हा प्रश्न फारच गांभीर्याने हाताळावाच लागेल अन्यथा कोरोना कचऱ्याची जीवघेणी वाटचाल

सरकारसमोर कोविडचा कचरा हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसऱ्या लाटेत बायोमेडिकल कचऱ्यातदेखील प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी भारतात वेगाने खासगी, सरकारी व नर्सिंग होम आणि प्रयोगशाळा वाढवण्यात आल्या. तत्कालीन परिस्थितीची ती गरज होती हे मान्यच पण त्यामुळे तितक्‍याच वेगाने बायोमेडिकल कचरादेखील वाढत चालला आहे.

  कोरोना आणि ब्लॅक फंगसच्या संकटात इंजेक्शन, सुई, सिरिंज, ग्लुकोज आदींचा प्रचंड वापर वाढला आहे. परिणामी बायोमेडिकळ कचरा ही मोठी गंभीर समस्या म्हणून समोर आली आहे. वास्तविक बायोमेडिकल हे ‘यूज अँड थ्रो’ आहे. एका पीपीई किटमध्ये गॉगल्स, फेस शिल्डस, मास्क, ग्लोव्हज, गाऊन, हेड कव्हर आणि शू कव्हर यांसारख्या गोष्टींचा समावेश असतो.

  पीपीईमुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे शक्‍य झाले. पण वापरानंतर त्याचे रूपांतर हे सिंगल यूज प्लॅस्टिक, मायक्रोप्लॅस्टिकमध्ये होते. आपल्याकडे रिसायकलिंगसाठीची योग्य व्यवस्था त्यावर पुर्नप्रक्रिया करणेदेखील कठीण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, सध्या जगभरात दर महिन्याला वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सुमारे ८ कोटी ग्लोव्हज, १६लाख मेडिकल गॉगल्सबरोबरच ९ कोटींहून अधिक मेडिकल मास्कची गरज भासत आहे. हा आकडा केवळ वैद्यकीय कर्मचार्‍यांचा आहे; परंतु सर्वसाधारपणे जे थ्री लेअर मास्कचा वापर करत आहेत त्यांची संख्या तर अब्जाच्या घरात पोहोचली आहे.

  बायोमेडिकल कचऱ्यात कॅप्स, मास्क, प्लासेंटो, पॅथॉलॉजिकळ कचरा, प्लास्टर ऑफ पॅरिस, ऑपरेशन  केल्यानंतर बाहेर काढलेला अवयव, कालबाह्य झालेली औषधे, डायलिसीस किट, आयव्ही सेटस, युरिन बॅग, केमिकळ कचरा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. शास्त्रीय मार्गाने त्याची विल्हेवाट होत नसेल, तर ही बाब पर्यावरणाबरोबरच माणसासाठीही धोकादायक आहे.

  मेडिकल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात सक्षम असलेली अमेरिकी कंपनी ‘ऑनसाईट वेस्ट टेक्नॉलॉजी’च्या मते, अमेरिकेच्या लोकसंख्येला लसीचे ६६ कोटी डोस देण्यासाठी जितक्या सुया लागतील, त्या सुया एकत्र केल्यास पृथ्वीला १.८ वेळेस गुंडाळता येऊ शकते. औद्योगिक संस्था असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीच्या एका अंदाजानुसार जगभरातील ६० टक्के नागरिकांना लस आणि हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी जवळपास ८०० कोटी ते १ हजार कोटी सिरिंजची गरज भासणार आहे.

  एवढेच नाही तर भारतातील १३५ कोटी लोकसंख्येच्या ६० टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी दीडशे कोटी सिरिंजची गरज भासणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात म्हटले की, दहा वर्षांपूर्वी २०१० मध्ये इंजेक्शनच्या असुरक्षित विल्हेवाटीमुळे संपूर्ण जगात एचआयव्हीची ३३ हजार ८००, हेपटायटिस बीची १७ लाख आणि हेपेटायटिस सी ची तीन लाखांहून अधिक प्रकरणे समोर आली होती.

  यावरून कोरोना काळात जर सिरिंज आणि सुईची योग्य विल्हेवाट लावली नाही तर मोठे संकट उभे राहण्याची शक्‍यता आहे. वैद्यकीय कचर्‍यावरून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी एक गाईडलाईन तयार केली होती आणि आतापर्यंत चार वेळेस ती अपडेट करण्यात आली.

  This issue has to be taken very seriously otherwise the corona waste will be life threatening