What efforts are being made to develop a safe and effective covid-19 vaccine

आज संपूर्ण जग कोविड-१९ ने उभ्या केलेल्या आरोग्यविषयक समस्यांचा तसेच आर्थिक संकटाचा सामना करत असताना, या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या लसींची संभाव्यता लवकरात लवकर खुली करणे अनिवार्य आहे. या विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी, या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे व मृत्यू टाळता यावेत यासाठी जगभरातील संशोधक या आजारावरील लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत.

डॉ. संजीव कुमार,

अध्यक्ष, इंडियन अकॅडमी ऑफ पब्लिक हेल्थ आणि इंडियन अलायन्स ऑफ पेशन्ट्स ग्रुप,

माजी ज्येष्ठ सल्लागार, युनिसेफ आणि माजी संचालक, आयआयएचएमआर

आज संपूर्ण जग कोविड-१९ ने उभ्या केलेल्या आरोग्यविषयक समस्यांचा तसेच आर्थिक संकटाचा सामना करत असताना, या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असलेल्या लसींची संभाव्यता लवकरात लवकर खुली करणे अनिवार्य आहे. या विषाणूवर नियंत्रण मिळविण्यासाठी, या आजाराच्या संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे व मृत्यू टाळता यावेत यासाठी जगभरातील संशोधक या आजारावरील लस विकसित करण्याचे प्रयत्न करत आहेत. अशी लस शोधली गेल्यास आरोग्यव्यवस्थेवरील ताण कमी होईलच, पण त्याचबरोबर वारंवार हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज कमी होईल आणि सरकार व सर्वसामान्य माणसे अशा दोहोंकडूनही आरोग्याच्या देखभालीवर होणारा खर्च कमी होऊ शकेल.

फास्ट-ट्रॅकिंग : लस विकसित करण्याची आदर्श पद्धती

या पॅनडेमिकच्या स्थितीत लस विकसित करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळावा यासाठी जगभरातील तज्ज्ञ, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटना आणि विविध राष्ट्रांची सरकारे यांच्यात अभूतपूर्व अशी भागीदारी तयार झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्‍ल्‍यूएचओ) ॲक्सेस टू कोविड-१९ टूल्स ॲक्सलरेटरचा भाग असलेला कोव्‍हॅक्‍स उपक्रम कोॲलिशन फॉर एपिडेमिक प्रीपेअर्डनेस इनोव्हेशन्स (सीईपीआय) अंतर्गत लसी आणि उपचारांच्या उपलब्धतेची गती वाढविण्याच्या दृष्टीने काम करत आहे.

अपडेट्ससाठी येथे क्लिक करा.

आजघडीला १५० हून अधिक लसी या चाचणीच्या टप्प्यात आहेत, यातील ॲस्टाझेनेका (यूके), मॉडर्ना (यूएस), स्पुटनिक व्ही (रशिया), कॅनसिनो बायोलॉजिकल्स (चीन) इत्यादींसह अगदी मोजक्या लसींची चाचणी प्रगत तिस-या टप्प्यामध्ये पोहोचली आहे. स्पुटनिक व्ही ही एखाद्या देशातील पहिलीच नोंदणीप्राप्त लस असावी. अशाप्रकारे लस विकसित करण्याचे प्रयत्न अतिशय वेगाने केले जात असल्यामुळे या लसींची सुरक्षितता व परिणामकारकता यांच्याबाबत अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. जगाच्या इतिहासात आजवर कधीही एखादी लस वर्षा-दोन वर्षांत विकसित केली गेलेली नाही हे मला मान्य आहे. अनेक दशकांच्या वैज्ञानिक प्रयत्नांनतरही मलेरिया आणि एचआयव्ही या आजारांवर लस सापडलेली नाही ही गोष्टही आपण लक्षात ठेवायला हवी. पण या सर्व वर्षांमध्ये विज्ञानाने बरीच मजल गाठली आहे, हेही खरे आहे.

देशी बनावटीची कोव्हॅक्सिन (भारत बायोटेक) ही स्वत:ची लस विकसित करणारा भारत हा या लसींच्या चाचणी व उत्पादनाच्या क्षेत्रातील एक तगडा स्पर्धक आहे आणि इथे किमान तीन किंवा त्याहून अधिक लसी या चाचणीच्या ब-याच पुढच्या टप्प्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. सर्व प्रमुख व्हॅक्सिन कंपन्या आपल्या लसींच्या उत्पादनासाठी भारताकडे सहयोग मागत आहेत.

