बदललेल्या कोरोना विषाणूवरही लस प्रभावी

कोरोना विषाणू वरती लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुरवातीपासूनच नवीन तंत्रज्ञान वापरून, जर भविष्यात मूळ कोरोना विषाणूमध्ये जर काय बदल झाला तर लसींच्या मूळ स्वरूपात बदल करून नवीन लस लवकरत लवकर तयार करता येईल असे नियोजन केले होते.

डॉ. नानासाहेब थोरात

आज सर्वसामान्य लोकांच्या मनात जो सर्वात मोठा प्रश्न आहे की, सध्या प्रयोगशाळेत तयार होत असलेल्या लसी या काही दिवसापूर्वी ब्रिटनमध्ये जो कोरोना विषाणू सापडलेला आहे, त्यावरती कार्यक्षम असेल का? तर नुकताच ब्रिटन मध्ये आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अजून नवीन बदल घडून आलेला कोरोना विषाणूचा स्ट्रेन सापडलेला आहे तो १०० टक्के बदलून आलेला नसून मूळच्या कोरोना विषाणी मध्येच काही प्रमाणात बदल झालेला आहे.

कोरोना विषाणू वरती लस तयार करणाऱ्या कंपन्यांनी सुरवातीपासूनच नवीन तंत्रज्ञान वापरून, जर भविष्यात मूळ कोरोना विषाणूमध्ये जर काय बदल झाला तर लसींच्या मूळ स्वरूपात बदल करून नवीन लस लवकरत लवकर तयार करता येईल असे नियोजन केले होते.

फायझर कंपनीच्या शास्त्रज्ञांच्या दाव्यानुसार या तंत्रज्ञानामुळे जर अचानक कोरोना विषाणूच्या स्वरूपात बदल झाला तर जास्तीत जास्त ६ आठवडे म्हणजे ४२ दिवसांत लसींच्या मूळ स्वरूपात बदल करून नवीन लस तयार करता येईल. काही विषाणू स्वतःमध्ये एवढा बदल करतात की, ते लसीमुळे तयार झालेल्या प्रतिकारशक्तीला फसवू पण शकतो. तशी शक्यता आत्ताच्या नवीन तंत्रज्ञानामध्ये गृहीत धरलेली आहे. आत्ताच्या सर्व कंपन्यांच्या लसी या आपल्या प्रतिकारशक्तीला कोरोना व्हायरस वरती असणाऱ्या स्पाइक प्रोटीनला कसे ओळखायचे आणि त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज कशा तयार करायच्या याचे प्रशिक्षण देणाऱ्या आहेत. सध्या जो बदललेल्या स्वरूपातील कोरोना विषाणू आढळलेला आहे, त्याच्या स्पाइक प्रोटीन मध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेला नाही, जळपास त्याच्या स्पाइक प्रोटीनचे ९५ टक्के स्वरूप आधीच्या विषाणू सारखेच आहे. दुसरे सर्वात महत्वाचे म्हणजे आत्ताच्या लसी फक्त शरीरामध्ये फक्त अँटीबॉडीज तयार करत नाहीत. तर व्हायरस मुळे संसर्ग झालेल्या पेशीनांसुद्धा कसे शरीरातून बाहेर काढायचे याचे सुद्धा प्रशिक्षण आपल्या प्रतिकारशक्तीला देत आहेत. यामुळे जरी मूळ विषाणूमध्ये ९५ टक्के पेक्षा अधिक बदल झाला तरी या सर्व लसी ५० टक्के पेक्षा अधिक परिणामकारक ठरतील आणि विषाणूचे तीव्र संक्रमण रोखता येईल.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन यांनी या कोरोना व्हायरसमध्ये भविष्यात अजून कोणत्या प्रकारचे बदल होऊ शकतील आणि ते आधीच कसे ओळखता येतील यावर संयुक्तपणे प्रयोग सुरु केले आहेत. यामुळे भविष्यातील होणारे तीव्र संक्रमण कमी करता येतील. तसेच ऑक्सफर्ड, फायझर आणि मॉडर्ना या कंपन्यांनी नवीन बदलून आलेल्या स्ट्रेन वरती लसींचा कितपत परिणाम होतेय याच्या फेज ३ चाचण्या सुरु केल्या आहेत. त्यामुळे जरी नवीन स्ट्रेन पसराय सुरवात झाली तरी त्यावरील लस पण तितक्याच लवकर तयार होईल.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका/सिरम लसीला मान्यता मिळाण्याचा मार्ग मोकळा

