अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाकडून काय आहेत प्रकाशकांच्या अपेक्षा?

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक येथे होत आहे. कोरोनाचा फटका आणि नुकसान सर्वंच क्षेत्रांना झाले आहे. तसा फटका पुस्तकं छापणाऱ्या प्रकाशकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळं प्रकाशकांच्या ह्या साहित्य संमेलनात काय अपेक्षा आहेत. कोरोनाच्या मागील दिड-दोन वर्षात डिजीटलायझेशन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ओटीटी प्लटफॉर्म, पीडिएफ, स्टोरी एँप, ऑडिओ क्लिप या सर्वांमुळं वाचक, लेखक, साहित्यिक आणि कवी हे सर्वंच छापील पुस्तकापासून थोडं दूर झाले, परिणामी पुस्तकं छापण्यासाठी प्रकाशकांकडे वरील सर्वांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तसेच नवोदित प्रतिभावान लेखकांची संख्या सुद्धा मागील काही वर्षापासून रोडावल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आगामी काळात प्रकाशकांना उभारी घेण्यासाठी किंवा प्रकाशकांना स्थिरावण्याठी थोडा वेळ लागेल. प्रकाशकांना गतवैभव प्राप्त होईल पण त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाकडून किंवा शासनाकडून प्रकाशकांच्या काय आहेत अपेक्षा? प्रकाशकांच्या काय मागण्या आहेत, याचा धांडोळा घेणारा हा लेख.

    साहित्य संमेलन म्हणजे सारस्वतांचा मेळा! साहित्य संमेलन म्हणजे पुस्तकप्रेंमीसाठी आणि वाचकप्रेंमीसाठी जणू पर्वणीच! या वर्षी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होऊ घातले आहे. कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर हे साहित्य संमेलन लांबवणीवर पडले. उस्मानाबाद इथले जानेवारी २०२० मध्ये ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले होते. त्यानंतर दिड-दोन वर्षांनी, कोरोनानंतर पहिल्यांदाच मराठी साहित्य संमेलन होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, नाशिक येथे होत आहे. कोरोनाचा फटका आणि नुकसान सर्वंच क्षेत्रांना बसले आहे. तसा फटका पुस्तकं छापणाऱ्या प्रकाशकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळं प्रकाशकांच्या ह्या साहित्य संमेलनात काय अपेक्षा आहेत. कोरोनाच्या मागील दिड-दोन वर्षात डिजीटलायझेशन मोठ्या प्रमाणात झाले आहे. ओटीटी प्लटफॉर्म, पीडिएफ, स्टोरी एँप, ऑडिओ क्लिप या सर्वांमुळं वाचक, लेखक, साहित्यिक आणि कवी हे सर्वंच छापील पुस्तकापासून थोडं दूर झाले, परिणामी पुस्तकं छापण्यासाठी प्रकाशकांकडे वरील सर्वांनी पाठ फिरवल्याचे चित्र आहे. तसेच नवोदित प्रतिभावान लेखकांची संख्या सुद्धा मागील काही वर्षापासून रोडावल्याची वस्तुस्थिती नाकारता येत नाही. हल्लीच्या काळात म्हणजे मागील १५-२० वर्षात एखादा नामवंत लेखक उदयास आल्याचे चित्र दुर्मिळ आहे. महाराष्ट्रात पुल किंवा आचार्य अत्रे सारखे अष्टपैलू आणि प्रतिभावान लेखक निर्माण झाले नाहीत हे कटू सत्य आहे. नवोदित लेखक पाच-सहा वर्षात लक्षात राहतीत, अशी त्यांची कारकिर्द राहिली आहे. चांगले पैसे मिळत नसल्यामुळं लेखक सुदधा या क्षेत्रात येत नाहीत, हे सुद्धा एक कारण आहे. आणि उत्तम, सकस, वैचारिक, वाचकांना भावेल किंबहुना वाचकांना विचार करायला भाग पाडेल असं लेखन किंवा लेखक नसल्यानं लेखकांवर प्रकाशक पैस लावत नाहीत, किंवा चोखंदळ वाचक पुस्तकं विकत घेत नाही, ही वास्तुस्थिती आहे. ले-आऊट, डीटीपी व छापील पुस्तकाला जास्त खर्च येत असल्यामुळं पीडिएफला लेखकांनी प्राधान्य दिले आहे. त्यामुळं लेखकांचा खर्च वाचतो, याचा परिणाम प्रकाशकांवार मोठ्या प्रमाणात झाला आहे, होत आहे. त्यामुळं आगामी काळात प्रकाशकांना उभारी घेण्यासाठी किंवा प्रकाशकांना स्थिरावण्याठी थोडा वेळ लागेल. प्रकाशकांना गतवैभव प्राप्त होईल पण त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला पाहिजे.

