गडचिरोली जिल्ह्यात उपचाराअभावी गर्भवती महिलेचा मृत्यू

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण भागात दळवळणाची साधने नाहीत. तसेच येथील नागरिकांना उपचारासाठी पायपीट करून दवाखान्यात यावे लागते. परंतु वेळेवर उपचार न मिळाल्याने चार महिन्याच्या गरोदर मातेला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या महिलेचं वय असून ती गुंडेनूर येथील रहिवासी होती.  यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भामरागड तालुक्यातील नदी-नाले ओसंडून वाहत आहे. या परिसरात पक्के रस्ते आणि नदी-नाल्यावर पूल नसल्याने पावसाळ्यात नदीच्या प्रवाहातून जीव धोक्यात घालून पायवाट काढावे लागते. अशा परिस्थितीत ८ जून रोजी ही महिला शेतात काम करून घरी परतल्यावर अचानक तिला चक्कर आली.

मिळालेल्या माहितीनुसार, महिलेची प्रकृती गंभीर असल्याने वैदयकीय अधिकाऱ्यांनी तिला भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. परंतु लाहेरी वरून रुग्णवाहिकेने तिला ग्रामीण रुग्णालयात आणले असता येथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.