ही अशी बेताल वक्तव्य वेळीच आवरायला हवीत अन्यथा…’नया पाकिस्तान’चा तकलादू पाया

स्त्रियांवरील लैंगिक हिसाचाराला तोकडे कपडे कसे कारणीभूत ठरतात? असा शोध पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी लावला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांचे सरकार कसेबसे चालले आहे. आर्थिक मंदी आणि कोरोना महामारीमुळे आधीच खड्यात गेलेली अर्थव्यवस्था गर्तेत गेली आहे. शेजारच्या अफगाणिस्तानमध्ये ज्या अमेरिकन फौजा आहेत. त्या दोन महिन्यांत माघारी बोलावल्या जाणार आहेत.

  अमेरिकेच्या पाठिंब्यावरील तेथील सरकार तालिबान्यांपुढे टिकू शकणार नाही. आताच तालिबान्यांच्या हातात खूप मोठा भूभाग आला आहे. अशावेळी पाकिस्तानने तेथे अमेरिकेचा अजेंडा राबवावा, अशी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची इच्छा असेल. परंतु पाकिस्तानला स्वतःच धड उभे राहता येत नाही, तो इतरांना ‘काय मदत करणार? शिवाय इमरान हे कुशल प्रशासक नाहीत आणि त्यांच्यामागे फार मोठे बहुमतही नाही. त्यात मूर्खासारखी विधाने करण्याची त्यांची पद्धत सुरूच आहे.

  गेल्या दोन महिन्यांत इमरान यांनी दोनदा याप्रकारचे उद्गार काढले. वास्तविक इमरान सरकार महिला हक्क आणि असुरक्षित वर्गाचे आम्ही रक्षण करतो, असा दावा करते. मग पुरुष हे महिलांचे कपडे बघून आक्रमक बनतात, असे विधान ते कसे काय करू शकतात? म्हणजे बळी पडलेल्यांना दोषी ठरवण्याचा हा प्रकार आहे. आधुनिक असल्याचा दावा करणारे इमरान खान हे वास्तविक बुरसटलेल्या आणि पुरुषसत्ताक विचाराचेच आहेत.

  पंतप्रधानांचे शब्द किळस आणणारे आहेत, अशी टीका पाकिस्तानमधील घरीदा फारुकी यांनी केली आहे. बलात्काराचा कपड्यांशी संबंध नाही, तर पुरुषांना उत्तरदायी ठरवण्यापासून पळवाट काढण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत पत्रकार शाहमीर सनी यांनी व्यक्‍त केले आहे. पाकिस्तानातील सोळा नागरी सामाजिक संस्थांनी तसेच मानवी हक्क आयोगाच्या एका शाखेने, इमरान यांनी आपल्या उदगारांबद्दल जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

  विशेष म्हणजे, पाकिस्तानात धर्मांध संघटनांचे प्राबल्य असूनही, तेथील महिला पत्रकार निडरपणे मत व्यक्‍त करत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबरत लाहोरजवळ राष्ट्रीय महामार्गावर एका स्त्रीवर दोन तरुणांसमोरच सामूहिक बलात्काराची घटना घडली. या घटनेनंतर पाकिस्तानात संतापाची लाट उसळली व शेकडो महिला रस्त्यावर आंदोलनासाठी उतरल्या, तेव्हा इमरान यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली, परंतु त्याचवेळी बलात्कार करणाऱ्यांना सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली पाहिजे किंवा नपुंसक करायला हवे.

  ज्या प्रकारे खुनाच्या घटनेत फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री असा पद्धतीने शिक्षा असते, त्याच पद्धतीने अत्याचाराचा आरोप असलेल्यांना शिक्षा असायला हवी, असे प्रतिपादन इमरान यांनी केले होते. अनेक देशांत अशा पद्धतींचा वापर केला जात असल्याचे आपण वाचले असल्याची माहितीही इमरान यांनी दिली होती.

  वास्तविक पंतप्रधानपदावरील व्यक्‍तीने अधिक जबाबदारीने बोलणे वागणे अपेक्षित असते. देशात कायद्याचा वचक निर्माण होईल आणि महिलांना सुरक्षितता प्राप्त होई तसेच अत्याचार करणाऱ्या आरोपींना लवकरात लवकर आणि कठोर शिक्षा होईल, हे पाहणे सरकारचे कर्तव्य असते. परंतु त्यासाठी मान मोडून काम करावे लागते व ते न करता सवंग लोकप्रियता मिळवणारी वक्तव्ये करणे, हे अधिक फायद्याचे असते. ‘एचबीओ’वरील जोनाथन स्वॅन यांना दिलेल्या आपल्या मुलाखतीत इमरान यांनी स्त्रियांबद्दलचे उपरोल्लेखित तारे तोडले.

  This absurd statement should be covered in time otherwise the tactical foundation of New Pakistan