    ओटीटी, ऑडिओ क्लिप व पीडीएफचा परिणाम पुस्तक छापाईवर?
    महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध आणि नामवंत प्रकाशक आहेत. राजहंस, मेहता, ग्रंथाली, मॅजेस्टिक, साधना, मौज इत्यादी प्रकाशक अनेक वर्षापासून चांगल्या पुस्तकांचे प्रकाशन करत आहे. पण आता परिस्थिती बदलली आहे. कोरोनानंतर तर अनेक बाबींवर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळं प्रकाशकांनी सुद्धा काळानुरुप बदलले पाहिजे, त्यासाठी शासनाने पाठी उभे राहिले पाहिजे असं अनेक प्रकाशकांनी म्हटले आहे. सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग समजले जाते, आताची पिढी सोशल मीडियाला प्राधान्य देत अनेक गोष्टी या लीलया सोशल मीडियावरुनच करतात, आताच्या पिढिला सर्व काही इन्सटंन्ट हवे आहे. जसा काळ आणि परिस्थिती बदलली तसा “जुन्या गोष्टी जपत नवीन गोष्टींचे स्वागत केले पाहिजे” असा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळं काळानुरुप सर्वंच क्षेत्रात बदल होत आहे, आणि चांगला बदलाचे स्वागत आणि अनुकरण केले पाहिजे. १०-१५ वर्षापूर्वी आपण पुस्तक वाचत होतो, परंतू आत्ता पुस्तक वाचण्यांकडे अनेकांचा कल कमी झाला आहे. अनेकजण ऑनलाईन, पीडिएफ, किंवा स्टोरी एँपच्या माध्यामातून पुस्तकं वाचतायेत. त्यामुळं कुठंतरी या सर्वांचा परीणाम पुस्तक छपाईवर झाल्याचे दिसून येते. पण प्रकाशकांनी मात्र या उलट प्रतिक्रिया दिली आहे. ओटीटी, ऑडिओ क्लिप व पीडीएफचा परिणाम पुस्तक छापाईवर झालेला नाही असं मेहता प्रकाशकाचे सुनील मेहता यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी साहित्य संमेलनाकडून आणि सरकारकडून माफक अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. “पुस्तकांचे स्टॉल प्रकाशकांचा गरजेनुसार उपलब्ध करुन दिले पाहिजेत. जेणेकरुन पुस्तकांची माहिती जास्त लोकांपर्यंत आणि पुस्तकांची विक्री सुदधा अधिक होईल. स्टॉलच्या ठिकाणी सुविधा व सुरक्षितता हवी, संमेलनावेळी स्टॉलधारकांचे वाटप १५ दिवस आधी केले पाहिजे. तसेच ओटीटी, ऑडिओ क्लिप किंवा पीडीएफचा परिणाम पुस्तकं छापाईवर झाला नाही, ज्यांना ऑडिओ क्लिप ऐकायची आहेत, ते ऑडिओ क्लिप ऐकतायेत, ज्यांना पुस्तकं वाचायची आहेत, ते पुस्तकं वाचताहेत. कुठलाही प्लटफॉर्म ऐकमेकांस स्पर्धक नसतो. कोरोनानंतर जर एखाद्या प्रकाशकाकडे पैसे कमी असतील तर, त्यांनी पीडिएफच पर्याय निवडला तर त्यात गैर काय? उलट पीडिएफमुळं इतर खर्च वाचतो, असं मेहता प्रकाशनचे सुनील मेहता यांनी म्हटले आहे.”

