वाघ आता थेट गडचिरोली शहराच्या वेशीवरच; महिलेवर हल्ला करून मृतदेह ओढत नेला

गडचिरोली शहरापासून अवघ्या तीन ते साडेतीन किमी अंतरावर असलेल्या चांदाळा बिटमधील कक्ष क्रमांक 174 मध्ये जंगलात लाकडे तोडणाऱ्या महिलेला वाघाने ठार केल्याने ग्रामीण भागांत अधूनमधून दिसणारे वाघ आता थेट गडचिरोली शहराच्या वेशीवरच पोहोचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनविभागापुढे या वाघांनी नवे आव्हान निर्माण केले असून मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

गडचिरोली (Gadchiroli).  गडचिरोली शहरापासून अवघ्या तीन ते साडेतीन किमी अंतरावर असलेल्या चांदाळा बिटमधील कक्ष क्रमांक 174 मध्ये जंगलात लाकडे तोडणाऱ्या महिलेला वाघाने ठार केल्याने ग्रामीण भागांत अधूनमधून दिसणारे वाघ आता थेट गडचिरोली शहराच्या वेशीवरच पोहोचल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वनविभागापुढे या वाघांनी नवे आव्हान निर्माण केले असून मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.

शहरातील इंदिरानगर येथील सुधा अशोक चिलमवार ही महिला बुधवार (ता. 16) दुपारी इतर पाच ते सहा महिलांसोबत सरपणाकरिता जंगलात गेली होती. सरपण गोळा करताना सुधा चिलमवार हिच्यावर वाघाने हल्ला करून तिला जवळपास 40 मीटर ओढत नेले. सोबतच्या महिलांनी आरडाओरडा करत पळ काढला व वनविभागाला माहिती दिली. वाघाने मृत सुधा चिलमवार यांच्या पायाचा व वरचा थोडा भाग खाल्लेला आढळून आला. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी राजगाटा येथेही वाघाने एक व्यक्तीला ठार केले होते. तसेच काही महिन्यांपूर्वी तेंदू, व मोह हंगाम सुरू असताना वडसा वनविभागात वाघाने दोघांना ठार केले. याशिवाय मागील महिन्यात चामोर्शी तालुक्‍यात बिबट्याने शौचास गेलेल्या एका महिलेला ठार केले होते. मागील साधारणत: तीन वर्षांत गडचिरोली जिल्ह्यात वाघांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे.

आतापर्यंत आरमोरी, देसाईगंज, चामोर्शी, आलापल्ली या भागांत दिसणारे वाघ आता गडचिरोली शहरानजीक चांदाळा, बोदली, खरपुंडी, गोगाव, साखरा, काटली, वाकडी अशा भागात दिसू लागले आहेत. यापूर्वीही मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या काहीजणांना चांदाळा मार्गावर वाघाचे दर्शन झाले होते. त्यामुळे गडचिरोली शहराच्या आसपासच अनेक वाघांची हालचाल दिसून येत आहे. काही भागांत चार बछडे असलेली वाघीणसुद्धा आहे. याशिवाय बिबटही दिसून येतात.

काही महिन्यांपूर्वी शहरातील स्नेहनगर परिसरात गडचिरोली-धानोरा महामार्गापासून अवघ्या तीस ते चाळीस फूट अंतरावर असलेल्या एका घराच्या आवारात बांधलेली शेळी बिबट्याने मारली होती. त्यामुळे आता वाघ व बिबट्यांकडून पाळीव प्राणी किंवा माणसांवर हल्ला होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे वनविभाग हे आव्हान कसे पेलते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

नियोजन सुस्तच…
खरेतर राजगाटा येथील व्यक्तीला वाघाने ठार केल्यानंतरच वनविभागाने सावध होऊन वाघ, बिबट्याचा मानवाशी संघर्ष होऊ नये, यासाठी पावले उचलणे आवश्‍यक होते. तसेच वाघांचा वावर असलेल्या परिसरातील गावांमध्ये जनजागृती करणे, बैठकांचे आयोजन, सावधानता बाळगण्याचे इशारे देणारे फलक, गस्ती पथकाची टेहळणी, या समस्येवर तोडगा काढण्यासाठी अनुभवी निसर्गअभ्यासक, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेणे, अशा अनेक गोष्टी करता आल्या असत्या. पण, वनविभागाचे यासंदर्भातील नियोजन सुस्तच दिसून येत आहे.