जागतिक स्तरावर भारताचे वजन वाढेल का? आफ्रिकेत भारताचा चीनशी सामना

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आफ्रिकेतला एक महत्त्वाचा देश केनियाचा १२ ते १४ जूनला दौरा केला. या दौऱ्यामध्ये अनेक महत्त्वाच्या पैलूंवरती विचार करण्यात आला. भारत आणि केनियामधली भारत-केनिया जॉइंट कमिशनची तिसरी परिषद या वेळेस झाली आणि अनेक महत्त्वाच्या करारावर सह्या करण्यात आल्या.

  केनिया सामरिकदृष्ट्या आफ्रिका खंडातला एक महत्त्वाचा देश समजला जातो. ८०हजार भारतीय (पीपल ऑफ इंडियन ओरिजीन ) आणि इतर २० हजार भारतीय वेगवेगळ्या कारणांमुळे या देशांमध्ये आहे. हे दोन्ही देश सध्या युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिलचे सदस्य आहेत. यामुळे जागतिक स्तरावर भारताचे वजन वाढवण्याकरिता हा देश जर भारताच्या बाजूने आला तर नक्कीच फायदा होईल.

  या दौऱ्यामध्ये दोन्ही देशांनी दोन्ही देशांमधल्या, आफ्रिकेतल्या आणि जागतिक मुद्द्यांवरती विचारविनिमय केला. याशिवाय हिंदी महासागरातील सागरी सुरक्षासुद्धा महत्त्वाचा विषय होता. भारत-केनिया परस्परसंबंधांशिवाय भारत-आफ्रिका खंड संबंधसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्याकरता भारत दरवर्षी भारत-आफ्रिका वार्षिक शिखर परिषद आयोजित करतो. परंतु गेल्या दीड वर्षामध्ये चिनी व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय भेटीगाठी पूर्णपणे थांबल्या होत्या, म्हणूनच जयशंकर यांच्या भेटीचे महत्त्व आहे.

  भारत-आफ्रिका संबंध हे दोन्ही देशांना फायदा होईल या तत्त्वावर चालतात. यामध्ये या देशातील नागरिकांना होणारे फायदे, पर्यावरणाचा धोका निर्माण न करता आर्थिक प्रगती करणे आणि अशा मुद्द्यांवर सहकार्य केले जाते. २००२ सालापासून भारताने आफ्रिकन खंडाला वेगवेगळ्या प्रकारचे अकरा बिलियन डॉलर्स एवढे आर्थिक साहाय्य दिलेले आहे. याशिवाय तिथल्या देशातील हजारो विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपसुद्धा देण्यात आलेली आहे. आफ्रिका खंड आणि भारत यामधील व्यापार वाढतो आहे.

  २०१० साली व्यापार ५१.५ बिलियन डॉलर होता, तो आता ६६.५ बिलियन डॉलरवरती पोहोचला आहे. भारतीय कॉलन्ट्रॅक्टर्सना तिथे काम करणे सोपे जाते. कारण भारतीय मूळ निवासी असलेले नागरिक भारत आणि आफ्रिकेमध्ये परस्परसंबंध मजबूत करण्याकरिता एक महत्त्वाचा दुवा आहेत. आफ्रिकेची भारताला होणारी निर्यात ही पाच बिलियन डॉलर्सनी वाढली आहे.

  भारत आपल्या आयातीमधील आठ टक्के आयात ही आफ्रिकेतून आणि आफ्रिका नऊ टक्के आयात ही भारतातून करतो. चीनने येथील राष्ट्रांना प्रचंड कर्ज दिले आहे. निमित्त होते, वन बेल्ट वन रोड. परंतु याचा या देशांना फारसा फायदा झालेला नाही आणि उलट सगळेच देश आता कर्जबाजारी बनले आहेत. कुठलेही प्रकल्प पूर्ण करण्याकरिता चीन आपल्या नागरिकांना तिथे आणतो.

  गुंतवणुकीचा मुख्य उद्देश असतो चिनी कंपन्यांना फायदा व्हावा. याशिवाय चीन तिथल्या भ्रष्ट नेते आणि राजकीय पक्षांना विकत घेऊन त्या देशांची धोरणे आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतो. आता अनेक वर्षांनंतर आफ्रिकन देशांना हे कळले आहे की, चीनची आर्थिक गुंतवणूक ही त्यांच्या फारशी फायद्याची झालेली नाही. याशिवाय चीन या देशांमध्ये आपल्या राजकीय पद्धती म्हणजेच चिनी कम्युनिस्ट पार्टीचा प्रभाव वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे, जसा प्रयत्न ८० आणि ९०च्या दशकात सोव्हिएत युनियन आणि चीन करायचे.

  चीन आता सर्वात जास्त आर्थिक संबंध असणारा देश आहे. २००९ साली चीन अमेरिकेच्या पुढे गेला. २०१४ साली चीन आफ्रिकेला सर्वात जास्त कर्ज देणारा देश बनला. २०१९ साली आफ्रिका आणि चीनमधला व्यापार १९२ बिलियन डॉलर्स इतका झाला, जो दहा वर्षांपूर्वी ९१ बिलियन डॉलर्स एवढा होता.

  Will India gain image globally Indias match against China in Africa