पूर्वी एखाद्या रोगकारक विषाणूच्या विरोधात लस तयार करण्यासाठी आधी त्या विषाणूची रचना समजून घ्यायला वैज्ञानिकांना अनेक वर्ष लागायची, पण कोविड-१९ ची गोष्ट वेगळी आहे. माझ्या आठवणीप्रमाणे यावर्षीच्या जानेवारी महिन्यातच वैज्ञानिकांनी कोरोना व्हायरस १९ (कोविड-१९) च्या रचनेचा उलगडा केला आणि लसीमधील अँटीबॉडीज विकसित करण्यासाठी या विषाणूच्या कोणत्या भागांचा वापर करता येईल याचा शोध लावला. याच वेगाने प्रगती होत राहिली तर सुरक्षित व परिणामकारक लस लवकरच जगापर्यंत पोहोचेल, याची मला खात्री आहे आणि आशा आहे.

सुरक्षितता आणि कार्यक्षमता यांच्याशी तडजोड नको

इथे एक मुद्दा आवर्जून नोंदवायला हवा, आणि तो म्हणजे मानवी आरोग्यामध्ये लक्षणीयरित्या व अत्यंत वाजवी दरात सुधारणा घडवून आणण्यासाठी राबवल्या जाणा-या अनेक सार्वजनिक आरोग्य उपक्रमांपेक्षाही लसीकरणाचा मार्ग अधिक यशस्वी ठरला आहे. लसीकरणाच्याच मदतीने आपण देवीसारख्या साथींचे यशस्वीपणे उच्चाटन केले आहे आणि पोलिओमायलीटीस या आणखी एका आजाराचे उच्चाटन करण्याच्या अंतिम टप्प्यावर आहोत. दरवर्षी लसींचे कोट्यवधी डोस दिले जातात आणि त्यातून लक्षावधी जीव वाचतात. असे असले तरीही, कोणत्याही लसीची सुरक्षितता आणि कार्यक्षमता ही एखादा संसर्गजन्य आजार आटोक्यात ठेवण्याच्या कामी, त्या आजाराला प्रतिबंध करण्याच्या कामी ती किती यशस्वी होते, यावर अवलंबून असते.

सध्या जगभरामध्ये १५० हून अधिक लसींच्या क्लिनिकल ट्रायल्स सुरू असून त्याद्वारे त्यांची सुरक्षितता आणि कोविड-१९ च्या विरोधातील तिची परिणामकारकता तपासली जात आहे. एखादी लस प्री-क्लिनिकल आणि त्यानंतर क्लिनिकल चाचण्यांच्या तीन टप्प्यामधून जाताना कोणकोणत्या परीक्षांना सामोरी जाते हे आता आपण समजून घेऊ या. आपण स्पुटनिक व्ही चे उदाहण घेऊ. ही लस मानवी एडेनोव्हायरसेसचा वापर करणा-या एका तांत्रिक प्लॅटफॉर्मवर आधारित आहे व तिने आपला सुरक्षिततेचा टप्पा पार केला आहे. प्री-क्लिनिकल ट्रायल्समध्ये प्राण्यांवर या लसीचा प्रयोग केल्यानंतर आणि क्लिनिकल चाचण्यांच्या १, २ आणि ३ टप्प्यांनंतर लस देताना किंचित दुखणे किंवा डोकेदुखी, स्नायूदुखी व ताप यांसारखी लक्षणे वगळता कोणतेही मोठे दुष्परिणाम दिसून आले नाहीत.

ही लस गामालेया इन्स्टिट्यूटने विकसित केली आहे. गामालेया ही एक विश्वासार्ह संस्था आहे, कारण याच संस्थेने सहा वर्षांपूर्वी अशाच प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर इबोलावरील लसही विकसित केली होती. याशिवाय प्रत्येक देश दुस-या देशांमध्ये विकसित केलेल्या लसींची सुरक्षितता व कार्यक्षमता यांच्याशी निगडित आकडेवारीचा अभ्यास करत असतो आणि मगच तिस-या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या जातात. या चाचण्यांचे निष्कर्ष अत्यंत चिकित्सक पद्धतीने तपासले गेल्यानंतरच लसीला वापरासाठी मान्यता मिळते. भारताने या लसीच्या क्लिनिकल चाचणीला परवानगी दिली आहे. इबोलावरील लससुद्धा हीच पद्धती वापरून विकसित करण्यात आली होती व आफ्रिकेतील इबोलाच्या साथीशी सामना करण्यासाठी तिचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला होता.

