आध्यात्मिक क्रांतीची गरज

भारतात राष्ट्रीय युवा दिन १२ जानेवारी रोजी साजरा होत आहे. जगातील सर्व देशांमध्ये भारतात युवकांची संख्या सर्वात जास्त आहे. तरुण वयामध्ये उत्साह, जोम, ताकत, काहीतरी करून दाखविण्याची धडपड ही वयाच्या मानाने स्वाभाविक असते. जर या वयामध्ये व्यवस्थित मार्गदर्शन मिळाले तर उर्वरित आयुष्य यशस्वी होण्यास मदत होते आणि याउलट तारुण्याच्या मस्तीमध्ये व्यवस्थित मार्गदर्शन घेतले नाही. तर उर्वरित आयुष्य वाया जाण्याची शक्‍यता जास्त असते. बालपण आणि तारुण्यात मन हे स्पंजप्रमाणे असते.

स्पंज ज्याप्रमाणे पाणी शोषून घेतो आणि पाणी शोषून घेताना पाणी गटारातील आहे की, स्वच्छ आहे हा विचार करत नाही त्याचप्रमाणे बाळपणी आणि तरुणपणी आपण ज्याची संगत करतो त्याप्रमाणे आपला स्वभाव बनतो. म्हणून आपली संगत कशी असावी हे फार महत्त्वाचे आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण करण्याच्या आपल्या वृत्तीमुळे एकेकाळी सर्व जगाला मार्गदर्शन करणार्‍या या वैदिक संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. परंतु, आज पाश्चात्य राष्ट्रातील भोगवादी संस्कृतीला कंटाळून तेथील युवक भारतीय संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. आज तरुणपण वाया घालवण्याचे प्रकार बदलले पण परिस्थिती तीच आहे. आजचा तरुण मार्गदर्शनाअभावी व आदर्शाअभावी दिशाहीन झालेला आहे. केवळ पैसा व प्रतिष्ठा मिळवून इंद्रिय तृप्ती करणे हेच ध्येय आजच्या तरुणांपुढे आहे. त्याला प्रोत्साहन देण्यासाठी अश्लील चित्रपट, नाटके, टीव्हीवरील अनेक मालिकांनी जीवनमूल्यांचा पूर्णपणे ऱ्हास करून टाकळा आहे. याचा परिणाम म्हणून तरुणांमध्ये बैफल्यग्रस्तता वाढून आत्महत्येचे व जिवंत राहिल्यास व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. या भयानक परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आध्यात्मिक क्रांतीची गरज आहे.

आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेली आपली वैदिक संस्कृती समजून घेणे व तिचे पालन करणे यातच तरुणांचे हितही आहे. आज जगाला गीता, भागवतवर आधारित असलेल्या वैभवशाली संस्कृतीची गरज आहे. यासाठी तरुणांनी पुढे येऊन पाश्वात्यांप्रमाणे भोगवादी संस्कृतीमध्ये आपले आयुष्य वाया न घालवता आपल्या पूर्वजांप्रमाणेच त्याग, समर्पणाची भावना स्वीकारून हा वारसा पुढे नेणे गरजेचे आहे.भारतामध्ये श्रीकृष्ण आणि श्रीराम यांनी अवतार धारण केला. श्रीकृष्णांनी सर्व ज्ञानाचा राजा असलेला भगवदरीता उपदेश या पुण्यभूमी भारतामध्येच केला. वेदव्यासांनी सर्व ज्ञानाचा सागर असलेले वेद याच भारतभूमीमध्ये लिहिले.

आपल्या पूर्वजांनी बांधलेली वैदिक संस्कृतीची आध्यात्मिक केंद्रस्थाने पंढरपूर, द्वारका, जगन्नाथपुरी, तिरुपती, उडुपी, गुरुवायूर, मायापूर इत्यादी भव्य आणि आकर्षक मंदिरेही भारतातच आहेत. गंगा, यमुना, सरस्वती, कृष्णा, इंद्रायणी, कावेरी, गोदावरी, नर्मदा इत्यादी पवित्र नद्याही भारतातच वाहतात. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबारकांचार्य, विष्णुस्वामी, शंकराचार्य, संत तुकाराममहाराज आणि अलीकडच्या काळात सर्व जगामध्ये वैदिक संस्कृतीचा प्रचार करणारे श्रील प्रभुपाद यासारखे महान आचार्यही भारतभूमीमध्येच अवतरित झाले. जगाच्या कल्याणासाठी त्यांनी वैदिक संस्कृतीचा स्वतःच्या जीवनामध्ये पालन करून प्रचार केला. दुर्दैवाने आजच्या पिढीला या महान परंपरेचा आणि वारशाचा विसर पडत चालला आहे.