सर्वंकष स्वास्थ्याचा ‘योग’…

गेल्या सहा वर्षांपासून दर वर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होतो. वर्षभरात आनंद दिन, मानसिक आरोग्य दिन, पर्यावरण दिन, सायकल दिन असे अनेक दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे केले जातात. याचा मुख्य हेतू हा विविध समस्यांवर प्रबोधन व्हावे, या समस्यांच्या निराकरणासाठी जागतिक स्तरावर राजकीय इच्छाशक्ती आणि अन्य संसाधने यांना चालना मिळावी आणि मानवी उपलब्धीचे जल्लोषाने स्वागत व्हावे हा असतो. संयुक्त राष्ट्रसंघाने त्यामुळेच अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय दिनांची योजना केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हा त्यातीलच एक.

  शून्य ही जशी भारताने जगाला दिलेली भेट आहे त्याचप्रमाणे योग हीही भारताने जगाला दिलेली भेट आहे. शरीर आणि मन यांच्या निरामयतेकडे एकत्वाने पाहण्याच्या दृष्टीवर योगाभ्यास आधारलेला आहे. साहजिकच मानवी कल्याणाचा हेतू त्यामागे आहे. त्यामुळेच २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा भारताचा प्रस्ताव जागतिक स्तरावर मान्यता पावलेला आहे. गेले वर्षभर जग कोरोनाच्या साथीने ग्रासलेले आहे. अशावेळी संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाची ‘थीम’च मुळी निरामयतेसाठी योगा अशी ठेवली आहे. हे संयुक्तिकच म्हटले पाहिजे.

  गेल्या सहा वर्षांपासून दर वर्षी २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा होतो. वर्षभरात आनंद दिन, मानसिक आरोग्य दिन, पर्यावरण दिन, सायकल दिन असे अनेक दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरे केले जातात. याचा मुख्य हेतू हा विविध समस्यांवर प्रबोधन व्हावे, या समस्यांच्या निराकरणासाठी जागतिक स्तरावर राजकीय इच्छाशक्ती आणि अन्य संसाधने यांना चालना मिळावी आणि मानवी उपलब्धीचे जल्लोषाने स्वागत व्हावे हा असतो. संयुक्त राष्ट्रसंघाने त्यामुळेच अशा वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय दिनांची योजना केली आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हा त्यातीलच एक.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत प्रथम हा ठराव मांडला. तो मांडताना मोदींनी योगाचे महत्व विषद केले होते ते असे: ‘योग म्हणजे आपल्या प्राचीन परंपरेची एक सुंदर भेट आहे. योग म्हणजे केवळ एक व्यायामप्रकार नाही. मन आणि शरीर, विचार आणि कृती यांची एकात्मता योगातून साधली जाते.’ मोदींनी मांडलेल्या ठरावाला १७५ सदस्य राष्ट्रांनी मान्यता दिली आणि त्यामुळे २०१४ साली डिसेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रसंघाने २१ जून हा दिवस दर वर्षी आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येईल अशी घोषणा केली. तेंव्हापासून हा दिन जागतिक स्तरावर साजरा होत आहे आणि गेल्यावर्षी प्रमाणेच यंदाही कोरोनाच्या सावटाखाली तो साजरा होईल. मात्र त्यामुळेच योगाचे महत्व आणखीच अधोरेखित होईल कारण अशा जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर योगातून मिळणारी शारीरिक ऊर्जाच नव्हे तर मानसिक शांतता यामुळे योगाची प्रासंगिकता अबाधित आहे यावर शिक्कामोर्तब होईल.

  शून्य ही जशी भारताने जगाला दिलेली भेट आहे त्याचप्रमाणे योग हीही भारताने जगाला दिलेली भेट आहे. प्राचीन भारतीय वाङ्मयात योगाविषयीचे उल्लेख आढळतात; त्यावरून ही विद्या किती प्राचीन असेल याची कल्पना येऊ शकते. ‘युज’ या धातूपासून योग हा शब्द तयार झाल्याने साहजिकच काही तरी जोडणे, एकात्मता साधणे हा योगाभ्यास करण्यामागील उद्देश होता आणि आहे यात शंका नाही. मात्र यात जोडणे हे शरीराचे आणि मनाचे आहे आणि याचे कारण असे की शारीरिक व्याधींइतक्याच किंबहुना त्यापेक्षाही अधिक मानसिक व्याधी त्रासदायक असतात. शरीराला व्याधीमुक्त करण्यासाठी औषधे काम करतात आणि त्यावरही शतकानुशतके संशोधन सुरु आहे हे नाकारता येणार नाही. तथापि शारीरिक व्याधींवर विजय तेव्हाच मिळविता येतो जेव्हा या औषधांना मानसिक आरोग्याची आणि प्रसन्नतेची साथ मिळते.

