यासाठी आपल्यालाही सक्षम व्हावंच लागेल; चीनची ताकद टिकाऊ स्वरूपाची नाही

आपले महत्त्व वाढविण्यात चीन यशस्वी झाला असला, तरी गेल्या काही वर्षांपासून चीनचे पवित्रे कमकुवत ठरू लागले आहेत. श्रीलंका, मालदीव आणि बांगलादेशात याची लक्षणे दिसून येऊ शकतात.

  चीनची आर्थिक शक्तीही निर्यातीवर आधारित आहे. जेव्हा व्यापाराचे नेटवर्क कमकुवत होईल, तेव्हा चीनची गतीही कमी होईल. चीनचा आर्थिक आवाका भारतापेक्षा पाचपट मोठा आहे, चीनची लष्करी ताकद भारतापेक्षा तीनपट अधिक आहे, प्रत्येक बाबतीत चीन भारतापेक्षा सरस आहे हे वास्तव आहे; परंतु चीनची ताकद टिकाऊ स्वरूपाची नाही हेही तितकेच खरे आहे. चीनचे घरटे तकलादू आहे.

  हाँगकाँगमध्ये स्वायत्त लोकशाही व्यवस्थेची ज्या प्रकारे गळचेपी केली जात आहे, त्याचा थेट परिणाम तैवानमध्ये दिसून येत आहे. चीन हाँगकाँगवर हवा तेव्हा ताबा घेऊ शकतो, असे ऐंशीच्या दशकात जेव्हा चीनचे माजी नेते डेंग यांग पेंग यांनी ब्रिटनच्या माजी पंतप्रधान मार्गरेट थॅचर यांना सांगितले होते, तेव्हा थॅचर यांनी उत्तर दिले होते की, तुम्ही निश्चितपणे तसे करू शकता; परंतु त्यामुळे जगाला तुमची मानसिकता कशी आहे हेच दिसून येईल. हे ऐकून डेंग यांनी हाँगकाँगवर अतिक्रमण करण्याची योजना गुंडाळली होती.

  कदाचित ही बुद्धी चीनचे विद्यमान राष्ट्रपती जिनपिंग यांच्याकडे नाही. त्यांच्या मते, संपूर्ण जगाला कवेत घेण्याची ताकद चीनने प्राप्त केली आहे. परंतु हे चीनचे केवळ एक स्वप्नरंजनच आहे. पूर्व आशियातील शेजारी देशांचा एक हिंसक विरोधक म्हणून आज चीन ओळखला जातो. चीनच्या व्यवहारामुळे युरोपीय देश प्रक्षुब्ध आहेत.

  अमेरिकेचे प्रशासन हरप्रकारे चीनच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न करीत आहे. रशिया हा अमेरिकेचा विरोधक म्हणून केवळ चीनसोबत आहे. अशा पार्श्वभूमीवर, भारताशी संघर्ष ओढवून घेतल्यास चीनला तो महागात पडेल. चीन भारतापेक्षा शक्तिशाली आहे हे मान्य केले तरी चीनच्या विश्‍वविजयाच्या योजनेत अशा संघर्षामुळे बाधा येऊ शकते. तिबेटचा मुद्द उसळून वर येऊ शकतो. चीनची कमजोरी नेमकी तोच आहे.

  साम्यवादी चीनचे संस्थापक माओ त्से तुंग तिबेटचा उल्लेख ‘दंत श्रृंखला’ असा करीत असत. ही श्रृंखला भेदण्याची ताकद भारताकडे आहे. भारताने तसा प्रयत्न कधी केला नाही हा भाग वेगळा; परंतु आरपारचा प्रश्‍न उपस्थित झाल्यास भारताकडून तसे होणे शक्‍य आहे. तिबेटची चावी अद्याप भारताच्या हाती आहे.

  अमेरिका तर तिबेट प्रश्‍नावरून चीनला घेरण्याचा प्रयत्न पूर्वीपासूनच करीत आहे. गेल्या वर्षी अमेरिकी काँग्रेसमध्ये तिबेट प्रश्‍नावरून कायदेही तयार करण्यात आले होते. आणखीही अनेक पैलू आहेत. काही दिवसांपूर्वी “ग्लोबल टाइम्स’ने एका व्यंगचित्रात भारताची तुलना एका थकलेल्या, कमकुवत हत्तीशी केली होती. महामारीमुळे जेरीस आलेल्या भारताचे ते प्रतीक होते.

  दुसरीकडे चीनने बांगलादेशला इशारा देऊन असा सल्ला दिला आहे की, बांगलादेशने आपला संबंध कोणत्याही परिस्थितीत ‘क्वाड’शी जोडला तर त्याला घातक परिणामांना सामोरे जावे लागेल. वस्तुतः अशा घटनांमधून चीनचे मनसुबे स्पष्ट होऊ लागले आहेत. मध्य पूर्व आशिया आणि दक्षिण पूर्व आशियात अयशस्वी झाल्यानंतर चीन दक्षिण आशियावर दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न आपल्या पद्धतीने करीत आहे. असा प्रयत्न करण्याचा हेतूही स्पष्ट आहे. हा भारतासाठी संदेश आहे. घडामोडी भारतीय उपखंडाच्या आसपास घडत आहेत आणि यातून चीनकडून दिला जात असलेला संदेश स्पष्ट आहे.

  You have to be able to do that too Chinas strength is not sustainable