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये विकसित झालेली आणि अ‍ॅस्ट्रा झेनेका/सिरम कंपनीच्या साहाय्याने उत्पादित होत असलेल्या कोरोना व्हायरसवरील लसीला वेगेवेगळ्या देशांच्या नियामक मंडळाकडून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेकाने जगभरात विविध देशामध्ये केलेल्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे तपशीलवार परिपूर्ण विश्लेषण जगप्रसिद्ध मेडिकल जर्नल ‘लॅन्सेट’ मध्ये ८ डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आले आहेत. तसेच हि सर्व माहिती ब्रिटिश सरकारला सोमवारी म्हणजे २१ डिसेंबरला प्रस्तुत केली आहे. या माहितीचा आधार घेऊन ब्रिटन मधील मेडिसिन्स आणि हेल्थकेअर रेग्युलेटरी ऑथॉरिटी (MHRA) युरोपियन युनियन मधील २७ देशांची युरोपियन मेडिकल एजेन्सी (EMA ), तसेच भारतातील केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्था, अ‍ॅस्ट्रा झेनेका/सिरम कंपनीच्या लसीला लवकरात लवकर आणीबाणी वापर प्राधिकृतता म्हणजेच इमर्जन्सी ऑथोरायझेशन एप्रूव्हल (EUA) देण्यासाठी निर्णय घेतील.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेकाच्या तिसऱ्या टप्पयातील क्लिनिकल ट्रायलचे विश्लेषण

२३ एप्रिल ते ४ नोव्हेंबर २०२० या कालावधीत पहिल्या ते तिसऱ्या टप्पयातील क्लिनिकल ट्रायलसाठी जवळपास २३,८४८ स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला होता. त्यामधील तिसऱ्या टप्प्यासाठी ११,६३६ (यूकेमध्ये ७५४८, आणि ब्राझीलमध्ये ४०८८ ) स्वयंसेवक सहभागी केले गेले होते.या सर्व चाचण्यांसाठी १८ ते ५५, ५६ ते ६९ आणि ७० वर्षावरील वृद्ध असे तीन भाग करण्यात आले होते. हे सर्व स्वयंसेवक निरोगी किंवा पूर्वलक्षीत कोणताही मोठा आजार नसलेले (कॅन्सर, मधुमेह, रक्तदाब किंवा कावीळ ) होते. तर ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेकाच्या माहितीनुसार सध्या असे आजार असणाऱ्या रुग्णांच्यावरती तसेच १८ वर्षंखालील युवक आणि लहान मुलांच्यावर तिसऱ्या टप्पयातील चाचण्या चालूं असून लवकरच त्याचे निष्कर्ष जाहीर केले जातील. ब्रिटनमधील २० ठिकाणी तर ब्राझीलमधील ३ शहरामधील हॉस्पिटल्स मध्ये या चाचण्या घेण्यात आल्या. ब्रिटनमध्ये घेण्यात आलेल्या चाचणीमध्ये निरोगी महिला आणि सर्व प्रकारच्या वांशिक लोकांचा समावेश करण्यात आला, उदा: आफ्रिकन वंशीय, एशियन आणि इतर युरोपियन लोक.

कशाप्रकारे चाचण्या घेण्यात आल्या ?

आजपर्यंत सर्व कंपन्या लस आणि औषधांच्या चाचण्या कशा प्रकारे घेतात, अंतरिम निकालांसाठी नक्की कोणते मापदंड लावतात हे गुप्त ठेवत होते किंवा फक्त सरकारी मानक नियंत्रण संस्थाना याची माहिती देत असत. ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेकाने मात्र यावेळी हि सर्व माहिती जगासमोर आणली आहे, ‘द लॅन्सेट’ या जर्नलच्या वेबसाईटवरती हि सर्व माहिती इंग्लिशमध्ये उपलब्ध आहे. या चाचण्यांसाठी लसीचे उत्पादन अ‍ॅस्ट्रा झेनेकाच्या इटलीमधील आणि ब्रिटन मधील प्लांट मध्ये घेण्यात आले. पहिल्या प्रयोगामध्ये एका व्यक्तीला पहिला ०.२२५ मिली (म्हणजे २२५ मायक्रोलिटर) डोस देण्यात आला, यामध्ये जवळपास २.२ X १०चा दहावा घात म्हणजेच दोन बिलियन (दोन हजार कोटी) निष्क्रिय व्हायरस पार्टिकल्स होते. २८ दिवसांनंतर दुसरा डोस हा ०.५ मिलीचा, 3.५-६.५ X १०चा दहावा घात म्हणजेच साडेतीन ते साडेसहा बिलियन (साडेतीन ते साडेसहा हजार कोटी) निष्क्रिय व्हायरस पार्टिकल्सचा होता. दुसऱ्या प्रयोगामध्ये सर्व स्वयंसेवकांना पहिला आणि दुसरा डोस सारखाच म्हणजे ०.५ मिलीचा, 3.५-६.५ X १०चा दहावा घात म्हणजेच साडेतीन ते साडेसहा बिलियन (साडेतीन ते साडेसहा हजार कोटी) निष्क्रिय व्हायरस पार्टिकल्सचा दिला होता. या दोन्ही प्रयोगातील निष्कर्ष वेगवेगळे आहेत. सर्व स्वयंसेवकांना डोस दिल्यानंतर कमीत कमी ३० मिनिट हॉस्पिटल्समध्येच निरीक्षणाखाली ठेवले गेले. लस दिलेल्या सर्व स्वयंसेवकांची कोरोनाविरुद्ध तय्यार होणारी रोगप्रतिकारक क्षमता ७,१४ आणि २८ दिवसानंतर (पहिला डोस दिल्यानंतर) आणि १४ आणि २८ दिवसानंतर (दुसरा डोस दिल्यानंतर) तपासण्यात आली.

