वर्षापूर्वीच्या उघड्यावरील धानाचा कुणीच नाही वाली

धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत येत असलेल्या अनेक खेरदी केंद्रावरुन मागील वर्षी हजारो क्विंटल धान खरेदी करण्यात आले. मात्र तालुक्यातील अनेक केंद्रावर गोदामाची पुरेसी सुविधा नसल्याने धान्य उघड्यावर ठेवण्याची पाळी केंद्र चालकावर येऊन ठेपते. त्यामुळे हजारो क्विंटल धान्य दरवर्षी पाण्यात भिजून लाखोंचे नुकसान होत आहे. तालुकास्थळ असलेल्या धानोरा येथील खरेदी केंद्रावर मागील वर्षी धान खरेदी करण्यात आले. शासकीय गोदाम हाऊसफुल झाल्याने शेवटच्या टप्प्यात मार्च २०२० मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये मोकळ्या आवारात धान्य खरेदी करण्यात आली.

  • मोकळ्या धानावर मोकाट जनावरांचा ताव
  • धानोरा तालुक्यातील केंद्रावरील विदारक स्थिती

नवराष्ट्र. गडचिरोली. आदिवासी विविध कार्यकारी संस्थेमार्फत तालुक्यातील विविध खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात आलेल्या मागील वर्षीच्या धानाची उचल न झाल्याने हजारो क्विंटल धान उघड्यावर पडून आहे. उघड्यावरील या धानाची उचल करण्याकडे शासन वा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने हजारो क्विंटल धान्य पाण्यात भिजून सडले आहे. परिणामी या धानाचा वालीच उरला नसल्याने मोकाट जनावरांनी या धानावर ताव मारताना दिसून येत आहे. लाखो रुपये किंमतीचे धान्य बेवारस स्थितीत असल्याने यावर्षी खरेदी करण्यात आलेल्या धानाचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

धानोरा उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत येत असलेल्या अनेक खेरदी केंद्रावरुन मागील वर्षी हजारो क्विंटल धान खरेदी करण्यात आले. मात्र तालुक्यातील अनेक केंद्रावर गोदामाची पुरेसी सुविधा नसल्याने धान्य उघड्यावर ठेवण्याची पाळी केंद्र चालकावर येऊन ठेपते. त्यामुळे हजारो क्विंटल धान्य दरवर्षी पाण्यात भिजून लाखोंचे नुकसान होत आहे. तालुकास्थळ असलेल्या धानोरा येथील खरेदी केंद्रावर मागील वर्षी धान खरेदी करण्यात आले. शासकीय गोदाम हाऊसफुल झाल्याने शेवटच्या टप्प्यात मार्च २०२० मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेडमध्ये मोकळ्या आवारात धान्य खरेदी करण्यात आली. या केंद्रावरील धानाची उचलसुद्धा झाली. मात्र अद्यापही या शेडमध्ये शेकडो क्विंटल धान्य पडून आहेत. सदर धान पावसाच्या पाण्यात भजिल्याने कुजलेले आहे. अनेक धानाला अंकुर फुटल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. खराब झालेले धान्य केंद्रामार्फत ताडपत्री टाकून झाकून ठेवण्यात आले असून लाखो रुपयाचे धान्य अद्यापही बेवारस दिसून येत आहे.

या उघड्यावरील धानाच्या संरक्षणासाठी तारेचे कुंपण घातले गेले असून चौकीदाराचीही नेमणूक करण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतर सदर तारेचे कुंपन तुटले गेले असून राखणदारही दिसेनासा झाला आहे. त्यामुळे या उघड्यावरील धानावर मोकाट जनावरे, डुकरांनी ताव मारण्याचा सपाटा लावला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला धान्य अशाप्रकारे नासधूस होताना पाहून शेतकऱ्यांच्या धानाची किंमत ना शासनाला ना प्रशासनाला, अशीच स्थिती म्हणावी काय? असा प्रश्न शेतकरी वर्गाला पडला आहे.

नागरिकांसाठी ठरला थट्टेचा विषय

संस्थेच्या देखरेखीअभावी उघड्यावर असलेले लाखो रुपये किंमतीचे धान्य बिनकामाचे झाले आहे. या धानावर मोकाट जनावरे, डुकरे यांनी ताव मारण्यास सुरुवात केली असल्याने लाखोंचे धान पाण्यात गेले आहे. बॅकेसमोरील मैदानात असलेल्या या बेवारस धानाचा वालीच कोणी नसल्याने हा विषय लोकांसाठी थट्टेचा विषय बनलेला आहे.

यावर्षीही हीच स्थिती?

मागील वर्षीच्या उघड्यावरील धानावर मोकाट जनावरांनी रोज ताव मारतांना दिसून येतात. या जनावरासाठी सदर स्थळ विसाव्याचे स्थान ठरत असून नेहमीच येथे जनावरांचा वावर दिसून येत आहे. मागील वर्षीचे लाखो रुपये किंमतीचे धान सडल्याने प्रचंड नुकसान झाले. यंदाही मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आले असून हजारो क्विंटल धान्य उचलअभावी उघड्यावर पडून आहेत. त्यामुळे यावर्षी तशी स्थिती राहू नये याकरीता प्रशासनाकडून खरेदी धानाची उचल करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.