yogi aadityanath

गींच्या दौ-याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे येत्या दोन वर्षातले राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याची कल्पना आलेल्या या तीन पक्षानी संयुक्तपणे योगींना कडाडून विरोध केला आहे.

किशोर आपटे

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारची वर्षपूर्ती होत असतानाच ब-याच घडामोडी मागील सप्ताहात मुंबईत झाल्या. या घडामोडीतून राज्यातील सध्याचे राजकारण आणि भविष्याची ‘दिशा’ काय असेल? याचे संकेत मिळाले.  महाराष्ट्र ही साधुसंतांची आणि वारकऱ्यांची भुमी आहे. ‘अतिथी देवो भव’ हा आमचा संस्कार आहे. मात्र मागील सप्ताहात उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत आले खरे पण या पाहुण्यांचे स्वागत मात्र राज्यातील मनसे- राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अदृश्य युतीने वेगळ्या पध्दतीने केले.

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला कोरोनाच्या कालखंडानंतर सामान्य जनजीवनाची भ्रांत असताना सत्ताधाऱ्यांचे भविष्यातील आर्थिक राजकीय जुळवाजुळवीचे प्रयोग समजण्या इतका वेळ राहिलेला नाही. त्यामुळे योगींच्या दौ-याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे येत्या दोन वर्षातले राजकारण कोणत्या दिशेने जाणार आहे याची कल्पना आलेल्या या तीन पक्षानी संयुक्तपणे योगींना कडाडून विरोध केला आहे. तसे पाहता प्रत्येक राज्याचा मुख्यमंत्री त्याच्या राज्याचा त्याच्या परीने विकास व्हावा प्रगती व्हावी असा प्रयत्न करत असतो. त्यासाठी अनेकदा  विदेश वा-याही केल्या जातात, त्यावर सरकारी तिजोरीतून खर्चही होतो. त्यानंतर मुख्यमंत्री विदेशातून किती गुंतवणूक आपल्याकडे येणार आहे याचे  आकडे सांगतात आणि त्यावर टिका टिपण्याही होत असतात.

तर आतापर्यंतच्या इतिहासात अनेक मुख्यमंत्र्यांनी बाहेरच्या राज्याचे दौरे केले आहेत. गुजरातमध्ये सुद्धा जावुन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यापुर्वी आले आहेत. सध्याच्या काळात विकासाची स्पर्धा असते. प्रगतीसाठी चढाओढ असते. त्यात उद्योजक, उद्योगपतींना आकर्षित करून घेण्यासाठी सवलती दिल्या जात असतात, मात्र त्यामुळे कुणा राज्यातून काही उद्योग पळवून नेले जात आहेत असेही पहायला मिळाले आहे. जसे टाटाच्या नँनो प्रकल्पाबाबत झाले आहे. पश्चिम बंगाल मध्ये होवू घातलेला हा प्रकल्प त्यावेळी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये नेण्यात आला. किंवा राज्यातील मुंबई बंदरातील अनेक उद्योग गुजरातमध्ये हलविण्यात आले. मुंबईच्या उद्योग जगतामधून अहमदाबादला ब-याच उद्योगांना विशेष आर्थिक क्षेत्रात सवलती देण्याचे अमिष देवून वळवण्यात त्याकाळात यश आले आहे. अगदी मुंबईचा जोहरीबाजार देखील गुजरातला नेण्याचा प्रयत्न झाला, त्यावर त्याकाळात आणि आजही मोठ्या प्रमाणात चर्चा झाल्या आहेत.

सत्तेच्या राजकारणात गुंतवणूक, उद्योग आणि पैसा मिळवण्याच्या अनेक कल्पना येत असतात.  त्या राबविताना त्या त्या राज्यातील सत्ताधाऱ्यांचा कस लागत असतो. गेल्या काही वर्षात चीनकडून प्रगतीचा धडा शिकून त्यांच्या प्रतिकृती राज्यात देशात करण्याचा चंग भारतीय जनता पक्षाच्या राजवटीत होताना दिसतो. त्यामध्ये बाहेरील तंत्रज्ञानासह स्वस्तातील कर्ज देखील मिळविण्याचा प्रयत्न होताना दिसतो. मात्र ही कर्ज स्वस्तात दिसत असली तरी त्यात चीनच्या साम्राज्यवादी शक्तींचा विस्तारवादी दृष्टीकोनही असतो हे अलिकडे अनेक देशात निर्माण झालेल्या जागतीक व्यापार युध्दात दिसून आले आहे. थोडक्यात ही पळवापळवी, फसवाफसवी, आणि खेचाखेच राज्या राज्यात नव्हे तर जगभर सुरु आहेच. त्यात ‘जो जिता वह सिकंदर’ समजले जाते!

