श्रीमंतीचा ‘सौंदर्य’थाट !

कामगिरी बजावण्यासाठी वय हा निकष नसतो आणि इच्छाशक्ती असणाऱ्यांना आपण स्त्री आहोत हा अडथळा वाटत नाही. फाल्गुनी नायर हे त्याचं मूर्तिमंत उदाहरण. सौंदर्य प्रसाधन निर्मिती क्षेत्रात नामांकित म्हणून गणना होणारी 'नायका' कंपनी शेयर बाजारात दाखल झाली आणि कंपनीच्या शेयरच्या भावाने तब्बल ऐंशी टक्के उसळी घेतली. या उसळीमुळे या कंपनीचे नेतृत्व करणाऱ्या फाल्गुनी नायर यांच्या संपत्तीचे मूल्य साडे सहा अब्ज डॉलर इतके झाले आणि त्याने नायर यांच्या शिरपेचात सर्वांत श्रीमंत भारतीय महिला होण्याचा तुरा खोवला गेला.

    राहूल गोखले, मुंबई : श्रीमंत भारतीय महिला होण्याचा हा टप्पा, फाल्गुनी नायर यांच्या व्यावसायिक म्हणून केलेल्या प्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे यात शंका नाही. शिवाय हे शिखर गाठण्यासाठी नायर यांना केवळ नऊ वर्षे लागली. भारतातील सर्वाधिक वीस श्रीमंत व्यक्तींच्या यादीत देखील आता नायर यांचे नाव झळकले आहे.

    ‘नायका’ नावाचे सौंदर्य प्रसाधनांच्या विक्रीचे ‘स्टार्ट अप’ सुरु करावे हे नायर यांनी निश्चित केले ते २०१२ साली. वास्तविक त्यावेळी त्या वयाच्या पन्नाशीच्या उंबरठ्यावर होत्या. त्यांच्याकडे वीसेक वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव गाठीशी होता हे खरे; पण स्टार्ट अप सुरु करण्याची जोखीम घेणे हे निराळे असते. १९६३ साली मुंबईत एका गुजराती कुटुंबात जन्मलेल्या फाल्गुनी नायर यांनी मुंबईच्या सिडनहॅम महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आणि पदव्युत्तर शिक्षण अहमदाबाद येथील ‘आयआयएम’सारख्या प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संस्थेतून घेतले. एका नामांकित अकौंटिंग ‘फर्म’ मध्ये सल्लागार म्हणून नायर यांनी १९८५ साली काम सुरु केले आणि तेथे आठ वर्षे काम केल्यानंतर त्या कोटक महिंद्र या कंपनीत रुजू झाल्या. तेथे त्या १९ वर्षे कार्यरत होत्या; त्यापैकी सात वर्षे त्या तेथे व्यवस्थापकीय संचालकपदी होत्या. २०१२ साली त्यांनी तेथून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नायर यांना बहुधा स्वतंत्र व्यवसाय करण्याची प्रेरणा आपल्या वडिलांकडून मिळाली असावी कारण त्यांचे वडील उद्योजक होते आणि त्यांची ‘बेयरिंग’ उत्पादन करण्याची कंपनी होती. अर्थात आपण स्वतःचा व्यवसाय सुरु करावा हे नायर यांना वाटू लागले तेंव्हा त्यांचे वय पन्नाशीला पोहचले होते.

    सामान्यतः व्यवसाय सुरु करायचा तर कर्ज घेतले जाते किंवा बाजारातून पैसा उभा करण्यात येतो. पण नायर यांनी स्वीकारलेला पर्याय भिन्न होता. फाल्गुनी नायर यांचे पती संजय हेही एका नामांकित खासगी इक्विटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. दोघेही गुंतवणूक बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ असल्याने पैसा कुठे आणि कसा गुंतवावा याचे ज्ञान त्यांना होतेच आणि म्हणूनच त्या दोघांनी आपल्या स्वतःच्या पैशाने हे स्टार्ट अप सुरु केले. सौंदर्य प्रसाधनांची बाजारपेठ प्रचंड आहे हे खरे; पण सर्वसाधारणपणे या वस्तूंची खरेदी करण्यासाठी ग्राहक आपल्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये जाऊन खरेदी करणे पसंत करीत. त्यात उणीव अशी होती की जरी सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असली तरी ग्राहकांना पर्याय मर्यादित उपलब्ध होते. अनेकदा तर बाजारात कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत याची माहिती देखील नसे. तेंव्हा ग्राहकांना सौंदर्य प्रसाधने ‘ऑनलाईन’ खरेदी करता यावी या उद्देशाने हे स्टार्टअप नायर यांनी सुरु केले.

