कुठे गेली भाजपाची गोरक्षणाची घोषणा, मुख्यमंत्री सावंत यांचे गोमांस पुरवण्याचे आश्वासन

जनसंघाने गोरक्षण आंदोलन केले होते. जनसंघ म्हणजेच आताचा भाजपा. 'देश धर्म का नाता है, गाय हमारी माता है' अशा घोषणा देत पूर्वाश्रमीच्या जनसंघाने गोरक्षण आंदोलन चालविले होते. मध्यप्रदेशातील भाजपा सरकार तर गोरक्षणासाठी राज्यात अतिरिक्त उपकर (काऊ सेस) लावणार आहे.

भाजपाच्या कथनी आणि करनी’मध्ये जमीन- अस्मानचे अंतर असते, याची प्रचिती गोव्याचे भाजपा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या वक्तव्यावरून आलेली अहे. मुख्यमंत्री सावंतांनी ख्रिसमस आणि राज्यातील जनतेला भरपूर गोमांस पुरवठा करण्याचे आश्वासन दिले आहे. गायीला मी सुद्धा माता मानतो. असे सावंतांनी यापूर्वी म्हटले आहे. एकीकडे गायीला माता म्हणायचे आणि दुसरीकडे मात्र त्याच गोमांसाचा गोवेकरांना पुरवठा करायचा हा विरोधाभास नव्हे का? लवकरच पशुपालन अधिकाऱ्यांची बैठक कमी पडणार नाही, यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश देणार असल्याचे सांवत यांनी सांगितले आहे.

कुठे गेले गोरक्षणाचे आश्वासन?

जनसंघाने गोरक्षण आंदोलन केले होते. जनसंघ म्हणजेच आताचा भाजपा. ‘देश धर्म का नाता है, गाय हमारी माता है’ अशा घोषणा देत पूर्वाश्रमीच्या जनसंघाने गोरक्षण आंदोलन चालविले होते. मध्यप्रदेशातील भाजपा सरकार तर गोरक्षणासाठी राज्यात अतिरिक्त उपकर (काऊ सेस) लावणार आहे. उप्रचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेसुद्धा गोरक्षणाच्या बाबतीत गंभीर आहेत. राजस्थान आणि उप्रमध्ये गाय घेऊन जाणाऱ्या अल्पसंख्याकांवर हल्लेसुद्धा करण्यात आले. या सर्व बाबी ठीक आहे, परंतु हेही तेवढेच खरे आहे की, अरब राष्ट्रांना गोमांसाचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये भारत अव्वल स्थानावर आहे. साधुसंताचा विरोध असतानाही हे सर्व सुरू आहे. गोरक्षणावरून गाय घेऊन जाणाऱ्यांना तथाकथित गोरक्षकांनी मारझोड केल्याची कितीतरी प्रकरणे उघड झालेली आहे. फजलूखान नावाच्या व्यक्‍तीला यावरूनच ठार मारण्यात आले. भाजपाचे केंद्रातील सरकार अरब देशांना भारतातून होणारा गोमांसाचा पुरवठा रोखू शकणार आहे का? जर सरकार गोरक्षणासाठी खरोखरच कटिबद्ध असेल तर त्यांनी हा पुरवठा रोखून दाखवावा. विदेशी चलनासाठी परदेशात गायींचे मांस पाठविण्यात येत असेल तर इतर वस्तूंच्या व्यापारातूनही विदेशी चलन मिळविता येते. भाजपा खरोखरच गोरक्षणासाठी वचनबद्ध असेल तर त्यांनी हा व्यापार थांबवावा. भाजपा जर सिद्धांतवादी पक्ष असेल तर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला विरोध करू शकेल काय?

वेगळी आहे गोव्याची संस्कृती

‘खाण्या-पिण्याच्या बाबतीत देशातील अन्य राज्यांपेक्षा गोव्याची परिस्थिती मात्र वेगळी आहे. गोव्यामध्ये ४०० वर्षे पोर्तुगीजांची राजवट होती. यामुळे गोवेकरांवर परंपरागत त्यांच्या संस्कृतीचा प्रभाव आहे. त्यामुळेच भाजपा आणि रा.स्व संघ याकडे दुर्लक्ष करीत आहेत. पूर्वोतर आणि गोव्यामध्ये गोमांस ही सामान्य बाब झालेली आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्री सावंत गोमांसाचा पुरवठा करण्याचे आश्वासन देत आहेत. भाजपा सरकारने काही कत्तलखान्यावर बंदी घातली असली तरी बैल आणि रेड्याच्या कत्तलखान्यांना मात्र परवानगी देण्यात आलेली आहे. यानुषंगाने राकाँचे नेते आ. चर्चिल अल्मेडो यांनी बंद करण्यात आलेले कत्तलखाने पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केलेली आहे. दरम्यान ५ वर्षांपासून गोवा मीट कॉम्प्लेक्स लिमिटेड हा कारखाना बंद आहे . या कारखान्यात दररोज २०० जनावरांची कत्तल होत असते.

मोठ्या प्रमाणावर तस्करी

देशात अजूनही मोठ्या प्रमाणावर गोवंशाची तस्करी होत आहे. यामध्ये दुधाळू जनावरांचाही समावेश आहे. गायी आणि बैलांची कत्तलखान्यात मोठ्या संख्येने विक्री होत आहे. आधुनिक पद्धतीने शेती करण्यात येत आहे. ट्रॅक्‍टर आणि मशीनचा वापर शेती करण्यासाठी होत असल्यामुळे बैलाचे महत्त्व कमी होत आहे. जनावरांचा चारा महाग झाल्यामुळे शेतकरी गायी, म्हशींना विकतात. अशा परिस्थितीत सरकारने गोशाळा उघडून त्यामध्ये गायींना ठेवले पाहिजे. सरकारने गायी-म्हशींच्या चाऱ्याची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे. भाजपा सरकार याबाबतीत खरोखरच गंभीर असेल तर त्यांनी योग्य पावले उचलली पाहिजे.