थिंक अबाऊट इट : राज ठाकरे यांचा घरोबा कुणाला हवा!

माझी भूमिका युपी, बिहाऱ्यांना समजली पण भाजपला नाही. असे वक्‍तव्य करून राज ठाकरे यांनी आपण बदलणार नाही हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे युती कोणाला हवी आहे हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकांच्या निवडणुका आल्या की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भूमिका काय असणार, त्यांची युती कोणाशी होणार याबाबत चर्चा उठते. सध्या फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या राज्यातील विविध महापालिकांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी आधी ठाणे नंतर नाशिक आणि आता पुणे येथे कार्यकर्त्याची चर्चा सुरू केली आहे.

    लॉकडाऊनमध्ये अंतर पडल्यानंतर प्रथमच राज ठाकरे थेट कार्यकर्त्यांना भिडत आहेत. नाशिकची जबाबदारी पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे सोपवून ते स्वतः पुणे मुक्कामी पोचले आहेत. राज्याच्याच नव्हे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे नसल्याने युती आणि आघाडी हा एक आवश्यक घटक बनला आहे. स्वबळावर लढण्याच्या घोषणा वेळोवेळी झाल्या तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांनी मुंबई महापालिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्था एकत्र येऊन लढवाव्यात यासाठी मोठे प्रयत्न सुरू आहेत.

    त्यामागे भाजपला तीत्र विरोध करणे आणि राज्य सरकारला बळकटी देण्याचे राजकारण आहे. मात्र एकाकी लढून भाजपलाही हे आव्हान परतवणे शक्‍यता नाही. मुंबई महापालिकेला त्यांना एक मित्र पक्षाची सक्त आवश्यकता आहे. सेनेबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आली तर दलित मते आणि हिंदी, य मतांचा लाभ होऊ शकतो तर तिथे कमी मते भरून काढायची तर मराठी भाषिक मतांची भाजपला आवश्यकता भासणार आहे. ती मते मनसेकडे आहेत. मनसेला मुंबईत पुन्हा मोठे आव्हान निर्माण करायचे आहे.

    मुंबईत हे आदान-प्रदान होऊ शकते. शिवाय नाशिकमध्ये पुन्हा महापालिकेत वर्चस्व निर्माण करणे आणि दोन नगरसेवक असलेल्या पुण्यामध्ये आपले सदस्य वाढवणे त्यादृष्टीने मनसेला लाभ होऊ शकतो. ठाणे, कल्याण-डोंबिवळीसह विविध महापालिकांमध्येही त्याचा लाभ मिळू शकतो. अर्थात प्रत्येकाला एकमेकांची गरज आहे. पण. २०१४ ची लोकसभा असो, त्यानंतरची विधानसभा, महापालिका असो किंवा २०१९ ची लोकसभा आणि विधानसभा असो.

    प्रत्येकवेळी मनसेची कोणाशी ना कोणाशी युती होणार असे म्हटले जाते. मात्र प्रत्येकवेळी राष्ट्रीय पक्ष भाजप, काँग्रेस मनसेशी जुळवून घ्यायला नकार देतात. त्यांना परप्रांतियांची मते फारच महत्त्वाची असावीत. त्यामुळेच प्रत्येकवेळी मनसेने आपली भूमिका बदलावी अशी आग्रही मागणी राष्ट्रीय पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांकडून होत असते.

    सध्या मनसेची भारतीय जनता पक्षाशी युती होऊ शकते अशा शक्‍यता वर्तवल्या जात आहेत. राज यांनी घेतलेली भूमिका, पक्षाच्या बहुरंगी झेंड्याला ‘जय महाराष्ट्र’ करून संपूर्णतः भगव्या रंगाचा आणि राजमुद्रा असलेला ध्वज, हिंदुत्वाचा केलेला स्पष्ट उच्चार, मनसेच्या नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या भाजपशी युती होऊ शकते अशी वर्तवलेली शक्‍यता मात्र अंतिम निर्णय राज ठाकरेच घेतील असे सांगून निर्माण केलेला सस्पेन्स, त्याला भाजपकडून वेळोवेळी दिलेली हवा त्यामुळे आता मनसेशी भाजप जुळवून घेणार आणि मुंबई, ठाणे आसपासच्या सर्व महानगरपालिकांमध्ये मराठी मतांमध्ये फूट पाडून शिवसेनेला मागे ढकलणार, या शक्‍यतांवर चर्चा सुरू झाली आहे.