फोनमध्ये ‘या’ गोष्टी असतील तर तुम्ही होणार हॅकर्सचे लक्ष्य

अधिकाधिक अँड्रॉइड स्मार्टफोन क्वालकॉम प्रोसेसरसह येतात आणि या चीप्समध्ये 400 हून अधिक दोष अस्तित्त्वात आहेत असा निष्कर्ष संशोधकांच्या संशोधनात आढळून आला आहे. या दोषांच्या मदतीने फोन हॅक करून यावर नियंत्रण मिळवणे सोपे असून यावरून कॉल रेकॉर्डिंगही करता येणे शक्य आहे. या दोषांमुळे अगदी सहज युजर्सचा डेटा चोरता येणे शक्य होणार असून अपडेट केल्यानंतरच हे फिक्स करता येणार आहे.

मुंबई : डिजिटल सिग्नल प्रोसेसरचं नाव आपणही कधीतरी ऐकलं असेलच. याच्या मदतीने फोनवर मिळणाऱ्या फीचर्सचा वापरही आपण नक्कीच करत असाल.  सिंगल चीपमध्ये अस्तित्वात असलेल्या या प्रोसेसरलाच संपूर्ण कंप्युटर मानलं जातं आणि याच्याच मदतीने फोनमध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी किंवा ऑगमेंटेड रिअलिटीसारखे फीचर्स मिळतात. तथापि, ही चीपच हॅकर्ससाठी आपल्या फोनचे प्रवेशद्वार ठरू शकते.

सायबर सिक्युरिटी फर्म Check Point च्या संशोधकांच्या मते, चीपमध्ये असलेल्या पळवाटांच्या विस्तृत श्रेणीचा लाभ हॅकर्सना मिळू शकतो. संशोधक स्लावा मक्कावीवच्या वतीने याबाबत अधिक माहिती देण्यात आली आहे की, कशाप्रकारे हे प्रोसेसर अटॅकर्ससाठी प्रवेशद्वार ठरू शकते आणि हॅकर्सला पूर्ण अँड्रॉइड डिव्हाइसेजचा कंट्रोल मिळू शकतो.

क्वालकॉमचे सर्वात मोठे आवाहन

संशोधकांनी  क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चीपवर संशोधन केल्यानंतर ४० टक्क्यांहून अधिक अँड्रॉइड डिव्हाइसेजमध्ये वापरण्यात येणाऱ्या या चीपमध्ये 400 हून अधिक दोष आणि सुरक्षिततेच्या त्रुटी आहेत. एखादा हॅकर अशाप्रकारे ॲप डिझाइन करून या  चीपमध्ये असलेल्या दोषांचा फायदा घेऊ शकतो, यामुळे विद्यमान असलेल्या सुरक्षेच्या निकषांना डावलून पुढे जाणे सहज शक्य होणार आहे.

कॉल रिकॉर्डिंग करण्याचाही शक्यता

दोषांचा फायदा घेऊनच हॅकर्स डेटाचोरीपासून फोटो-व्हिडिओ आणि लोकेशनशी संबंधित सर्व माहितीदेखील साफ करू शकतात. दोषांमुळे  एखाद्या ॲपच्या मदतीने कॉल रेकॉर्डही केला जाऊ शकतो, किंवा मायक्रोफोनच्या मदतीने हॅकर हेरगिरीही करण्याची शक्यता आहे. क्वालकॉमच्या वतीने दोष समोर आल्यानंतर याबाबतचा इशारा जारी करण्यात आला आहे. फक्त फोन उत्पादकांकडूनच अपडेट दिल्यानंतर हे दोष दूर करता येणार आहेत.