रानडुकरांची शिकार करणारी टोळी सक्रिय; ब्रम्हपुरी व आरमोरी वनविभागाने लक्ष देण्याची गरज

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर रानडुकरांची शिकार करणारी आंध्रप्रदेश व तेलंगणातील शिकाऱ्यांची टोळी सक्रीय झाली असल्याचे दिसून येत असल्याने ब्रम्हपुरी व आरमोरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याची मागणी जोर धरत आहे.

    आरमोरी (Armory).  गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर रानडुकरांची शिकार करणारी आंध्रप्रदेश व तेलंगणातील शिकाऱ्यांची टोळी सक्रीय झाली असल्याचे दिसून येत असल्याने ब्रम्हपुरी व आरमोरी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रीत करण्याची मागणी जोर धरत आहे.

    वैनगंगा नदीच्या काठालगत मोठ्या प्रमाणात रानटी डुकरे आढळून येतात. याच संधीचा फायदा घेत आंध्रप्रदेश व तेलंगणा राज्यातील तेलगू भाषिक दोन-तीन व्यक्ती नदी परिसरातील दोन्ही बाजूच्या काठालगत रानटी डुकराची शिकार करण्यासाठी चोरट्या मार्गाने संशयितरित्या रात्रंदिवस फिरताना आढळून येत आहे. त्यांच्याकडे शिकारीचे साहित्यसुद्धा उपलब्ध असल्याची माहिती आहे. सदर व्यक्ती आरमोरीमध्ये कुटुंबासह राहत असून ते गावठी डुकरे पाळण्याचा व्यवसाय करीत असल्याची माहिती आहे. यातच स्वतःच्या व्यवसायाचा फायदा उठवताना संधी साधून रानटी डुकराची शिकार करून परस्पर विल्हेवाट लावून मांसाची विक्री केले जात असल्याने आता त्यांच्यावर अधिकच संशय बळावला आहे. सदर व्यक्ती रात्रीच्या वेळात दुचाकीने फेरफटका मारताना नागरिकांना दिसून आले आहेत.संबंधित विभागाने वेळीच दखल घेऊन रात्रीची गस्त वाढवून शिकार करणाऱ्या या व्यक्तींचा पर्दाफाश करावा, अशी मागणी होत आहे.

    या व्यक्तींकडून शिकारीचे प्रमाण वाढले असल्याने जंगलातील रानडुकरांची संख्या झपाट्याने घटत आहे. त्यामुळे वाघासारख्या प्राण्यांना जंगलात शिकार मिळत नसल्याने जंगल व्याप्त परिसरातील गावात वाघाचा शिरकाव वाढला आहे. वाघ गावात येऊन बैल, गाय, वासरू, शेळ्यांसह माणसांनाही भक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.