याच पार्श्वभुमीवर उत्तर प्रदेशातील भगवेधारी मुख्यमंत्री महाराष्ट्रातील मुंबईत भगव्याच्या राजकारणातून सत्तेवर आलेल्या शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना मुंबईत येतात आणि येथील शेअर बाजारासह इथला गेल्या शंभर वर्षापासूनचा जुना चित्रपट निर्मीती व्यवसाय उत्तरप्रदेशातही सुरू करण्यासाठी गुंतवणूकदार आणि कलाकार निर्माते यांच्या भेटी घेतात, हे वरकरणी सहज सुंदर आणि योग्य वाटावे असेच आहे. मात्र योगी यांच्या या दौ-याला सध्या एकत्र सत्तेत असलेल्या शिवसेना-राष्ट्रवादी सोबत सध्या विरोधात बसलेल्या मनसेही कडाडून विरोध केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे राजकारण ‘सर्वभक्षी’ प्राणी समजल्या जाणा-या बकरीसारखे आहे, याची एव्हाना राज्यातील सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना कल्पना आली आहे. म्हणजे बकरी दिसते अगदी साधीशी मात्र ती शेतात उतरली तर सारे शेत खावून फस्त करू शकते अशी तिची भूक असते! तसेच गेल्या काही वर्षात भाजपला प्रचंड सत्तेची भूक लागली आहे. सा-या जगातील सत्ता आणि राजकारण आम्हीच करणार अश्या अविर्भावात या पक्षाचा प्रवास आणि नियोजन असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री योगींच्या दौऱ्याचा “पराचा कावळा” कशामुळे करता?  असा सवाल करणा-या भाजपच्या नेत्यांना हे माहिती नाही की गेल्या एक वर्षापासून त्यांच्या राजकीय खेळ्या सर्वाना समजल्या आहेत आणि आता त्या ओळखल्या जात असल्याने सर्वत्र भाजपच्या अपयशाचीच चर्चा होताना दिसत आहे.

भाजपच्या योगी आदित्यनाथ यांना सध्या पक्षात अनन्य साधारण महत्व आहे, भविष्यातील पंतप्रधान पदाचे दावेदार समजल्या जाणा-या  योगी यांच्या मुंबई दौ-याला त्यामुळे वेगळे महत्व आहे. अगदी गेल्या काही महिनाभरापूर्वी मुंबईला पाकव्याप्त काश्मिर म्हणणा-या कंगना राणावतची पाठराखण करणा-या भाजपच्या नेत्यांना मुंबईचा गौरव समजल्या जाणा-या उद्योग आणि सिनेउद्योग जगताला नोएडा मध्ये जागा देवून स्थलांतरीत करण्याची कल्पना कशी सुचते? हा मुंबईला  महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या नितीचा भाग आहे. मात्र केवळ सत्ता आणि निवडणुक जिंकण्याचे राजकारण करण्याच्या नादात अश्या अस्मितेच्या मुद्यांवर संघर्षाची वेळ येतेच.

राज्यातील सत्ताधाऱ्यांनी मग योगींच्या दौ-याचे राजकिय भांडवल करण्याचा प्रयत्न केला, अशी टिका केली जात आहे. ते काही प्रमाणात खरे असले तरी धुर्तपणे भाजप खेळत असलेले डाव आता इथल्या राजकीय पक्षांना आणि नेत्यांना समजू लागले आहेत हे देखील यामागचे महत्वाचे कारण आहे. उत्तरप्रदेशात इंटरनॅशनल फिल्मसिटी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी केल्यानंतर चित्रपट विश्वातील अनुभवी व दिग्गज कलाकारांशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येणे हा तर शिवसेना आणि मनसेच्या राजकारणाला शह देण्याचा प्रयत्न आहे. कारण बाळासाहेबांच्या काळापासून मुंबईत आमचीच मस्ती चालणार हे ब्रिदवाक्य या पक्षांना ‘बाळकडू’ म्हणून पाजण्यात आले आहे.

राज्यातील शिवसेनेच्या सत्तेला वर्ष पूर्ण होत आहे. मात्र वेध लागले आहेत ते मुंबई महापालिकेच्या निवडणूकांचे. दरवाज्या पर्यंत येवून मागीलवेळी बाहेरच थबकलेल्या पहारेक-यांच्या म्हणजेच भाजपच्या राजकीय खेळीला नामोहरम करण्याचे!  त्यामुळे योगी आदित्यनाथ हे भाजपचे भविष्यातील नेते शिवसेनेच्या भविष्यातील नेते असणा-या आदित्य ठाकरे यांना २०२२ मध्ये होणा-या महापालिका निवडणुकीत आडवे जाणारच याचा अंदाज शिवसेनेला आला आहे. सातत्याने परप्रांतियांच्या प्रश्नावर आक्रमक राजकारण करत आलेल्या योगी यांनी मुंबईच्या अर्थकारणाला पळवून नेताना मुंबई महापालिकेत उत्तर भारतीयांच्या वर्चस्वाचा पगडा बसविण्याचा घाट घातला आहे.

