मधुमक्षिका पालनातून रोजगार निर्मिती; एसटीआरसीमार्फत मधुमक्षिका पालन कार्यशाळा

विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एसटीआरसी) हे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे एक स्वायत्त संस्था आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध कार्यक्रम विभागामार्फत राबविले जातात.

  गडचिरोली (Gadchiroli).  विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्र (एसटीआरसी) हे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे एक स्वायत्त संस्था आहे. गडचिरोली जिल्ह्यातील गावांमध्ये नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध कार्यक्रम विभागामार्फत राबविले जातात. गावखेड्यात जाऊन नागरिकांना भेटी देण्यात आल्यावर नागरिकांना मधुमक्षिकापालन, मधसंकलन यावर वैज्ञानिकदृष्ट्या मार्गदर्शन करून त्यांचे जीवनमान उंचावणे ही संकल्पना समोर आली. ‘त्या’ दिशेने पहिले पाऊल म्हणजे 17 मार्च रोजी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राअंतर्गत मधुमक्षिका पालन या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

  कार्यक्रमाप्रसंगी चंद्रपूर येथील आनंद बी फॉर्म इंटरप्राईजेसचे संस्थापक आनंद जक्कुलवार तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख आशिस घराई उपस्थित होते. महाराष्ट्रात प्रामुख्याने पूर्व विदर्भात मधमाशांच्या पेट्यांची संख्या कमी होत असल्याने ग्रामीण व आदिवासी भागातील युवकांना मधुमक्षिकापालनमध्ये मोठा वाव आहे. रोजगाराच्या अनेक संधी आहेत. तसेच मधमाशांचा फुलाला होणारा स्पर्श हा परिसस्पर्श समान आहे.

  शेती प्रभावीरीत्या करण्यासाठी मधुमक्षिका वाचविणे आवश्यक आहे. त्याकरिता “मधमाशी जगवा, शेती वाचवा” हा विचार रुजविण्याची गरज असल्याचेही जक्कुलवार यावेळी म्हणाले. मध संकलन व मधमाशी पालन शेतीसाठी व पर्यावरणासाठी फायदेशीर आहे. त्यामुळे उत्पादकता वाढण्यास मदत होईल. शास्त्रीयपद्धतीने व विज्ञानाची तंत्रज्ञानाची जोड देऊन मधमाशी पालन केल्यास पर्यावरणाचा समतोल राखणे, याबरोबरच जोडव्यवसाय म्हणूनही याकडे बघण्याची गरज आहे. मधमाशा शेतकऱ्यांच्या परागीभवनाचे काम सातत्याने करीत असतात. परागीभवनामुळे शेतीस व शेतीतील उत्पादनात लक्षणीय वाढ होते. त्यामुळे मधमाशांच्या फुलाला होणारा स्पर्श हा परीसस्पर्श समान असून शेती वाचवण्यासाठी मधुमक्षिका वाचविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

  विज्ञान व तंत्रज्ञान संसाधन केंद्राचे मुख्य कार्यक्रम अधिकारी व प्रमुख आशिष घराई यांनी शास्त्रीय पद्धतीने व विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून मधमाशी पालन करण्याची गरज असल्याचे सांगितले. पर्यावरण पूरक प्रत्येक गोष्टीत जोपासनेवर भर देताना कृषी विकासात विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या जंगल क्षेत्रात हा उत्तम व्यवसाय होऊ शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प मांडला आहे. त्यात मधुमक्षिकापालन मोठे योगदान ठरू शकते, असा विश्वासही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. संचालन कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी पंकज लेंडे यांनी तर आभार कार्यक्रम समन्वयक दिनेश राठोड यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वैज्ञानिक अधिकारी गंधर्व पिलारे व सहकारी वर्गाने सहकार्य केले.

  शेतातील उत्पादन वाढीसाठी मधुमक्षिका पालन गरजेचे
  मधुमक्षिकापालन हा मोठा व्यवसाय होऊ शकतो. प्रत्येक मधमाशी एका दिवसात 1 लाख फुलांना भेटी देत असते. त्यातून परागीभवनाचे अविरत कार्य मधमाशी करीत असते. त्यामुळे शेतीतील उत्पादनात वाढ होते. मधुमक्षिका पालनामध्ये पराग कण, जेली, व्याक्स, वेनम यासारखे अनेक सहउत्पादन घेतले जाऊ शकतात. परंतु या उत्पादनापेक्षा मधमाशीमुळे शेतीत होणारे उत्पादन वाढ अधिक महत्त्वाचे आहे. प्रत्येक ग्रामीण आणि शहरी व्यक्तींमध्ये ‘मधमाशी जगवा, शेती वाचवा’ हा विचार रुजवण्याची गरज आहे.