चक्रीवादळात नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी?; जिल्हा प्रशासनाने स्थालांतराचे आदेश दिल्यास तात्काळ त्याची अंमलबजावणी करावी

चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून व तुटून पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या आसपास व घराला संभाव्य धोका असणारी झाडे तात्काळ तोडून घ्यावीत.

    शनिवार, रविवारच्या दरम्यान प्रचंड वेगाने येणारे ताउक्‍ते चक्रीवादळ मुंबई, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर धडकण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील सागरी किनाऱ्यावरील व आसपासच्या सर्व गावांमधील नागरिकांना दि. १४ ते १८ मे या कालावधीत सतर्क राहण्याचे आवाहन तहसीलदार शशिकांत जाधव यांनी केले आहे.

    वीज जाण्याची संभाव्य शक्यता

    तसेच किनारपट्टीच्या आसपासच्या गावातील सर्व नागरीकांनी आपल्या घरातील वीज जाण्याची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन तात्काळ आपल्या घरात आवश्यक तितक्या मेणबत्ती/आगकाडी बॉक्स/केरोसीन/टॉर्च/बॅटरी/शुष्कघट इ साहित्य तयार जवळ ठेवावेत.

    झाडे तात्काळ तोडून घ्यावीत

    चक्रीवादळामुळे झाडे उन्मळून व तुटून पडण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व नागरिकांनी आपल्या घराच्या आसपास व घराला संभाव्य धोका असणारी झाडे तात्काळ तोडून घ्यावीत.

    रेशनची व्यवस्था करुन ठेवावी

    सर्व नागरिकांनी आवश्यक रेशनची आपल्या कुटुंबासाठी व्यवस्था करुन ठेवावी. संकटकालीन वापराकरिता कोरडे व खराब न होणारे खाद्यपदार्थ खबरदारीचे उपाय म्हणून तयार ठेवावेत. लहान मुले, वृध व्यक्तींसाठी लागणारा विशेष आहार सोबत ठेवावा.

    चक्रीवादळाच्या दृष्टीने प्रसिध्दी करावी

    ग्राम कृती दल व ग्रामपंचायती यांनी सर्व स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक शासकीय कर्मचारी यांच्या मदतीने चक्रीवादळ व त्या अनुषंगाने घ्यावयाची काळजी याबाबत दवंडी, रिक्षा फिरवून, सोशल मीडियाचा वापर करुन प्रचार प्रसिध्दी करावी.

    मोबाईल नंबरसह यादी तयार करण्यात यावी

    प्रत्येक गावस्तरावर जे.सी.बी, वुड कटर पोहणारे व्यक्ती, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले कर्मचारी, स्वयंसेवक इ. ची मोबाईल नंबरसह यादी तलाठी व ग्रामपंचायत यांचेकडे तयार करण्यात यावी व त्यांचे संपर्कात राहावे.

    पिण्याचे पाणी साठवून ठेवावे

    प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर पुरेशा पिण्याची पाण्याची सोय, पाणी शुध्दीकरणासाठी पुरेशा प्रमाणात निर्जंतुकीकरण पावडर, उपलब्ध करुन घ्यावे. नागरीकांनी जादा पिण्याचे पाणी घरात सुरक्षित जागी साठवून ठेवावे.

    मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये

    या चक्रीवादळाच्या कालवधीत कोणीही मच्छीमार बांधव मासेमारीसाठी अथवा पोहण्यासाठी समुद्रात जाणार नाहीत याची दक्षता ग्राम कृती दल व ग्रामपंचायतीने घ्यावी.

    अफवांवर विश्वास ठेऊ नये

    अफवांवर विश्वास ठेऊ नये, अफवा पसरवू नये. कोणत्याही परिस्थितीत घबराटाची स्थिती निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. शंका असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष (०२३५२-२२६२४८) किंवा रत्नागिरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कक्षात (०२३५२-२२३१२७) फोन करावेत.

    सुरक्षित ठिकाणी जावे

    आपले क्षेत्र चक्रीवादळाच्या धोक्यात सापडते, तेव्हा तात्काळ खाडी, सागरी किनारा व इतर पाणथळ जागा यापासून सुरक्षित ठिकाणी जावे.

    उपाययोजना कराव्यात

    खिडक्या/दरवाजे काचा बंद कराव्यात किंवा वाऱ्यापासून संरक्षण देणाऱ्या झडपा घालाव्यात. बाहेरील दरवाज्यांना मजबूत टेकू देण्यात यावा.

    आदेश मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे

    चक्रीवादळाची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने जर स्थलांतराचे आदेश दिल्यास तत्काळ आदेशाचे पालन करावे व सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत व्हावे व प्रशासनास सहकार्य करावे.

    रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन ठेवावी

    चक्रीवादळातील आपदग्रस्तांना तात्काळ मदत व उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा हॉस्पिटलला आणण्यासाठी गावस्तरावर ग्रामपंचायत व ग्राम कृती दलांनी रुग्णवाहिकेची व्यवस्था करुन ठेवावी.

    What precautions should citizens take in a cyclone If the district administration orders relocation it should be implemented immediately