  मानसिक आरोग्य सशक्त असण्यासाठी योगाभ्यासाची महत्वाची भूमिका आहे हे प्राचीन काळापासून ऋषी-मुनींनी जाणल्याने त्याविषयीचे उल्लेख हे अगदी उपनिषदे, पुराणे, जैन-बौद्ध प्राचीन वाङ्मय यात आढळतात. योगसूत्रावर व्यासांनी केलेले भाष्य हाही त्यातील मोठा टप्पा. पतंजलींनी योगाभ्यासाला शास्त्रशुद्ध स्वरूपात सूत्रबद्ध केले. पतंजली यांनी अष्टांगयोगात यम-नियम-आसन-प्राणायाम-प्रत्याहार- धारणा-ध्यान-समाधी या आठ सूत्रांचा समावेश केला. तेव्हा केवळ योगासने म्हणजे योग नव्हे, तो त्यातील एक भाग झाला. पतंजलींनी या आठ सूत्रांची योजना अशा पद्धतीने केली आहे की बाह्यापासून अंतरंगाकडे प्रवास व्हावा. म्हणजे यमामध्ये अहिंसा, सत्य इत्यादींचा समावेश आहे; नियमांमध्ये शौच, संतोष, स्वाध्याय याचा समावेश आहे; असे करत करत समाधीमध्ये अद्वैत स्थितीला साधक पोहचला पाहिजे हे त्यामागील प्रयोजन. तेंव्हा योगाभ्यास हे जितके प्राचीन शास्त्र आहे तितकेच ते सखोल देखील आहे. आदी शंकराचार्य, माधवाचार्य, रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस प्रभृतींनी योगाभ्यासाचा विकासासाठी आपले योगदान दिले आहे. योगाभ्यास ही एका अर्थाने साधना असल्याने त्यालाही गुरु-शिष्य परंपरा होती. अर्थात काळाच्या ओघात गुरु-शिष्य परंपरा सर्वत्रच लोप पावल्याने योगाभ्यासातही ती फारशी शिल्लक राहिली नाही यात नवल नाही. मात्र तरीही योगाचा प्रसार मानवी कल्याणाच्या उद्दात्त हेतूने आधुनिक काळात अनेकांनी केला.

  त्यातील प्रमुख हे योगाचार्य अय्यंगार. विचित्र योगायोग असा की अय्यंगार योगाभ्यासाकडे वळण्यास कारणीभूत ठरली ती १९१८ च्या स्पॅनिश फ्ल्यूची साथ. १९१८ साली अय्यंगार यांचा जन्म झाला तेव्हा ही साथ जोरात होती आणि त्याचा परिणाम अय्यंगार यांच्यावरही झाला. सततचे आजारपण, क्षय, मलेरिया, हिवताप, कुपोषण इत्यादी व्याधींनी त्यांना लहानपणीच ग्रासले होते. योगाभ्यासात विसाव्या शतकात एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ख्याती होती आणि आधुनिक योगाचे जे जनक मानले जातात ते तिरुमलाई कृष्णाचार्य हे अय्यंगार यांचे आप्तेष्ट. कृष्णाचार्य हे म्हैसूरच्या राजघराण्याचे योगगुरू होते आणि पतंजलीच्या अष्टांग योगसूत्रांवर आधारित विद्यादान ते करीत. मुख्यतः हठयोगाच्या पुनरुज्जीवनासाठी कृष्णाचार्य यांनी योगदान दिले. त्यांनी अय्यंगार यांना विविध आसने शिकविली आणि कृष्णाचार्य यांनीच त्यांना योगाभ्यासाच्या प्रसारासाठी पुण्याला धाडले. जागतिक कीर्तीचे व्हायोलिन वादक येहुदी मेहूनिन मुंबईला आले असता त्यांनी अय्यंगार यांची भेट घेतली आणि अय्यंगार यांनी शिकवलेल्या एकाच आसनाने मेहूनिन इतके प्रभावित झाले की त्यांनी अय्यंगार यांना लंडन, पॅरिस, स्वित्झर्लंडला येण्याचे निमंत्रण दिले. त्यानंतर अय्यंगार आंतरराष्ट्रीय योगगुरू बनले आणि आसने, प्राणायाम यांच्याविषयी जागतिक कुतूहल निर्माण झाले; त्यातून होणाऱ्या शारीरिक-मानसिक आरोग्यलाभाने त्याकडे अधिकाधिक जण आकृष्ट होऊ लागले. रशियातून भारतात आलेल्या युजिनी पीटरसन या अभिनेत्रीने इंद्रा देवी हे नाव धारण केले आणि त्याही योगा शिकण्यासाठी कृष्णमाचार्य यांच्याच शिष्या बनल्या. किंबहुना त्या कृष्णमाचार्य यांच्या पहिल्या महिला शिष्या. त्यांनी नंतर योगाचा प्रसार अमेरिकेत केला. १९४८ च्या सुमारास त्यांनी लॉस एंजिलिस येथे योगा स्टुडियो सुरु केला आणि हॉलिवूडमधील सेलिब्रिटींनी त्यांचे शिष्यत्व पत्करले. १९९० च्या दशकात योगाला जी पुनर्प्रतिष्ठा जगभरात प्राप्त झाली तीत इंद्रा देवी यांनी त्यापूर्वी चाळीसेक वर्षे लावलेली बीजेही कारणीभूत होती असे मानले जाते. अलीकडच्या काळात बाबा रामदेव यांनी योगाचा प्रसार केला आहे आणि त्यामुळे लक्षावधी लोक त्याकडे वळले आहेत. योगाभ्यासाने होणाऱ्या आरोग्यदायी लाभाच्या बाबतीत तथ्य नसते तर ही प्राचीन विद्या इतकी शतके तग धरू शकली नसती. शरीर आणि मन यांच्या निरामयतेकडे एकत्वाने पाहण्याच्या दृष्टीवर योगाभ्यास आधारलेला आहे. साहजिकच मानवी कल्याणाचा हेतू त्यामागे आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला जागतिक स्तरावर मान्यता मिळाली आहे.