    प्रकाशक नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब स्विकारणार?
    ओटीटी प्लॅटफॉर्ममुळं आणि डिजीटलायझेशनमुळं छापील पुस्तकांवर निश्चितच परिणाम जाणवत आहे. काळानुरुप परिस्थिती बदलत आहे. त्यामुळं नवीन पिढी डिजीटलायझेशन अधिक प्राधान्य देत आहे. जग वेगाने बदलत आहे. त्यामुळं प्रकाशकांनी सुद्धा काळाबरोबर चालले पाहिजे, तरच स्पर्धेत टिकता येईल. ई-बुक, ऑडिओ क्लिप, विविध रिडिंग एँप इत्यादी बाजारात नवनवीन आणि वाचकांना आकर्षित करण्यासाठी येत आहे. पुस्तकाच्या किंमतीच्या दहा ते वीस टक्के खर्चांत वरील पर्यायामुळं जर वाचकांना पुस्तकं वाचायला मिळत असेल, तर नक्कीच वाचक यालाच पंसती देतील, त्यामुळं आता वेळ आली आहे की, प्रकाशकांनी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करुन स्वत:मध्ये बदल केला पाहिजे तरच ‘प्रकाशकांना अच्छे दिन येतील’ गैरमार्गांने पीडिएफ आणि रस्त्यावर पायरेटेड करुन पुस्तकं विकणाऱ्यांवर बंदी आणली पाहिजे, यामुळं प्रकाशकांकडे पुस्तक छापण्यास लेखक वळतील. ई-बुकमुळं प्रकाशकांना रॉयल्टी मिळते. पण गैरमार्गांने ई-बुकची विक्री थांबवली पाहिजे. यावर सरकारने तोडगा काढला पाहिजे तरच प्रकाशक बाजारात टिकेल असं सुद्धा प्रकाशकांना वाटत आहे “जी ग्रंथालय आहेत, त्यांना सरकारने ग्रँड दिली पाहिजे, त्यामुळं स्वाभाविकपणे ग्रंथालय प्रकाशकांकडे येतील. सरकारने पेपर आणि प्रिन्टिंगवरील जीएसटी कमी केला पाहिजे. कारण सध्या पट्रोल-डिझेलचे भाव गगनाला भिडले असल्यामुळं ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढले आहेत. त्यात जीएसटीची भर, परिणामी प्रकाशकांना पुस्तकं छापणे मोठं जिकिरीचं ठरतंय, आम्हाला सबसिडी नको, पण वरील दोन्ही गोष्टी सरकारने कमी कराव्यात अशी आमची अपेक्षा आहे, असं ग्रंथाली प्रकाशनाचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी म्हटले आहे.”

    नव्या लेखकांची उदासीनता? नव्या विषयांचा दुष्काळ?
    साहित्यविश्वात किंवा अन्य क्षेत्रात काहीच कायमस्वरुपी राहत नाही. काळानुरुप बदल हा होतोच, तो आपण स्विकारला पाहिजे. नवीन लेखकांचा काळ गेला आहे, दिर्घ काळासाठी कोणीही लेखक लक्षात राहतील असं मागील अनेक वर्षापासून दिसत नाहिय. जुन्या पिढिची आवड वेगळी होती, आत्ताच्या पिढिची आवड वेगळी आहे. तसेच पुढील पाच-दहा वर्षानी नवीन पिढिला खांडेकर, कुसुमाग्रज, पुल किंवा अत्रे माहित असतील का? अशी सुदधा शंका आहे. लेखन या क्षेत्रात चांगले पैसे मिळत नसल्यामुळं या क्षेत्रात फारसे कोणी पुढे येत नाही ही वस्तुस्थिती आहे. किंवा चांगलं सकस, वैचारिक लेखन नसल्यामुळं प्रकाशक सुदधा पुस्तकं छापण्यास धजावत नाहीत, “पूर्वीपासून जे जुने चांगले साहित्य आहे त्याचेच वाचन केले जात आहे, सध्या मराठी साहित्यात नवीन उत्तम दर्जांची साहित्यनिर्मिती झाली नसल्याची खंत मौज प्रकाशनाचे मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली आहे,” अशी विविध कारणे असू शकतात. मागील अनेक वर्षापासून कल्पकता, नावीन्य, विषय, किंवा बौद्धिक पातळीवर रुचेल असं लेखन झालं नाहीय, ही परिस्थिती मराठी साहित्यात आहे ही बदलली पाहिजे. नवीन लेखक, कवी, साहित्यिक उदयास आले पाहिजेत, तरच प्रकाशक सुदधा बाजारात तग धरु शकेल, अन्यथा आगामी काळात परिस्थिती बिकट झाल्यास नवल वाटायला नको.

    साहित्य संमेलनात प्रकाशकांचा सहभाग महत्त्वाचा
    अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशकांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असतो. कारण वर्षातून एकदा विविध लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन, वाचकांनी होणारी मोठी गर्दी यामुळं पुस्तकांची बऱ्यापैकी विक्री होतेय. त्यामुळं साहित्य संमेलनात प्रकाशकांचा सहभाग महत्त्वाचा मानला जातो. परंतू “या वर्षीच्या साहित्य संमेलनात प्रकाशक पाठ फिरवतील असं मौज प्रकाशनाचे मिलिंद जोशी यांनी म्हटले आहे. कारण नाशिक येथे होणारे यावर्षीची संमेलन हे मुख्य शहरांपासून खूप लांब आहे, येण्याजाण्यासाठी लांब अंतर, खर्च आदी बाबींची समस्या आहे. त्यामुळं प्रकाशकांना ते परवडणारे नसल्यामुळं या साहित्य संमेलनात प्रकाशक पाठ फिरवतील असंही मिलिंद जोशी यांनी म्हटले आहे. तसेच पीडिएफ आणि गैरमार्गाने होणाऱ्या पुस्तक विक्रिवर बंदी आणली पाहिजे, एवढी आमची अपेक्षा असल्याचं मौज प्रकाशनाचे मिलिंद जोशी यांनी म्हटले आहे.”

