वनपट्टे ऑनलाईन न झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त; धान घरी आणण्याची शेतकऱ्यांवर वेळ

गडचिरोली जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले. या धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आलेल्या वनहक्क पट्टेधारकांचे वनपट्टे ऑनलाईन न झाल्याने त्यांना केंद्रावर विक्री केलेले धान घरी आणण्याची पाळी आली आहे.

    गडचिरोली (Gadchiroli).  जिल्ह्यात धान उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू केले. या धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आलेल्या वनहक्क पट्टेधारकांचे वनपट्टे ऑनलाईन न झाल्याने त्यांना केंद्रावर विक्री केलेले धान घरी आणण्याची पाळी आली आहे.

    जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक यांच्यावतीने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या अंतर्गत उघड्यावर आधारभूत धान खरेदी करण्यात येते. मार्केटींग फेडरेशन गडचिरोलीच्यावतीने खरेदी-विक्री संस्थेच्या अंतर्गत गोडावूनमध्ये खरेदी करण्याचे अधिकार असल्यामुळे उघड्यावर खरेदी करता येत नाही. परंतु जिल्ह्यात शासकीय धान खरेदी सुरू करण्यासाठी गोडावून नाही. त्यामुळे मार्केटिंग अधिकारी व खरेदी-विक्री संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. प्रयत्न केल्यानंतर बऱ्याच उशिरा गोदाम मिळतो. तो भरल्यानंतर पुन्हा धान खरेदी केंद्र बंद ठेवावे लागते.

    31 मार्च धान खरेदीचा शेवटचा दिवस असतानाही अद्यापही मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे धान खरेदी-विक्री संस्थेच्या केंद्रावरील खुल्या जागेत पडून आहेत. वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांनी ऑनलाईनसाठी पाठवून धान खरेदी केंद्रावर विक्री केली; परंतु अद्यापही वनहक्क जमिनीचे पट्टे ऑनलाईन झाले नसल्याचे सांगून विक्री केलेले केंद्रावरील धान घरी घेवून जाण्याच्या सूचना केंद्र चालकांकडून देण्यात येत असल्यामुळे वनपट्टेधारक शेतकऱ्यांना खाजगी व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याची वेळ येत आहे. प्रशासनाने या बाबीची दखल घेऊन शासनाने धान खरेदी करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.