10 लाख रुपयांचा प्लान आणि फक्त 128kbps स्पीड, २५ वर्षांपूर्वी भारतात असं मिळत होतं इंटरनेट

भारतात इंटरनेट जवळपास २५ वर्षांपूर्वी दाखल झालं आणि तेव्हापासून प्लान आणि डेटा स्पीडमध्ये खूपच मोठे बदल आपण अनुभवत आहोत. 1995 मध्ये व्हीएसएनएलने जेव्हा इंटरनेट सेवाचा श्रीगणेशा केला तेव्हा सर्वात स्वस्त फिक्स्ड प्लान 2लाख रुपयांहून अधिक किंमतीला मिळत होता आणि अवघा 9.6kbps स्पीड मिळत होता. तेव्हा प्लान्समध्ये जास्तीत जास्त 128kbps चा स्पीड मिळत होता.

मुंबई : इंटरनेट शिवाय आज जग आणि या आभासी जगाची कल्पनाच करता येणार नाही आणि भारतातील सर्वात मोठी लोकसंख्या मोबाइल नेटवर्क्सच्या माध्यमातून याच्याशी जोडली गेली आहे. आज 1000 रुपयांहून कमी किंमतीत ब्रॉडबँड प्लान 100Mbps पर्यंत स्पीड ऑफर करत आहे पण परिस्थिती नेहमी नसते. 1995 साली जेव्हा पहिल्यांदा इंटरनेट भारतात आलं तेव्हा प्लान सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर होते आणि कनेक्शन स्पीड खूपच कमी होता.

विदेश संचार निगम लिमिटेड अर्थात व्हीएसएनएलने सर्वप्रथम 1 मे 1995 रोजी भारतात इंटरनेट आणलं भारत या दशकाच्या सुरुवातीला ग्लोबल इकॉनॉमीशी जोडला गेला होता आणि याबाबत व्हीएसएनएलने पहिला पुढाकार घेतला होता. जवळपास 3 कोटी युजर्सला इंटरनेट सेवेचा पर्याय देत व्हीएसएनएलने www, ftp आणि gopher सारख्या सेवा युजर्सला देण्याचे वचन दिले होते. तोपर्यंत एज्युकेशन आणि रिसर्च नेटकडून शैक्षणिक आणि संशोधन संस्थांनाच ही सेवा देण्यात येत होती.

सर्व युजर्ससाठी इंटरनेट सेवा आणणाऱ्या व्हीएसएनएलने इंटरनेट प्लान्सची जी किंमत ठरवलेली होती, त्याने युजर्सचे सहा प्रकारात वर्गीकरण केले होते. यात स्टुडंट्स, प्रोफेशनल्स, कर्मशिअल, नॉन-कर्मशिअल, रजिस्टर्ड सॉफ्टवेअर आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचा समावेश होता. यात सर्वांना वेगवेगळ्या किंमतीचे वेगवेगळे कनेक्शन स्पीडचे प्लान्स ऑफर केले होते. आजच्या स्पीडच्या तुलनेत हे प्लान खूपच मजेशीर होते.

स्टुडंट्ससाठी डायल-अप प्लान

ऑगस्ट, 1995 च्या इंटरनेट रेट चार्टनुसार, सर्वात स्वस्त प्लान स्टुडंट्ससाठी 200 रुपये होता. पण यात 2.4kbps चा स्पीड मिळत होता. या कनेक्शनमुळे 1MB चा सर्वसाधारण साइझचा फोटो डाउनलोड होण्यासाठी ७ मिनिटांहून अधिक कालावधी लागत होता. प्रोफेशनल्ससाठी एकमेव प्लान 5,000 रुपयांचा होता आणि यात 9.6kbps स्पीड मिळत होता. यात 1MB सर्वसाधारण फोटो डाउनलोड होण्यासाठी जवळपास 2 मिनिट लागत होते. दोन्ही कनेक्शन्स डायल-अप वर मिळत होते आणि वर्षभरात फक्त 250 मिनिट युजर्सला देण्यात येत होते.

2,40,000 रुपयांपासून प्लान सुरू

फिक्स्ड कनेक्शनबाबत सांगायचं झालं तर सर्वात स्वस्त प्लान नॉन-कर्मशिअल युजर्ससाठी 2,40,000 रुपयांचा होता आणि यात 9.6kbps चा स्पीड मिळत होता. याच दरम्यानच्या रेंजमध्ये बाकी कनेक्शन्स देण्यात येत होते, जे 9.6kbps, 64kbps आणि 128kbps स्पीडसह येत होते. या कनेक्शनसाठी युजर्सला बँडविड्थ चार्ज द्यावा लागत होता.

आता 300 टक्के अधिक वेगवान स्पीड

आज 100 रुपयांहून कमी किंमतीत युजर्सला दररोज 1 जीबी डेटा देणारे प्लान मिळत आहेत, अशातच 25 वर्षांच्या या प्रवासात भारताचा इंटरनेटच्या जगातील सर्वात मोठ्या युजरबेसमध्ये समावेश झाला आहे. आज भारताला सरासरी इंटरनेट स्पीड जवळपास 812.5kbps मिळतो आहे. जो 25 वर्षांपूर्वी युजर्सला मिळणाऱ्या सरासरी डायल-अप स्पीडपेक्षा 300टक्के अधिक वेगवान आहे. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरचा युजरबेस गेल्या वर्षात वेगाने वाढत आहे, सोबतच 5G देखील भारतात नव्या पायाभूत सुविधांसह येण्याच्या तयारीत आहे.