    प्रकाशकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागतोय
    कोरोनाच्या सर्वंच क्षेत्रावर परिणाम झाला आहे, तसा तो प्रकाशकांवर सुद्धा झाला आहे. प्रकाशकांना सध्या अनेक गोष्टींचा सामना करावा लागतोय. सोशल मीडियामुळं वाचकांनी छापील पुस्तकांकडे पाठ फिरवली आहे, असे सध्या तरी चित्र दिसतेय. “सध्या पुस्तक प्रकाशक फार अडचणीत आहे. त्यातच कोराणाने तर पार कंबरडे मोडले आहे, पुस्तक प्रदर्शनं बंद आहेत आणि काही ठिकाणी चालू झालीच तर विकत घेणाऱ्यांचा अल्प प्रतिसाद मिळतोय. वाचक वर्ग मंदावलेला आहे. छपाईचा, कागदाचा खर्च वाढलेला आहे. लोकांना सोशल मिडीयाचं माध्यम प्रभावी वाटत आहे. त्यामुळे नव्याने लिहणारी पिढी व वाचक ई-बुकला पसंती देतायेत. आमच्यासारख्या नव्याने व्यवसाय करू इच्छिणाऱ्या प्रकाशकांना तर मार्केटच उपलब्ध नाही. जुन्याच पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या येतायेत, त्याच पुस्तकांचा धंदा जोरात आहे. आमच्यासारख्या प्रकाशकांना पुस्तकं प्रकाशित करणं आणि विक्री करणं फार कठीण होऊन बसलं आहे. लेखक आणि प्रकाशक वाचक मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहोतच. पण शासनाने सुद्धा वाचक आणि वाचन चळवळ वाढवण्यासाठी शासनाच्या स्तरावर प्रयत्न करणं आणि मदत करणं गरजेचं आहे, अशी अपेक्षा शिवारबा प्रकाशनचे, प्रकाश केसरकर यांनी केली आहे. लेखक व प्रकाशक म्हणजे आताच्या घडीला माझ्यामते तरी हसण्याचा विषय किंवा बिनकामाचा माणूस असाच झाला आहे. असं परखड मत कोल्हापूरातील शिवारबा प्रकाशनाचे, प्रकाश केसरकर यांनी मांडले आहे.”

    आगामी काळात प्रकाशकांसमोरील आव्हाने
    आगामी काळात प्रकाशकांसमोर अनेक आव्हानं आहेत, सोशल मीडिया, डिजिटलायझेशन, पीडिएफ, ई-बुक आदी बाबी यावर मात करण्यासाठी प्रकाशकांनी सुद्धा बदल करुन, वाचकांना आकर्षक केले पाहिजे. यासाठी नवोदित प्रतिभावान लेखक, कवी, साहित्यिक यांनी दर्जेदार आणि सद्सद्विवेकबुद्धीला चालना देणारे लेखन करणे गरजेचं आहे. प्रकाशकांच्या आव्हांनाना सामोरी जाण्यासाठी, आणि प्रकाशकांना बाजारात गतवैभव मिळवून देण्यासाठी शासनाने मदत केली पाहिजे असं सुद्धा प्रकाशकांनी म्हटले आहे. दिड-दोन वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यामुळं उत्साह, वाचकांची गर्दी, पुस्तकांचे प्रदर्शनं, लेखक, कवींची वर्दळ हे ओघाने आलेच. पण पुस्तक चळवळ आणि वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि ती वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. आगामी काळात प्रकाशकांसमोर अनेक आव्हानं आहेत, आणि त्यांना सामोरी जाण्यासाठी लेखक, साहित्यिक, कवी, वाचक, शासन आणि साहित्य मंडळ यांनी पुढाकार घेतला पाहिजे. तरच ‘प्रकाशकांना भविष्यात गतवैभव प्राप्त होऊन अच्छे दिन येतील.’ असं म्हटलं तर ते वावगं ठरु नये.