कोरोनाची तिसरी लाट; नीती आयोगाने वाजविली तिसऱ्या लाटेची घंटी!

नीती आयोग काय किवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञाची समिती काय, या दोन्ही संस्थांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत दिलेला इशारा सगळ्यांनीच गांभीर्याने घ्यायला हवा. दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन, आयसीयू बेडर आणि औषधांची उपलब्धता याविषयी केंद्रीय यंत्रणांच्या उणिवा उघड झाल्या होत्या.

  आरोग्य प्रथम आणि सण, उत्सव कोरोनानंतर असे धोरण जर राज्य सरकारचे असेल तर ते योग्यच आहे. कारण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे पडघम थेट नीती आयोगानेच अगदी स्पष्टपणे वाजविले आहेत. तरीही त्याकडे राज्य सरकारने डोळेझाक करावी आणि जनतेला तिसर्‍या लाटेच्या खाईत ढकलावे, असे विरोधकांना वाटते काय ? त्यांना काय वाटते हा त्यांचा प्रश्‍न.

  राज्य सरकारची बांधिलकी कायम जनतेच्या आरोग्याशीच राहिली आहे आणि पुढेही राहील. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचे सावट गडद होत असताना “आरोग्य प्रथम, बाकीचे नंतर’ हेच धोरण ठेवावे लागेल. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली आणि रिकव्हरी रेट १८ टक्क्यांवर गेला असला तरी आता तिसर्‍या लाटेचे पडघमदेखील जोरात वाजू लागले आहेत.

  कोरोनाची दुसरी लाट जूनमध्ये ओसरली. तेव्हापासूनच तज्ज्ञ मंडळी आणि सरकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे इशारे देत आहेत. आता थेट नीती आयोगानेच या तिसऱ्या लाटेचा सुस्पष्ट इशारा दिला आहे. त्यानुसार पुढील महिन्यात या लाटेचा तडाखा देशाला बसू शकतो. देशात दररोज चार ते पाच लाख कोरोना रुग्ण सापडू शकतील.

  प्रत्येक १०० रुग्णांपैकी २३ ते २५ रुग्णांना इस्पितळांमध्ये दाख करावे लागू शकते, असे इशारे नीती आयोगाचे सदस्य व्ही.के. पॉल यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञ गटाने दिले आहेत. यापूर्वी दुसऱ्या लाटेसंदर्भातही नीती आयोगाने असाच सावधगिरीचा इशारा दिला होता. त्यामुळे आता तिसऱ्या लाटेसंदर्भात नीती आयोगाने व्यक्‍त केलेली भीती दुर्लक्षून चालणार नाही.

  दुसऱ्या लाटेमध्ये एक प्रकारचा हाहाकारच देशाच्या बर्‍याच भागांमध्ये माजला होता. इस्पितळांमध्ये बेड न मिळाल्याने, ऑक्सिजनअभावी अनेकांचे मृत्यू झाले होते. त्यामुळे आता नीती आयोग काय किंवा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या तज्ज्ञांची समिती काय, या दोन्ही संस्थांनी कोरोनाच्या तिसर्‍या लाटेबाबत दिलेला इशारा सगळ्यांनीच गांभीर्याने घ्यायला हवा. दुसर्‍या लाटेत ऑक्सिजन, आयसीयू बेडर आणि औषधांची उपलब्धता याविषयी केंद्रीय यंत्रणांच्या उणिवा उघड झाल्या होत्या.

  आता तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन या उणिवा तातडीने कशा दूर होतील, आरोग्य यंत्रणा सुसज्ज कशी ठेवता येईल, याचा विचार आणि त्यानुसार अंमल करावा लागेल. नीती आयोग आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था यांनी सुचविल्यानुसार किमान २ लाख ‘आयसीयू’ बेड तयार ठेवावे लागतील. व्हॅंटिंलेटरसह १.२ लाख आयसीयू बेड आणि ७ लाख विनाआयसीयूचे बेड सज्ज ठेवावे लागतील. या सात लाखांत पाच लाख ऑक्सिजन असलेले बेड लागू शकतात.