    या ऑनलाईन प्रारूपाचा आधार होता तो वेगवेगळ्या ब्रँडची सौंदर्य प्रसाधने ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचे. साहजिकच त्यांचा साठा असणे आवश्यक. तरच ग्राहकांनी खरेदी नोंदविली की त्यांना ते लगेच मिळू शकते. मात्र हे सगळे जुळवून आणणे हे तितके सोपे नाही. ग्राहकांना त्यापूर्वी ऐकलेही नसलेले आंतरराष्ट्रीय ब्रँड ‘नायका’च्या वेबसाईटवर पाहता येऊ लागले. संस्कृतमधील ‘नायिका’ या शब्दावरून नायर यांनी ‘नायका’ हे नाव आपल्या स्टार्टअपसाठी निवडले हेही येथे नमूद करावयास हवे. नायर यांनी निवडलेला व्यवसायाचा पर्याय किती अचूक होता हे लवकरच सिद्ध झाले. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय अशा जवळपास तीनशे ‘ब्रँड’ ची उत्पादने ‘नायका’ वरून विकली जाऊ लागली. मात्र ब्रँड जरी आंतरराष्ट्रीय होते तरी भारतीयांची पसंती लक्षात घेऊन या उत्पादनांची निवड करण्यात आली होती. नेलपॉलिश पासून लिपस्टिकपर्यंत असंख्य रंगांच्या छटांचे पर्याय ग्राहकांना मिळू लागले. बॉलिवूडमधील अभिनेते, सेलेब्रिटी यांच्या व्हिडियोच्या माध्यमातून ग्राहकांना आकृष्ट करण्यात नायर यांना यश आले. अर्थात जेव्हा उद्योग आपल्या प्रारंभीच्या टप्प्यात असतो तेव्हा उलाढाल कमी असते आणि उद्योगाला गती असते; पण जसजसा उद्योग वाढू लागतो तसतशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज भासू लागते. ज्याला ‘स्केल अप’ किंवा उद्योगाचा विस्तार म्हणतात ती पायरी महत्वाची असते. नायर यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, ‘सुरुवातीला एका व्यक्तीची दैनंदिन कामांचे व्यवस्थापन पाहण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती; पण दिवसभरात तीस एक ‘ऑर्डर’ मार्गी लावताना देखील त्या व्यक्तीची दमछाक होऊ लागली आणि त्या व्यक्तीने ‘नायका’ला रामराम ठोकला’. मात्र हा धडाही होता आणि आलेल्या ‘ऑर्डर’ ची पूर्तता कशी करायची; त्याची संगणकीय व्यवस्था कशी लावायची हे सगळे निकडीचे झाले. नायर यांनी ते केले आणि हा हा म्हणता ‘नायका’ सौंदर्य प्रसाधनांच्या ग्राहकांच्या पसंतीस उतरले.

    या प्रतिसादाचे प्रमाण आकड्यांत सांगायचे तर ‘नायका’ ला दर महिन्यात सुमारे एक कोटी ग्राहक भेट देतात. त्यापैकी निम्मे हे नवीन ग्राहक असतात. याचाच अर्थ उर्वरित निम्मे ग्राहक हे पुन्हा खरेदीसाठी आलेले असतात. ग्राहकाला सेवा देणे हा खर्च असतो आणि नव्या ग्राहकांचे रूपांतर कायमच्या ग्राहकांमध्ये झाले की साहजिकच खर्च कमी होतो. हे सगळे गणित नायर दाम्पत्य गुंतवणूक बँकिंग तज्ज्ञ असल्याने त्यांना ठाऊक होतेच. आजवर ‘नायका’ वर वीस लक्ष ग्राहकांनी खरेदी केली आहे असा अंदाज आहे आणि नायर यांचे लक्ष्य तो आकडा लवकरात लवकर कोटीच्या घरात जावा असे आहे. अर्थात हे सगळे व्यवस्थापन संभाळणे आणि ग्राहकांना उत्तम सेवा देणे यासाठी तंत्रज्ञानाची गरज असते. ‘नायका’मध्ये सुमारे साडे तीनशे कर्मचारी आहेत आणि त्यापैकी ८० जण हे तंत्रज्ञानाशी निगडित आहेत आणि त्यातील काही हे आयआयटी सारख्या प्रतिष्ठित संस्थांमधून शिकलेले आहेत. अर्थात या सगळ्यापेक्षाही वरचढ ठरते ती नायर यांची कल्पकता आणि दृष्टी.

