अड्याळ, कन्हाळगावात कोविड सेंटर सुरू करा; सरपंच निखाडे यांची मागणी

चामोर्शी शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. चामोर्शी तालुक्यातील येनापूर आरोग्य पथकांतर्गत बऱ्याच गावात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत.

  चामोर्शी (Chamorshi).  शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा शिरकाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. चामोर्शी तालुक्यातील येनापूर आरोग्य पथकांतर्गत बऱ्याच गावात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशा रुग्णांना उपचार देण्यासाठी व त्यांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यासाठी अड्याळ, कन्हाळगाव येथील आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी सोमनपलीचे सरपंच नीलकंठ निखाडे यांनी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.

  येनापुर हे परिसरातील मोठे गाव आहे. आरोग्याची समस्या लक्षात घेऊन येथे गेल्या काही वर्षांपासून आरोग्य पथक कार्यरत आहे. मात्र, या आरोग्य पथकात गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे पथक एनआरएचएमच्या भरोशावर आरोग्य सेवा पुरवित आहे. मात्र, गेल्या एक वर्षांपासून कोरोना महामारीचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्या वाढल्या आहेत.

  येनापूर परिसरात जैरामपूर, मुधोली तुकूम, मुधोली रिठ, मुधोली चक नं. 2, लक्ष्मणपूर, विट्ठलपूर, गनपुर रै., सेलुर, दुर्गापूर, किष्टापूर, अड्याळ, चित्तरंजनपूर, सगणापुर, आंबोली, वायगाव, चांदेश्वर, रविंद्रपूर, राजगोपलपूर, कन्हाळगाव, प्रियदर्शनी, रश्मिपूर, सोमनपल्ली, धर्मपूर, हळदी, हळदीमाल असे 20 ते 25 गावे समाविष्ट आहेत. या गावाचे केंद्रबिंदू असलेल्या येनापूर आरोग्य पथकात वैद्यकीय अधिकारीच नसल्याने नागरिकांवर उपचार कसे होतील, याची कल्पना न केलेली बरी.

  उपचार करण्यासाठी स्थानिक आरोग्य पथकात कोविड सेंटर नसल्यामुळे रुग्णांना तालुका व जिल्हा ठिकाणावर हलवावे लागत आहे. रुग्णांमध्ये लहान मुले, वयोवृद्ध माणसे, विकलांग अशा रुग्णांचा समावेश आहे. तालुका व जिल्हा ठिकाणचे अंतर जास्त असल्यामुळे आणि रुग्णांची पाहिजे तशी व्यवस्था होत नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना कमालीचा त्रास होत आहे. रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून अड्याळ व कन्हाळगाव येथील आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर सुरू करावे, अशी मागणी सरपंच नीलकंठ निखाडे यांनी केली आहे.

  दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागाला विळखा
  कोरोना व्हायरसने चांगलाच कहर केला आहे. पहिली लाट संपताच यावर्षी दुसरी लाट तीव्र गतीने सुरू झाल्यामुळे रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. मागील वर्षी शहरी भागात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला. मात्र दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागालाही चांगलेच ग्रासले आहे. येनापूर आरोग्य पथकातर्गत येणाऱ्या गावात दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. रुग्णाचा इतरांशी संसर्ग होऊ नये म्हणून अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात येत आहे.