‘जॅकेटवाली दोस्ती’ ..आणि गोपीनाथ मुंडे जॅकेट घालायला लागले

1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले. हा किस्सा त्याच वेळचा..

    राजकारणापलीकडे मैत्री जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे गोपीनाथ मुंडे. विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांच्या मैत्रीत आणि राजकीय वाटचालीत अनेक सारख्या गोष्टी पाहायला मिळतात. दोघांनीही सामान्य कुटुंबातून येऊन राज्य व देशाच्या राजकारणात आपला एक वेगळा ठसा निर्माण केला. दोघेही लोकनेते होते. महाविद्यालयीन जीवनापासून त्यांची मैत्री राहिली.

    1980 च्या दशकात दोघेही आमदार म्हणून एकाच वेळी विधानसभेवर गेले. हा किस्सा त्याच वेळचा..

    १९८० साली निवडून आल्यानंतर जेव्हा मुंबईच्या विधानभवनात आमदार म्हणून पहिलं पाऊल ठेवलं तेव्हा गोपीनाथ मुंडे पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. तर विलासरावही तसाच पांढरा लेंगा आणि झब्बा घालून आले होते. फरक इतकाच होता तो म्हणजे विलासरावांनी त्यावर काळे बंद गळयाचे जॅकेट घातले होते.

    दोघे समोरासमोर आले आणि एकमेकांना मिठी मारली. दोघेही देखणे होते. या तरुण आमदारांची मुलाखत घेण्यासाठी काही पत्रकार पुढे आले. तेव्हा पत्रकार म्हणाले, ‘‘दोघे सारखेच दिसता. फरक एकच. विलासराव तुम्ही जॅकेट घातल्यामुळे जरा वेगळे दिसत आहात.’’

    दुस-या दिवशी सभागृह सुरू होण्यापूर्वी पुन्हा दोघे जण भेटले. आजूबाजूला इतर आमदारांचे कोंडाळे होते. इतक्यात विलासरावांनी आपल्या सहायकाला हाक मारली. तो जवळ आला तशी विलासरावांनी त्याच्या हातातील बॅग घेतली. ती उघडली आणि आपण जसे जॅकेट घातले होते, तसेच जॅकेट त्यांनी बॅगेतून काढले आणि मुंडे यांच्याकडे सोपवले.

    तिथेच ते मुंडेंना घालायला लावले आणि पुन्हा कडकडून मिठी मारली आणि उपस्थित आमदारांना विचारले, ‘आता दिसतो का आम्ही सारखे?’

    सर्वच जण खळखळून हसले. तेव्हापासून गोपीनाथ मुंडेही जॅकेट घालू लागले. विलासरावांचे निधन झाले तेव्हा मुंडे यांनी ही आठवण सांगितली व भावुक होऊन म्हणाले, “मी ज्या ज्या वेळेला जॅकेट घालतो तेव्हा विलासरावांची आठवण येते”

    (संदर्भ बोलभिडू)