    अनेक कंपन्या तंत्रज्ञानाचा वापर करतात; पण लवकरच त्यांना ‘स्वतःच्या’ उत्पादनांचा ब्रँड हवा अशी इच्छा उत्पन्न होते कारण त्यात आर्थिक फायदा अधिक आहे असा त्यांचा होरा असतो. पण नायर यांची याविषयीची मते स्पष्ट होती. ग्राहकांना वेगवेगळ्या ब्रँडच्या सौंदर्य प्रसाधनांचा पर्याय उपलब्ध करून देणारा ऑनलाईन रिटेल क्षेत्रातील व्यवसाय त्यांना सुरु करायचा होता आणि ते प्रारूप अत्यंत यशस्वी ठरले आहे असेच म्हटले पाहिजे. अर्थात स्वतःचे स्थान निर्माण केल्यांनतर आता ‘नायका’ने स्वतःच्या ब्रँडची सौंदर्य प्रसाधने बाजारात आणली आहेतच; शिवाय फॅशन क्षेत्रात पदार्पण केले आहे. आपल्याच गुंतवणुकीवर आधारलेले स्टार्ट अप नायर यांनी २०१२ साली सुरु केले आणि त्याला स्थैर्य येऊ लागले तेंव्हा हे दाम्पत्य गुंतवणूकदारांकडे गेले. गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आणि २०२० साली हे स्टार्ट अप चक्क ‘युनिकॉर्न’च्या पंक्तीत सामील झाले. ज्या स्टार्ट अपचे मूल्य एक अब्ज डॉलर होते त्यांना युनिकोर्न म्हटले जाते हे ध्यानात घेतले तर ‘नायका’ने थोडक्या काळात केवढी मोठी मजल मारली याची कल्पना येऊ शकेल. ऑनलाईन रिटेल बरोबरच प्रत्यक्ष दुकानांची मालिका नायर यांनी सुरु केली आहे. प्रामुख्याने महानगरे सोडून ज्यांना दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीतील शहरे म्हटले जाते ती ‘नायका’चे लक्ष्य आहेत कारण तेथे विस्तारासाठी मोठी संधी आहे.

    २०१२ साली सुरु केलेल्या स्टार्ट अपने आता शेयर बाजारात प्रवेश केला आहे. फाल्गुनी नायर भारतातील सर्वांत श्रीमंत महिला ठरल्या आहेतच; पण अंबानी, अदानी, अझीझ प्रेमजी इत्यादींचा अंतर्भाव असलेल्या वीस सर्वाधिक श्रीमंत भारतीयांच्या यादीत नायर यांना स्थान मिळाले आहे. या सूचीत राहुल बजाज आणि नसली वाडिया यांच्यानंतर सतराव्या क्रमांकावर नायर आहेत. एवढेच नव्हे तर स्टार्ट अपमध्ये संस्थापकांची भागीदारी किती आहे या यादीत आपल्या स्टार्ट अपमध्ये पन्नास टक्के भागीदारी असलेल्या नायर प्रथम स्थानावर आहेत. पेटीएम, झोमॅटो इत्यादी स्टार्ट अपच्या संस्थपकांची त्या त्या स्टार्ट अप मध्ये भागीदारी तुलनेने बरीच कमी आहे. ‘नायका’चा आलेख चढता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या आर्थिक वर्षात ‘नायका’च्या महसुलात ३८ टक्के वाढ झाली आहे आणि निव्वळ नफा देखील सुमारे ६२ कोटींचा झाला आहे. फाल्गुनी नायर यांनी या स्टार्ट अपची सुरुवात करताना आणि तो व्यवसाय चालविताना जी कल्पकता, जिद्द आणि चिकाटी दाखविली त्याचे प्रतिबिंब नायर या सर्वांत श्रीमंत भारतीय महिला ठरण्यात पडले आहे असेच म्हटले पाहिजे.