पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे जनता त्रस्त

बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील मोदी यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ योग्य असल्याचे म्हटले आहे, पेट्रोल-डिझेलची जी सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे देशातील जनता त्रस्त झालेली आहे.

 बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सुशील मोदी यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ योग्य असल्याचे म्हटले आहे, पेट्रोल-डिझेलची जी सातत्याने दरवाढ होत आहे. त्यामुळे देशातील जनता त्रस्त झालेली आहे. परंतु सत्तासुख भोगणाऱ्या या सुशील मोदींना या दरवाढीबद्दल काहीही वाटत नाही. पेट्रोलच्या दरवाढीबद्दल जनता नाराज नसल्याचे ते सांगतात. लोकांमध्ये पेट्रोल दरवाढीबद्दल आक्रोश नाही, असेही ते म्हणाले जर सुशील मोदींची नाळ जनतेशी जुळलेली असती तर त्यांनी असे वक्तव्य केलेच नसते. जनतेजवळ पैश्याचे झाड आहे. जेव्हा वाटेल तेव्हा ते हलवावे आणि पैसा पाडावा, असे मोदींना वाटते काय? पेट्रोल-डिझेल हे आता जीवनावश्यक झाले आहे. एखादा चतुर्थ श्रेणी कर्मचारी सुद्धा घरुन त्याच्या कार्यालयात जाण्यासाठी दुचाकी वापरतो. तो जर बसने कार्यालयात गेला तर तो वेळेवर पोहचू शकणार नाही आणि तसेही लॉकडाऊनमुळे बसेस आणि ऑटो बंद आहे. असे असतानाही पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज वाढतच आहे. तेल कंपन्या ही जी दरवाढ करीत आहे यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. सरकारला यातून मोठ्या प्रमाणावर एक्साईज ड्युटी मिळत असल्यामुळे सरकारही या दरवाढीवर कोणतेही अंकुश लावत नाही. सरकारी महसुलाचे मुख्य साधन एक्साईज ड्युटी हेच आहे. पेट्रोल-डिझेलच्या वास्तविक किंमतीपेक्षाही जास्त करवसुली करण्यात येत आहे. एका अभ्यासानुसार देशात ७५ ते ७७ टक्के रक्कम कराच्या स्वरुपात वसूल करण्यात येत आहे. या अवाढव्य करवसूलीमुळे केंद्र आणि राज्यांची तिजोरी भरलेली आहे. यापूर्वी जेव्हा कच्चा तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, तेव्हा त्याचा फायदा जनतेला मिळालाच नाही. पेट्रोल-डिझेलला जीएसटी अंतर्गत आणून किंमतीमध्ये देशात सर्वत्र समानता आणण्यात आली पाहिजे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वारेमाप वाढत असतानाही जनता रस्त्यावर उतरत नाही याचे कारण लॉकडाऊनमुळे जनता त्यांच्या घरातच कैद आहे. परंतु त्यांच्या मनात मात्र या दरवाढीबद्दल कमालीचा असंतोष आहे. कित्येक जण बेकारीमुळे तर बहुतांश कर्मचारी वेतन कपातीमुळे त्रस्त झालेले आहेत. अशातच पेट्रोल-डिझेलची दरवाढ होणे म्हणजे त्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखेच आहे. 

शेतीवर विपरीत परिणाण 

मान्सून आल्यानंतर शेतीची कामे सुरु होणार आहे. ओलित करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंजिनसाठी डिझेलची आवश्यकता असते. डिझेलचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांवरच या दरवाढीचा जास्त प्रभाव पडणार आहे. डिझेल महागल्यामुळे फळे, भाजीपाला आणि अन्नधान्याच्या किंमती वाढू लागल्या आहेत. लॉकडाऊनमध्ये ट्रॅक्टर आणि ट्रकची वाहतूक बंद होती. परंतु आथा लॉकडाऊन शिथिल झाल्यामुळे वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान ट्रक मालकांनी भाडेवाढ केली आहे. या भाडेवाढीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढले आहेत. ट्रक मालकही बेचैन झालेले आहेत. ट्रक मालकाच्या संघटनेने तर ट्रकच्या चाव्या सरकारला सोपवून देणयासंदर्भात सांकेतिक आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या ७ जूनपासून पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहे. आता तर पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखेच झालेले आहेत.