बेसावधपणा ठरेल जीवाशी खेळ!

२०२० प्रमाणेच २०२१ लासुद्धा कोरोनाचे ग्रहण लागले आहे. वर्ष उलटून गेले तरी या महामारीचे संकट काही संपत नाही. आता. दुसरी लाट आली आहे. विशेषत: महाराष्ट्रातील परिस्थिती अधिकच बिकट आणि चिंताजनक आहे. वर्षभराच्या कालावधीतील आकडेवारी पाहिली असता देशात सर्वात जास्त रुग्णांची संख्या महाराष्ट्रातच होती. या महामारीवर नियंत्रण मिळवले आहे, असे म्हणत असतानाच रुग्णांची संख्या वाढण्यात पुन्हा एकदा महाराष्ट्राचा हातभार सर्वाधिक आहे. देशातील इतर अनेक मोठ्या राज्यांमध्ये या महामारीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात आले आहे. तेथील रुग्णांची संख्याही घटत्या प्रमाणात आहे पण महाराष्ट्रात मात्र दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच चिंताजनक होत आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या वर्षी जनतेला संबोधित करताना ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवली होती. आपल्या कुटुंबाच्या आसपास कोरोना फिरकू नये याची जबाबदारी त्या कुटुंबाने घ्यावी, ही संकल्पना या मोहिमेमध्ये होती आणि या संकल्पनेला बर्‍यापैकी यशही मिळाले होते. नवीन वर्षामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी ‘मी जबाबदार’ या मोहिमेची घोषणा केली. प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून वर्तणूक ठेवली, तर कोरोना महामारीचे संकट वाढणार नाही, ही संकल्पना या मोहिमेमागे होती.

    पण जेवढे यश ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेला मिळाले तेवढे यश ‘मी जबाबदार’ या मोहिमेला मिळताना दिसत नाही. साहजिकच राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लोकडाऊन न करता कडक निर्बंध लादले जातील अशी घोषणा केली असली तरी लोकांच्या मनात लॉकडाऊनची भीती आहेच. २०२०-२१ हे आर्थिक वर्ष संपत आले असताना बहुतेक सर्व समाजघटकांना आर्थिक वर्षातील व्यवहार पूर्ण करण्याची चिंता आहे. त्यामुळे जर लॉकडाऊन झाले किंवा अतिशय कडक निर्बंध जरी लागू झाले तरी या सर्व व्यवहारांवर मर्यादा येणार आहेत.

    गेले संपूर्ण आर्थिक वर्ष लॉकडाऊन आणि कडक निर्बंध यामुळे वाया गेले असल्याने नव्या आर्थिक वर्षात तरी आपण नव्या उमेदीने व्यापार आणि व्यवसाय करू अशी आशा अनेकांच्या मनात आहे. ‘पण सध्याची परिस्थिती तशी नाही. ज्याअर्थी या महामारीचे संकट महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याअर्थी कोणत्या ना कोणत्या घटकाचा त्याला हातभार लागत आहे, हे उघड आहे. कोरोना ही संसर्गजन्य महामारी असल्याने जर मूलभूत नियम पाळण्यात आले नाहीत तर या महामारीची लाट तीव्र होण्याचा धोका आहे.

    सध्या महाराष्ट्रात रात्री अकरा ते सकाळी सहा या कालावधीमध्ये संचारबंदी असली तरी रात्री अकरापर्यंत देशातील सर्व शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. बाजारपेठा, व्यवहार, वाहतूक व्यवस्था हे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू असल्याने त्या ठिकाणची गर्दी कायम आहे, अशा ठिकाणी एका जरी बाधित व्यक्‍तीने मूलभूत नियमांचे पाळून केले नाही तरी महामारीचा धोका शंभर पट वाढण्याची शक्‍यता असते. एसटी महामंडळाने बस वाहतूक सुरू करत असताना ‘नो मास्क नो एन्ट्री अशी घोषणा केली असली तरी एकदा एसटी बसमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रत्येक प्रवासी नाका-तोंडावरील मास्क बाजूला घेऊनच प्रवास करतात.