काँग्रेसचा अध्यक्ष गैरगांधी घराण्याचा हवा, पण तो सक्षमही असला पाहिजे

राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नको यावर प्रियांका गांधीनीही शिक्कामोर्तब केले आहे. आता गैरगांधी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकतो. विरोधकांनी गांधी घराण्यावर शिंतोडे उडविणे बंद करावे. त्यांनी गरम पाण्याची वाफ तोंडातून सोडू नये. प्रियंकांनीही स्पष्ट केले की, काँग्रेसने आपला मार्ग निवडला पाहिजे. गैरगांधी नेत्याला त्या सहर्ष स्वीकारतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राहुल गांधी यांच्यानंतर काँग्रेसचा अध्यक्ष हा गांधी घराण्यातील नको यावर प्रियांका गांधीनीही शिक्कामोर्तब केले आहे. आता गैरगांधी काँग्रेसचा अध्यक्ष होऊ शकतो. विरोधकांनी गांधी घराण्यावर शिंतोडे उडविणे बंद करावे. त्यांनी गरम पाण्याची वाफ तोंडातून सोडू नये. प्रियंकांनीही स्पष्ट केले की, काँग्रेसने आपला मार्ग निवडला पाहिजे. गैरगांधी नेत्याला त्या सहर्ष स्वीकारतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. पक्षध्यक्षांनी उत्तरप्रदेशातून नव्हे तर अंदमान-निकोबारमधून तुम्ही निवडणूक लढा असे जर सांगितले तर त्या निश्चितच तेथूनच निवडणूक लढवतील असेही त्यांनी स्पष्ट केले. राहूल आणि प्रियंकांनी पक्षाध्यक्षाचा भाग अतिशय स्पष्ट केल्यामुळे काँग्रेसी तो कशा स्वरुपात स्वीकारतील हे भविष्यात स्पष्ट होईल. पण, काँग्रेसजणांच्या मते पक्षाला एकरुप ठेवण्याचे काम गांधी कुटुंबीयाशिवाय दुसरा कुणी करु शकेल असे वाटत नाही. जेव्हा-केव्हा काँग्रेस संकटात पडली तेव्हा गांधी घराण्यानेच संकट निवारण्याचे काम पार पाडले. सोनिया गांधी रातोरात काँग्रेसाध्यक्ष झाल्यात. सीताराम केसरी काँग्रेसचा डोलारा सांभाळू शकतील एवढे शक्तिमान नव्हते. सोनिया गांधीना धाव घ्यावी लागली तेव्हा काँग्रेस नाव किनाऱ्यावर लागली. पी.व्ही. नरसिंहराव पंतप्रधान झालेत तेव्हा त्यांनी गांधी कुटुंबीयाला कधी विश्वासात घेतले नव्हते. काँग्रेसाध्यक्ष पदावर विराजमान सीताराम केसरी प्रभावी नव्हतेच. त्यांनी स्वतःच सोनिया गांधींना काँग्रेस वाचविण्यासाठी पुढे यावे अशी हाक दिली. त्यानंतर सोनिया २ दशकापर्यंत काँग्रेसाध्यक्षपदावर राहिल्यात. त्या युपीएच्या चेअरपर्सनही होत्या. २००४ मध्ये मजबूत स्थितीत असताना त्यांनी पंतप्रधानपद नाकारले. मनमोहनसिंग यांना त्यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसविले. सन २००४ व २००९ मध्ये काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकून १० वर्षे सत्तास्थान सांभाळले. 

काँग्रेसजणांनी विचार करावा

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांची प्रकृतीही चांगली नसते. प्रियांका आणि राहुल गांधी यांनी काँग्रेसचा अध्यक्ष गांधी कुटुंबातील नसावा, असे स्पष्ट केले आहे, तेव्हा आता काँग्रेस नेत्यांनी यावर विचार केला पाहिजे. काँग्रेसचे अध्यक्ष कोणीही असले, तरी त्यांना सोनिया, राहुल व प्रियंका गांधी यांचे मार्गदर्शन मिळणारच आहे. 

कित्येक अध्यक्ष गांधी घराण्याचे नव्हते

सन १९५८ नंतर काँग्रेसाध्यक्षपदी यू.एन.ढेबर, निलम संजीव रेड्डी, डी. संजीवैया के. कामराज, एस. निजलिंगाप्पा, ब्रम्हानंद रेड्डी, देवकांत बरुआ, शंकरदयाल शर्मा ही मंडळी होती. ते सर्व गैरगांधी होते. यातून एक गोष्ट समजावी लागेल. गैरगांधी असणे हा एक भाग अन तो सक्षम असणे हा दुसरा भाग आहे. काँग्रेसाध्यक्ष कुणीही असला तरी त्याच्यावर गांधी नेहरु घराण्याची छत्रछाया मात्र असायची. लालबहाद्दूर शास्त्री यांच्या निधनानंतर इंदिरा गांधीना पंतप्रधानपदी बसविणारे काँग्रेसचे अध्यक्ष कामराजच होते. कामराज व डी.पी. मिश्रा यांनी मोरारजी देशाईंसारख्या सिनियर नेत्याला पंतप्रधानपदाच्या खुर्चीजवळ भटकू दिले नाही. मोरारजी देसाई १९६६ मध्ये पंतप्रधान पदापासून वंचित राहिले. १९७७ साली जेव्हा जनता पार्टी आकारास आली तेव्हाच ते पंतप्रधान झालेत. वयाच्या ८१ व्या वर्षी ते पंतप्रधान झाले हे विशेष. 

कार्यसमितीत इंदिराजीसोबत वाद

काँग्रेस कार्यसमितीच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत इंदिरा गांधी यांचे मतभेद झाल्यानंतर काँग्रेस पक्ष दोन गटात विभागल्या गेला होता. काँग्रेस आणि काँग्रेस (आय) असे दोन गट पक्षात पडले होते. काँग्रेस (आय) या गटाला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणुन मान्यता मिळाली. इ.स. १९६९ च्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार एन. संजीव रेड्डी यांच्या विरोधात व्ही. व्ही. गिरी यांना मैदानात उतरविले. मतदारांनी आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐकून मतदान करावे. असे आवाहन त्यावेळी इंदिरा गांधी यांनी मतदारांना केले होते. या निवडणुकीत व्ही. व्ही. गिरी विजय झाल्यामुळे इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाले.