स्वस्थ रहा, मस्त रहा

२१ जून हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत आहोत. ह्या दिवशी जिथे तिथे अनेक जण योगा करताना आपल्याला दिसतात. पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की शरीराचा व्यायाम हा आवश्यक आहेच पण त्याच बरोबर मनाला ही व्यायामाची आवश्यकता आहे.

  बी. के. नीताबेन (ब्रम्हकुमारी)

  आपल्या ह्या धकाधकीच्या जीवनात तन आणि मन ह्यांना स्वस्थ ठेवणे म्हणजे खूप मोठी समस्या आहे. घरातली कामे, ऑफिसची कामे, कुटुंबातल्या जवाबदऱ्या त्यातून स्वतःसाठी वेळ काढणे अशक्य. पण आपल्या सर्वांच्याच आयुष्यात असा एक टप्पा येतो जो आपल्याला स्वस्थ होण्यासाठी हा वेळ काढण्यास भाग पाडतो.

  मग ती वेळ कोणाच्या जीवनात लवकर तर कोणाच्या जीवनात उशिरा पण येते. म्हणून सकाळी-सकाळी जिथे तिथे लोक वॉक करताना, प्राणायाम करताना किंवा जीम मध्ये जाताना दिसतात. पण तशी वेळ आल्यावर आपल्याला त्याचे महत्व समजते. आज प्रत्येकालाच काहीना काही आजार आहेत. पित्त, रक्तदाब, मधुमेह हे तर अगदी सामान्य आजार झाले आहेत. पर्स मध्ये पैसे जसे आठवणीने ठेवतात तसेच आज ही औषधे सुद्धा आठवणीने ठेवावी लागतात.

  आजचे हे प्रगत युग जिथे अनेक साधने, व्यवस्था,  आपल्याला लाभत आहेत पण त्यामुळेच ह्या गतिमान आयुष्यात शरीराची हालचाल कमी होत चालली आहे. कधी कधी आपल्याला वाटते की ही रोजची धावपळ करतोय तोच आमच्या साठी व्यायाम आहे. रोज रेल्वेनी प्रवास करताना शरीराला मसाज आपसूकच होऊन जातो. शरीरासाठी आणखी काही करायची गरज काय आहे? पण अशा ह्या धावपळीच्या, तणावाच्या मनःस्थितीत असताना शरीराचे व मनाचे स्वास्थ्य ठीक राहू शकेल?

  २१ जून हा दिवस आपण आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करत आहोत. ह्या दिवशी जिथे तिथे अनेक जण योगा करताना आपल्याला दिसतात. पण विचार करण्याची गोष्ट ही आहे की शरीराचा व्यायाम हा आवश्यक आहेच पण त्याच बरोबर मनाला ही व्यायामाची आवश्यकता आहे.

  कोरोना काळामध्ये अशी ही उदाहरणे समोर आली की कमी वयाचे, जीम Trainer असून ही मृत्युमुखी पडले. सांगण्याचे तात्पर्य हे की तन आणि मन या दोघांचे संतुलन ठेवणे आवश्यक आहे. पतंजलि योगामध्ये अष्टांग योग सांगितला आहे. यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार,.. .. आपले संपूर्ण जीवनच स्वस्थ असायला हवे. त्यासाठी फक्त शारीरिक व्यायाम पुरेसा नाही पण आहार, झोप आणि मनाची शांति याकडे ही लक्ष्य देण्याची आवश्यकता आहे. यातील एक गोष्ट बिघडली तर सर्व काही बिघडू शकते.

  आज आपण आपल्या आहारावर विशेष लक्ष देतो. इतकेच आणि हेच खायला हवे याची यादी सतत आपल्या बरोबर ठेवतो. पण त्याच बरोबर हाच आणि असाच विचार करावा याची ही योजना आखावी कारण आपल्या प्रत्येक विचाराचा आपल्या शरीरावर परिणाम होत आहे.

  एकीकडे नवनवीन पदार्थ बनवण्याची साधने आपल्याला उपलब्ध होत आहेत तर दुसरीकडे जिभेवर ताबा ठेवण्याची गरज ही भासत आहे. दोन्ही विरोधाभासी गोष्टी आपल्याला कराव्या लागत आहेत. आपण आपल्या शरीराची प्रकृती ओळखून त्याप्रमाणे आपले आहार नियोजन करावे.

  स्वस्थ राहण्यासाठी काही गोष्टी नियम म्हणून पाळणे अति आवश्यक आहे. नियमित रित्या रोज सकाळी लवकर उठणे, वॉक करणे, संतुलित आहार, आनंदी राहणे आणि शांत झोप या पाच गोष्टींना जरी आपण ठीक केले तरी आपले जीवन सुखी आणि निरोगी बनू शकेल. स्वस्थ शरीराने आणि मस्त मनाने राहण्यासाठी या सर्व गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे.

  शरीराचे स्वास्थ्य नीट कसे ठेवावे याचे ज्ञान आपल्याला वेगवेगळ्या साहित्यातून मिळते पण त्याच बरोबर ध्यान या विषयाकडे ही आपले लक्ष केंद्रित करावे. शरीराची इजा काही दिवसांनी, महिन्यांनी भरून निघते पण मनावर लागलेले घाव मात्र वर्षो न वर्षे गेली तरी भरून निघत नाहीत. त्यासाठी Meditation करणे गरजेचे आहे.

  Meditation या शब्दाचा अर्थ आहे To Heal. मनावर झालेल्या जखमांना भरून काढणे. नियमित आपण ध्यान करत गेले तर नक्कीच आपण जुन्या गोष्टींना सहज विसरू शकू तसेच दुसऱ्यांना माफ ही करू शकू. जुन्या दुःखद आठवणी ज्याला पकडून ठेवले आहे त्यांना सोडून मनाला बंधनातून मुक्त करण्याची शक्ति आपल्याला Meditation ने मिळते.

  चला तर मग आज २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिवस च्या निमित्ताने आपण स्वतःशीच एक प्रण करूया. “जे माझ्या शरीरसाठी व मनासाठी हानिकारक आहे त्या सर्व गोष्टींचा मी मनापासून निषेध करीन. नवीन सवयी आत्मसात करून त्यांना कायमस्वरूपी बनवण्याचा ध्यास घेईन. मी माझ्या या संकल्पावर ठाम राहीन, त्याचे मनापासून पालन करीन. कारण मला जीवनाच्या अंतिम श्वासापर्यंत स्वस्थ, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायचे आहे. स्वस्थ आणि मस्त राहायचे आहे.”