चाचणींचे निष्कर्ष काय आलेत ?

जेव्हा विविध डोसिंग सिस्टमचे डेटा एकत्र केले गेले, तेव्हा अभ्यासात असे दिसून आले आहे की, ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेकाने लस रोगलाक्षणिक (सिमटोमॅटीक) कोरोनाव्हायरस संसर्ग रोखण्यासाठी ७०% प्रभावी आहे. पहिला अर्धा (०.२२ मिली ) आणि दुसरा पूर्ण (०.५ मिली) डोस दिलेल्या लोकांच्यात हि लस मात्र ९० टक्के प्रभावी आहे, तर दोन्ही पूर्ण (०.५ मिली) डोस दिलेल्या लोकांच्यात हि लस मात्र ६२% प्रभावी आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हि लस लक्षणे नसलेल्या (असिमटोमॅटीक) लोकनाच्यावर मात्र फार प्रभावी आहे.

यासाठी कंपनीने लस दिल्यानंतर सर्व स्वयंसेवकांची प्रत्येक आठ दिवसानंतर स्वाब टेस्ट घेतली आणि लस दिलेल्या लोकांच्यामध्ये कोरोनाव्हायरसची असिमटोमॅटीक लक्षणे दिसतात का हे पहिले. या प्रयोगाच्या निष्कर्षानुसार लस घेतलेल्या कोणत्याही स्वयंसेवकांमध्ये सिमटोमॅटीक लक्षणे, किंवा त्यांना हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करण्याची गरज लागली नाही. जाहीर केलेल्या माहितीनुसार कमी-डोसची मात्र दिल्यानंतर असिमटोमॅटीक लक्षणांचे प्रमाण असणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी होऊन हि लस कोरोनाव्हायरसचे संक्रमण कमी करण्यात 60% प्रभावी आहे. फायझर आणि मॉडर्न कंपनीने मात्र अशा प्रकारच्या चाचण्या घेतल्या नाहीत, त्यामुळे त्यांची लस कोरोनाव्हायरसची असिमटोमॅटीक लक्षणे असणाऱ्या रुग्णांना किती उपयोगी आहे हे समजत नाही.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका लस नक्की कशी कार्य करते ?

सर्व स्वयंसेवकांना दिलेल्या लसीच्या डोस वरून असे दिसून आले कि, लस म्हणजेच निष्क्रिय व्हायरस पार्टिकल्स शरीरामध्ये गेल्यावर, शरीरातील रोगप्रतिकारक प्रणाली मध्ये कोरोनाव्हायरस मध्ये असणाऱ्या स्पाइक प्रोटीन विरुद्ध अँटी-स्पाइक प्रोटीन प्रेरित करण्यासाठी मदत करतेय. लसीचा एकच डोस दिल्यानंतर शरीरामधील पेशीमध्ये प्रतिरक्षा (कोरोनाव्हायरस विरुद्ध लढण्यासाठीची क्षमता) निर्माण होत आहे आणि यामुळे श्वसनमार्गाच्या आणि फुफुसांच्या संसर्गापासून संरक्षण मिळत आहे. हि लस सर्व वयोगटातील लोकांमध्ये कोरोनाव्हायरसवरती असणाऱ्या स्पाइक ग्लायकोप्रोटीन विरुद्ध प्रतिपिंडे (अँटीबॉडीज)आणि पेशीय रोगप्रतिकारक प्रतिक्रिया मजबूत करण्यास मदत करत आहे.

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्रा झेनेका लसीचे कोणते दुष्परिणाम दिसले ?

लस दिलेल्या स्वयंसेवकांमध्ये इतर लसी दिल्यानंतर ज्या प्रतिक्रिया दिसतात त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया दिसल्या. तसेच काही स्वयंसेवकांमध्ये तात्पुरती डोकेदुखी, लस टोचली त्या खांद्याच्या जागेवर वेदना, एक-दोन दिवसासाठी ताप येणे, अंगदुखी किंवा स्नायू वेदना अशी लक्षणे दिसली. सर्व चाचणीच्या अभ्यासाच्या कालावधीत १३ गंभीर प्रतिकूल घटना घडल्या, मात्र त्यातील कोणतीही घटना लसी संबंधित दिलेल्या नाहीत. या सर्व चाचणीदरम्यान कोणत्याही स्वयंसेवकांला अचानक हॉस्पिटल मध्ये दाखल करावे लागले नाही.

(लेखक ऑक्सफर्ड विद्यापीठात वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)