहेबांची व्यंगचित्रे म्हणजे ब्रशचे फटकारे ! त्यांची अनेक व्यंगचित्रे देश-विदेशात प्रसिध्द झाली आणि गाजलीही. मोजक्याच शब्दांत जास्तीत जास्त अर्थ सांगणारे व्यंगचित्र कसे असावे हे बाळासाहेबांकडून शिकण्यासारखे आहे. त्यांचे ‘नाकी नऊ आले’ हे इंदेरांजींविषयीचे व्यंगचित्र याचाच एक उत्तम आहे. त्यांचे अँनॉटमीकडे (शरीरशास्त्र ) बारीक लक्ष असायचे.

बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांत प्रामुख्याने दिसणारा गुणधर्म म्हणजे त्यांचा निर्भिडपणा व हजरजबाबीपणा. सामाजिक, राजकीय व्यंगचित्र रेखाटताना त्यांनी प्रखरपणे वाईट बाबींवर हल्ले चढविले. महाराष्ट्रात बिनधास्त व बेडरपणे राजकीय व्यंगचित्रे रेखाटणारे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे हेच होते. त्यांच्या या बिनधास्त व्यंगचित्रकारितेतून मार्मिकचा जन्म झाला.

मार्मिकमधून पुढे शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेनेने दैनिक सामनाची निर्मिती केली. अशा रितीने मार्मिक, शिवसेना व सामना हे बाळासाहेबांचे त्रिशूळ बनले. या त्रिशूळाने महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात आपले एक वेगळेच अस्तित्व निर्माण केले आहे.

या व्यंगचित्रकाराने १९९५ मध्ये आपल्या विचारांचा मुख्यमंत्री महाराष्ट्राला दिला आणि आता तर दस्तुरखुद्द व्यंगचित्रकारांचे सुपुत्र मा. उध्दवजी ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. एका व्यंगचित्रकाराचा सुपुत्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाल्याबद्दल एक व्यंगचित्रकार म्हणून मला सार्थ अभिमान आहे.

बाळासाहेबांनी म्हटले आहे की आज आम्ही जे काही आहोत ते व्यंगचित्रकलेमुळेच आहोत. आमच्या हाती कुंचला नसता तर आज राजकारणात, समाजात आम्ही ज्या शिखरावर जाऊन पोहोचलो आहोत ते शिखर आम्हाला कधीच गाठता आले नसते.

१९९२ मध्ये बाळासाहेबांना भेटण्याचा योग मला आला. त्यावेळी मी नवोदित व्यंगचित्रकार होतो. मी सोबत नेलेली सर्व व्यंगचित्रे त्यांनी तत्परतेने आणि आत्मियतेने पाहिली. जेथे दुरुस्ती आवश्यक वाटली त्यांमध्ये काही सूचना केल्या. तसेच व्यंगचित्रे रेखाटताना प्रामुख्याने काय टाळावे हे समजावून सांगितले.

बाळासाहेबांच्या या मार्गदर्शनाचा आजही मी क्रणी आहे. ते एक महान व्यंगचित्रकार होते आणि व्यंगचित्रकारांबद्दल त्यांना आत्मियता होती. शिवसेना या पक्षाची रचना व मराठी माणसावर असलेली खोल पकड हा चर्चेचाच नव्हे तर कुतुहलाचा विषय होतो. मुंबई-महाराष्ट्रात शिवसेना हवीच असे आपुलकीने बोलणारे अनेकजण सापडतात. मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी एका व्यंगचित्रकाराने बनवलेली आणि आपल्या परिश्रमाने वाढवलेली शिवसेना आज देशातील प्रमुख पक्षांमध्ये मोडते.

लोकनेता तथा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या व्यंगचित्रकारांचा महाराष्ट्रातील तथा देशातील राजकारणात एक आदरयुक्त दराराच राहिला. बाळासाहेबांची व्यंगचित्रे ही पहातच रहावी अशी होती तर त्यांचे भाषण सुरू झाले तर ते ऐकवतच रहावे असे मंत्रमुग्ध असायचे आणि दैनिक सामनामधील त्यांचे संपादकीय वाचायला लागलो तर संपूर्ण वाचल्याशिवाय थांबवत नव्हते.

अशी विविध बाबतीत अव्वळ शैली क्वचितच एखाद्याच्या नशिबी येते आणि त्यातीलच एक अव्वल व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे ! म्हणूनच म्हणावेसे वाटते – ऐसा व्यंगचित्रकार पुन्हा होणे नाही !!