मिशनरीज वास्तुची दैनावस्था; ब्रिटिशकालीन इमारत मोजतेय अखेरच्या घटका

सिरोंचा शहराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून महत्त्व दिले जात होते. ब्रिटिश काळात या शहराला इंग्रजांनी महत्त्व देत अनेक वास्तू उभारल्या होत्या. अडीचशे वर्षापूर्वी इंग्रजांनी शिक्षणाच्या स्तुत्य हेतूने उभारलेली मिशनरीज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अखेरच्या घटका मोजतांना दिसून येत आहे.

  सिरोंचा (Sironcha).  सिरोंचा शहराला स्वातंत्र्यपूर्व काळापासून महत्त्व दिले जात होते. ब्रिटिश काळात या शहराला इंग्रजांनी महत्त्व देत अनेक वास्तू उभारल्या होत्या. अडीचशे वर्षापूर्वी इंग्रजांनी शिक्षणाच्या स्तुत्य हेतूने उभारलेली मिशनरीज प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अखेरच्या घटका मोजतांना दिसून येत आहे. एकेकाळी या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचे केंद्र ठरलेली सदर वास्तू मोडकळीस आली सद्यस्थितीत सदर वास्तू वाळीत पडून असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

  सिरोंचा शहराचा व तालुक्याचा पूर्वीचा इतिहास बघितला असता हा संपूर्ण परिसर वनव्याप्त होता. पूर्वीच्या काळी दळणवळणाची कोणतीही साधने नसल्याने सिरोंचा सीमेलगत असलेल्या छत्तीसगड व आंध्रप्रदेश या राज्यात जाचे म्हटल्यास घनदाट जंगलातून पायी अथवा बैलबंडीच्या साहाय्यानेच जावे लागत होते. येथून 280 किमी अंतरावर असलेल्या चांदा म्हणजेच चंद्रपूरला कामाला जायचे असल्यास सोबत शिदोरे घेऊन बैलबंडीने प्रवास करावा लागत असे. या जंगलव्याप्त प्रवासादरम्यान हिंसक प्राण्यांचीही मोठी दहशत होती. अशातच अडीचशे वर्षांपूर्वी सिरोंचा शहरातील सध्याच्या शिवाजी चौकात इंग्रजी मशिनरीज दाखल झाले होते. या मिशनरीमुळे सिरोंचा तालुक्यासह छत्तीसगड, आंध्रप्रदेश, चंद्रपूर व नागपूर परिसरातील विद्यार्थ्यांकरिता शिक्षणाचे नवे दालन उघडले गेले.

  सदर मिशनरीजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने सन 1916 मध्ये मुला-मुलींकरिता येथे वसतिगृहाचीही व्यवस्था करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना खेळाचे मैदान तसेच बगिच्याचीही तेव्हा निर्मिती करण्यात आली. येथील शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच मोफत जेवणही दिल्या जाऊ लागले होते. सदर परिसर घनदाट जंगलाने व्यापलेला असल्याने तसेच हिंसक वन्यप्राण्यांची भीती असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शाळा परिसरातच विहिरीची व्यवस्था करण्यात आली होती. सदर विहीर आजही सुस्थितीत असून इतिहासाची साक्ष देत आहे. मात्र, स्वातंत्र्याप्राप्तीनंतर इंग्रज येथून निघून जाताच या मिशनरीजसह शाळेकडेही शासन व स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले.

  परिणामी ही वास्तू आता अखेरच्या घटका मोजतांना दिसून येत आहे. इतिहासाची देण असलेल्या या वास्तुला निरंतर काळ टिकवून ठेवण्यासाठी प्रशासनाने याकडे जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

  १९७९ पर्यंत सुरू होते इंग्रजी माध्यमातून शिक्षण
  फ्रॉन्सिस डेविड स्कूल या नावाने संस्था स्थापन करून येथे शाळेला सुरुवात करण्यात आली होती. त्यावेळी 250 पेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत होते. सन 1979 पर्यंत शाळेत इंग्रजी माध्यामातून विध्यार्थ्यांना शिक्षण दिल्या जात होते. या ठिकाणी वर्ग पहिली ते 10 वीपर्यंत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यावेळी शाळेवर मुख्याध्यापक म्हणून मेडीसिस संस्था हैद्राबादचे मिस. लाईनर ईजरीयाल हे होते. ते विद्यार्थ्यांना विज्ञान व गणित विषय शिकवित असत. तर शिक्षक म्हणून कार्यरत असलेले शेख हे विद्यार्थ्यांना ईतिहास व भूगोल विषयाचे विद्यार्थ्यांना धडे देत होते.