हे चाणाक्षपणे मनसे आणि शिवसेनेने ओळखले आहे. तर मराठी माणसाच्या हक्कासाठी पूर्वीपासून शिवसेनेला अप्रत्यक्ष साथ देत आलेल्या शरद पवार यांच्या राजकारणाला देखील हा धोका लक्षात आला आहे. त्यामुळे योगींच्या दौ-याला विरोध करून ‘इथे येणे इतके सोपे नाही’ असा संदेश देत तीन पक्ष एका समान मुद्यावर एकत्र आल्याचे पहायला मिळाले. यातच मुंबई महापालिकेच्या राजकारणात कशी रणनिती असेल ते दिसून आले आहे!

मनसे, शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या विरोधाला मुंबईतील भाजपच्या नेहमी आरडाओरड करणा-या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही हे देखील नोंद घेण्यासारखेच म्हणावे लागेल.

महाआघाडी सरकार एक वर्ष पुर्ण करताना वर्षभरातील अपयशाची चर्चा टाळण्यासाठीच हे आंदोलन आणि योगींच्या नावाने शिमगा करण्यात आला अशी प्रतिक्रिया भाजपच्या मुंबई बाहेरच्या प्रवक्त्यानी दिली, पण मुंबई भाजप आणि त्यांचे नेते मात्र या मुद्यावर मौनच राहिली! या निमित्ताने आणखी एक कारण सांगण्यात आले ज्यामुळे या दौऱ्याचे राजकिय भांडवल करण्याचा डाव शिवसेनेने खेळला. याचे कारण ‘अजाण’ते पणाने त्यांच्या दक्षिण मुंबईतील विभागप्रमुखाने मुस्लिमांसाठी आयोजन केलेल्या ‘अजान’ स्पर्धेवरून भाजपने त्यांच्या हिंदुत्वावर शंका घेण्याचे राजकारण रेटण्याचा प्रयत्न केला. त्यात चाणाक्य समजले जाणारे खासदार संजय राऊत अडचणीत आले, त्यांच्या जवळचा समजल्या जाणा-या पांडुरंग सकपाळ यांनी ही स्पर्धा आयोजित केल्याने मुख्यमंत्री ठाकरे यांना काय उत्तर द्यावे असा पेच राऊत यांना पडल्याचे सांगितले जाते. त्यामुळे योगींच्या दौ-याच्या निमित्ताने हाकाटी करण्यात आली असावी असे सांगितले जाते.

या राजकारणाला उत्तर देताना मग मुख्यमंत्री योगींनी मी महाराष्ट्रात मुंबईतील बॉलीवुड घेवुन जायला आलो नाही असे सांगितले. ते काय पाकीट मारण्या इतके सोपे आहे का? असेही ते म्हणाले. एका अर्थाने योगी यांनी आपण ‘पाकीटमार’ नसल्याचा खुलासा कुणीही तसे न म्हणताच का केला असावा? हे देखील न उकललेले कोडेच म्हणायला हवे नाही का? मात्र राज्यातील सत्ता एक वर्षाची होत असताना आणि मुख्यमंत्र्याना वर्षावर मुक्काम करावेसे वाटत असताना राज्यातील वीज, रोजगार आरक्षण शेतक-यांना मदत इत्यादी कठीण महत्वाच्या प्रश्नाची चर्चा टाळण्यासाठीही या दौ-याचा खुबीने वापर करून घेण्यात महाविकास आघाडी यशस्वी झाली आहे.

मागच्या वेळी मुंबई महापालिकेत सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोचणारे भाजप आता  उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्याना मुंबईत आणून महानगरपालिका ताब्यात घेण्याची रणनीती करत आहे याचा अंदाज ठाकरे बंधूच्या दोन्ही पक्षांना आला आहे. म्हणूनच योगी ‘आदित्यनाथ मुंबई उचलुन न्यायला आले’ म्हणत त्यांनी मराठी अस्मितेला खास शैलीत जागे करण्यास सुरूवात झाली आहे.. दादासाहेब फाळके या मराठी माणसाने निर्माण केलेल्या चित्रपटसृष्टीला मुंबईचा कणा समजले जाते. शिवसेना किंवा मनसे यांचा कलाकार, चित्रपट प्रदर्शित होतानाचे राजकारण इत्यादी राजकीय हत्यांरांचा हा हुकूमीएक्का आहे. त्यामुळे ‘आम्हीच चित्रपटसृष्टीचे कैवारी’ असे म्हणत त्यावर गहजब होणे स्वाभाविक आहे. योगीच्या दौऱ्याच्या निमित्ताने भविष्यातील नव्या राजकारणाची दिशा मात्र अधोरेखित झाली आहे.