चाचणीच्या दुस-या टप्प्यावरील प्राथमिक चाचणीप्रक्रियेमध्ये लसींची कार्यक्षमता व्यवस्थित असल्याचे सिद्ध करण्यासाठी जास्त संख्येने स्वयंसेवक उपलब्ध होण्याचा फायदा स्पुटनिक व्ही ला मिळाला. उदाहरणार्थ, विषाणूला निष्प्रभ करणा-या अँटीबॉडीजची पातळी ही कोरोनाव्हायरसने बाधित झालेल्या रुग्णांच्या शरीरात निर्माण झालेल्या अँटीबॉडीजपेक्षा १.५ पट अधिक होत्या, हे या चाचणीतून दिसून आले. ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांच्यानुसार चाचणी टप्पा २ आणि ३ ची आकडेवारी हाताशी आली की, यावर अधिक चांगले भाष्य करता येईल.

लान्सेट स्टडी या सर्वाधिक विश्वासार्ह मेडिकल जर्नलने सध्या क्लिनिकल चाचण्यांच्या टप्प्यामध्ये असलेल्या लसींपैकी स्पुटनिक व्हीच्या चाचणीतील पहिल्या व दुस-या टप्प्यातील सुरक्षितता आणि परिणामकारकता यांवर आधारित निष्कर्ष जाहीर केले आहेत व या लसीचे कोणतेही विपरित परिमाण झाले नसून तिला माणसांनी चांगला प्रतिसाद दिला असे म्हटले आहे. या लसीमुळे एकूण ७६ रिस्पॉन्डन्ट्सच्या शरीरात विषाणूविरोधात चांगली रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण होण्यास चालना मिळाली. या निष्कर्षाच्या पुष्टीसाठी आपल्याला अधिक मोठ्या नमुनागटाच्या आकडेवारीची गरज आहे, तिस-या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष लोकांसाठी खुले केले जातील तेव्हा ही आकडेवारी आपल्या हाती लागेल.

लस आल्यानंतरही खबरदारी घेत रहायलाच हवी:

कोणतीही लस ही १०० टक्‍के परिणामकारक नसते याची आपल्याला कल्पना आहेच. शिवाय ही लस एकूणएका व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी भरपूर वेळ लागणार असल्यामुळे आम्ही लोकांना शारीरिक अंतर पाळण्याचे, मास्क वापरण्याचे आणि हात धुण्याची/निर्जंतुकीकरणाची नियमित सवय ठेवण्याचे आवाहन सातत्याने करत आहोत. लस हे इतर प्रतिबंधात्मक उपाययोजनांबरोबर या विषाणूवर मात करणारे सर्वात परिणामकारक साधन असणार आहे. वैज्ञानिकांना एचआयव्हीसाठीची लस अजूनही मिळालेली नसली तरीही पोलिओ, कांजिण्या, गोवर, हेपेटायटीस बी आणि गालगुंड यांवर लस सापडल्याने आज हे आजार अतिशय दुर्मिळ झाले आहेत हे सत्य आहे. उपचारांसाख्या इतर उपाययोजना इतक्या परिणामकारक सिद्ध झालेल्या नाहीत.

भारतासह इतर अनेक देशांनी लसींच्या ३.८ बिलियन डोसेसची पूर्वनोंदणी केली असून आणखी ५ बिलियन डोसेससाठी बोलणी सुरू आहेत यावरून लसींचे महत्त्व आपल्याला जोखता येईल. इतक्या सगळ्या प्रयत्नांनंतरही प्रत्यक्ष लसीकरण २०२१ च्या सुरुवातीपर्यंत सुरू होऊ शकणार नाही आणि लोकसंख्येच्या एका ब-यापैकी मोठ्या हिश्श्याचे लसीकरण होण्यासाठी २०२२-२०२३ वर्ष उजाडेल. त्यामुळे इतर प्रतिबंधात्मक उपायांमध्ये शिथिलता येऊन चालणार नाही.