  गेले वर्षभर जग कोरोनाच्या साथीने ग्रासलेले आहे. अशावेळी संयुक्त राष्ट्रसंघाने यंदाची ‘थीम’च मुळी निरामयतेसाठी योगा अशी ठेवली आहे हे संयुक्तिकच म्हटले पाहिजे. गेल्या वर्षभरात कोरोनाच्या प्रादुर्भावाने अनेकांना व्याधीग्रस्त केले आहेच; पण सर्वांचीच जीवनशैली बदलून टाकली आहे. वर्क फ्रॉम होम सारख्या अपरिहार्य प्रयोगांनी हजारोंना घरात जखडून ठेवले आहे. अशावेळी आसने, ध्यान, प्राणायाम या योगाभ्यासाच्या सूत्रांनी अनेकांना उभारी दिली आहे. हे करताना वयाची अट नसल्याने अबालवृद्ध ते करू शकतात ही त्याची आणखी एक जमेची बाजू. योगाभ्यास आता प्रत्यक्ष कोणत्या शिबिरात जाऊन शिकणे शक्य नाही म्हणून अनेक संस्थांनी ऑनलाईन प्रशिक्षणाची व्यवस्था केली आहे. विशेषतः या कोरोनाच्या काळात येणाऱ्या मानसिक ताण-तणावावर दिलासा योगाभ्यास देऊ शकतो असे तज्ज्ञांनी वारंवार सांगितले आहे. प्रतिकार शक्ती वाढविण्यास योगाभ्यास हातभार लावू शकतो असेही मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

  कोरोनाचा परिणाम श्वसनसंस्थेवर होतो. प्राणायाम श्वसनक्रिया सुधारण्यासाठी, फुफ्फुसांची सक्षमता वाढविण्यासाठी लाभदायी ठरेल असेही योगगुरू सांगतात. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी, शांत झोप लागण्यासाठी आणि एकूणच कोरोनाच्या साथीने निर्माण झालेल्या दोलायमान परिस्थितीत योगा हा लाभदायी ठरेल असे मानले जाते. आयुष मंत्रालयाने तर कोरोनामध्ये योगा करणाऱ्यांसाठी खास मार्गदर्शिका प्रकाशित केली आहे. कोरोनाची घातकता अन्य काही आजार रुग्णाला असले तर वाढते हे सिद्ध झाले आहे. उदाहरणार्थ लठ्ठपणा, मधुमेह, अस्थमा इत्यादी. त्यामुळे या आजारांचे व्यवस्थापन व्यवस्थित केले तर कोरोनाची घातकता कमी होऊ शकते आणि त्या व्यवस्थापनात योगा उपयुक्त ठरतो असे या मार्गदर्शिकेत म्हटले आहे. अगदी दैनंदिन दहा मिनिटांपासून ४५ मिनिटांपर्यंत योगाभ्यास कसा करावा; त्यात दैनंदिन काय करावे; आठवड्यातून किमान काही दिवस काय काय करावे आदी माहिती आकृतींसह सविस्तरपणे त्या मार्गदर्शिकेत दिलेली आढळेल. या योगा प्रोटोकॉलचे अनुसरण केले तर कोरोनाच्या काळातही सर्वांना लाभ होऊ शकेल. संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेम्ब्लीच्या अध्यक्षांनी गेल्या वर्षी असे प्रतिपादन केले होते की कोरोनाच्या काळात जेव्हा सामान्यांचे जीवन प्रभावित झाले आहे, नैराश्य आले आहे , एकाकीपणाने ग्रासले आहे अशावेळी स्वास्थ्याकडे सर्वंकष दृष्टीने पाहणारा योगाभ्यास हा अत्यंत आवश्यक ठरतो. अर्थात कोरोनाने योगाभ्यासाचे अनन्यसाधारण महत्व अधोरेखित केले एवढेच; पण योगा हा काही केवळ कोरोनाच्या काळापुरता मर्यादित नाही. भारतीय प्राचीन परंपरेने त्याला एका अर्थाने जीवनशैलीचे रूप म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिन हे त्या जीवनशैलीचे पुनर्स्मरण आणि प्रसार यासाठीचे एक निमित्त आहे.