आतातरी लोकसंख्येच्या धोरणांत नितांत बदल करणे गरजेचे आहे; वयवाढीच्या सुचिन्हाची जागतिक चिंता

जगातील अनेक देश सध्या लोकसंख्याविषयक टाइम बॉम्बच्या ( डेमोग्राफिक टाइम बॉम्ब) धास्तीने ग्रस्त असून या बॉम्बचा स्फोट कधीही होऊ शकतो.

  डेमोग्राफिक टाइम बॉम्ब या परिस्थितीचा परिणाम जपान, चीनसारख्या देशांमध्ये आतापासूनच पाहायला मिळत आहे. याचे मूळ कारण या देशांमध्ये कामधंदा करण्यास पात्र असणाऱ्या युवकांच्या तुलनेत वयोवृद्ध लोकांची संख्या अधिक आहे. कोणत्याही देशात आयुर्मान वाढणे हे सुचिन्ह मानले जाते; परंतु या देशांमध्ये लोकसंख्या नियंत्रणाची धोरणे ज्या पद्धतीने राबविली जात आहेत किंवा यापूर्वी राबविली गेली होती, त्याचा हा परिणाम आहे.

  लोकसंख्या नियंत्रण करण्यामुळे युवकांची संख्या कमी होत गेली आणि वयोवृद्धांची संख्या वाढत राहिली. ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय क्षेत्रातील अग्रगण्य नियतकालिकात प्रकाशित झालेल्या एका शोधनिबंधात यासंदर्भात इशारा देण्यात आला आहे. अर्थात, सध्याची परिस्थिती पाहून त्यामुळे प्रभावित होऊ शकणाऱ्या देशांनी आपल्या लोकसंख्या नियंत्रणविषयक धोरणात बदल करण्यासाठी पावले उचलली आहेत.

  जगातील सर्व देशांमध्ये जपान हा सर्वांत वयस्कर देश बनला आहे. म्हणजेच जपानमध्ये युवकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांची संख्याच सर्वाधिक आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर २०४० पर्यंत जपानमधील ३५ टक्के लोकसंख्या वयोवृद्धांची असेल. वस्तुतः जपानमध्ये प्रजननदर १.४ च्या आसपास आहे. सामान्यतः एखाद्या देशाची लोकसंख्या आहे त्याच प्रमाणात कायम राखण्यासाठी प्रजननदर २.१ टक्के असावा लागतो.

  शतायुषी लोकही जपानमध्ये सर्वाधिक संख्येने आहेत. प्रदीर्घ आयुष्य लाभणे ही चांगलीच गोष्ट आहे; परंतु यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते की, काम करणाऱ्या हातांवरील ताण वाढत जातो. एकीकडे लहान मुले तर दुसरीकडे वयोवृद्ध लोक हे दोन्ही वयोगट अनुत्पादक वर्गात मोडतात. त्याचा थेट परिणाम कुटुंबावर आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवरही होतो. चीनच्या जनगणनेचा ताजा अहवालसुद्धा असाच चिंताजनक आहे.

  चीनच्या वाढत्या लोकसंख्येमुळे १९७९ मध्ये त्या देशाने ‘एक कुटुंब, एक मूल’ धोरण अवलंबिले. याचा परिणाम म्हणून लोकसंख्या नियंत्रित झाली; परंतु आता चीनसमोर दुहेरी संकट उभे ठाकले आहे. एकीकडे वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत चालली आहे तर दुसरीकडे लग्नासाठी नवर्‍या मुलींची संख्या कमी असल्यामुळे अडचणी उद्‌भवल्या आहेत. एकीकडे एकट्या चीनमध्ये तीन कोटी अविवाहित युवक आहेत तर दुसरीकडे युवकांमध्ये लग्नाबद्दल अनास्था वाढू लागल्याचे दिसते.

  नुकत्याच झालेल्या जनगणनेनुसार चीनमध्ये १०० मुलींमागे १११.३ मुले असे लिंग गुणोत्तर आहे. म्हणजेच लैंगिक असंतुलन मोठ्या प्रमाणावर निर्माण झाले आहे. लोकसंख्याविषयक तज्ज्ञ प्रा. ब्योर्न एल्परमॅन यांच्या म्हणण्यानुसार, सध्या जन्माला येत असलेले मुलगे जेव्हा मोठे होऊन लग्नाच्या वयाचे होतील तेव्हा आपल्या वयाची जीवनसाथी शोधणे ही त्यांच्यापुढील मोठी समस्या असेल.

  याचे सर्वांत मोठे कारण असे की, भारत आणि जगातील इतर अनेक देशांप्रमाणेच चीनमध्येही मुलीपेक्षा मुलाच्या जन्माला अधिक महत्त्व दिले जात आहे. चीनमधील युवकांमध्येही लग्नासारख्या बंधनात अडकण्याची इच्छा दिसत नाही. ब्राझीलमध्ये मात्र चीनपेक्षा खूपच वेगळी समस्या दिसून येत आहे. तिथे किशोरावस्थेत प्रवेश करताच गर्भधारणा होण्याची समस्या वाढत आहे आणि तेथील सरकारला ‘गर्भावस्था नंतर’ असे घोषवाक्य वापरून किशोरवयीन मुलामुलींसाठी मोहीम राबवावी लागत आहे.

  There is a need for drastic changes in population policies Global concern over the signs of aging