उत्सवातील उत्साह आणि सुरक्षितता

कोरोनाचे काळे ढग आपल्या डोक्यावर आहे. मात्र या उत्सवात अतिउत्साह दाखविणे घातक ठरु शकते. कोरोना सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना आणि नियमावलीचे पालन करुन आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे. गणपती विघ्नहर्ता आहे असे आपण मानतो त्यामुळे कोरोनाचे विघ्न लवकर जावो, अशी प्रार्थना गणरायाकडे करायची आहे.

गणपती बाप्पाचे आगमन झाले. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मात्र, दरवर्षीचा उत्साह यावेळी दिसत नाही. कारण कोरोनाचे काळे ढग आपल्या डोक्यावर आहे. मात्र या उत्सवात अतिउत्साह दाखविणे घातक ठरु शकते. कोरोना सुरक्षेसंबंधी सर्व उपाययोजना आणि नियमावलीचे पालन करुन आपल्याला गणेशोत्सव साजरा करायचा आहे. गणपती विघ्नहर्ता आहे असे आपण मानतो त्यामुळे कोरोनाचे विघ्न लवकर जावो, अशी प्रार्थना गणरायाकडे करायची आहे.

जपा सुरक्षितता

एकीकडे कोरोनाचे सावट तर दुसरीकडे गणेशोत्सवाचा उदंड उत्साह मनात दाबून ठेवावा लागत आहे, सोशल डिस्टंन्सिंगचा प्रश्न उभा आहेच. अशा प्रतिकूल परिस्थितीत हा उत्सव साजरा होत आहे. उत्सवातील उत्साहाला थोडी मुरड घालून आपली सुरक्षितता जपली तरी आजच्या घडीला एवढे पुरेसे आहे.

कार्यकर्त्यांनाही आराम

लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राचा भूषणास्पद सांस्कृतिक ठेवा म्हणून गणेशोत्सवाची सुरुवात केली. राष्ट्रीय अभिमान आणि एकात्मता जतन करुन प्रतिकूलतेला तोंड देण्याचे सामर्थ्य समाजशक्तीत उभे राहावे, असे टिळकांचे विचार होते. प्रारंभीच्या काळात या ज्ञानदेवतेचा उत्सव करणारे कार्यकर्ते सामाजिक भान ठेवून काम करीत असल्यामुळे त्यातूनच अनेकदा राजकीय नेतृत्वसुद्धा उदयाला आले. उत्तम कलावंतांना चांगले व्यासपीठ मिळाले. देशासमोरच्या प्रश्नांची चिकित्सक चर्चा करणारी गणेश मंडळे महाराष्ट्राच्या गावागावांत उभी राहिली. सहकुटुंब गणेशोत्सवाचे देखावे पाहणे हा एकेकाळी अत्यंत आनंदाचा भाग असे. आजही देखाव्याचा चढाओढ असते. अनेक कलावंतही काम करीत असतात. कार्यकर्ते रात्रंदिवस राबत असतात. महिना-दीड महिना घरदार न पाहता कार्यकर्त्यांची फळी काम करते. मात्र, यावर्षी थोडा विराम मिळाला आहे.

अंतर राखणे महत्त्वाचे

गणेशोत्सव आणि महाराष्ट्र असा घनिष्ठ संबंध आहे. सार्वजनिक गणेशोत्सव यंदा अत्यंत साधेपणाने करावा लागणार आहे. असे असते तरी उत्सव साजरा होणार आहे. एवढे मात्र नक्कीच आहे. आतापर्यंत धूमधडाक्यात उत्सव साजरा करण्यात आला आहे, हे सत्य असले तरी साधेपणाने उत्सव साजरा करुन सामाजिक भान जपणे, हे आपले आद्यकर्तव्य असल्याने ते जपणे आवश्यक ठरते. कारण कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वाचे आहे. लोकमान्य टिळकांनी सुरु केलेली ही सार्वजनिक उत्सवाची संकल्पना तत्कालीन स्थितीत अत्यंत प्रभावी ठरली. तेव्हा ब्रिटिशांचे वर्चस्व होते. त्यांना शह देण्यासाठी एकत्र येणे ही त्यावेळची नितांत गरज होती. आता स्थिती अगदी उलट आहे. एकमेकांपासून अंतर राखत प्रत्येक गोष्ट करावी लागत आहे. यावर्षी देखाव्यांना पूर्णपणे बंदी घातली असल्याने हा गणेशोत्सव अगदी साधेपणाने, निर्विघ्नपणे, सुरक्षिततेची दखल घेऊन पार पडले, अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?