apple event 2020 iphone12 not launched people disappointed reactions on twitter
Apple Event 2020 : iPhone 12 लाँच न झाल्याने नाराजीचा सूर

Apple Event 2020 : यंदा Apple ने आपल्या बहुप्रतिक्षित iPhone 12 चं लाँचिंग थांबवलं आहे.

अ‍ॅपलने आपल्या खास कार्यक्रमामध्ये दमदार आणि जबरदस्त फीचर्स असलेली काही उत्पादने लाँच केली आहेत. कोरोना (corona) संकटकाळात हा संपूर्ण सोहळा ऑनलाईन (online) संपन्न झाला आहे. या कार्यक्रमात Apple Watch Series 6 आणि Apple Watch SE लाँच करण्यात आली आहे. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टिम कूक यांनी पेन्सिल आणि रेटीना डिस्प्ले असलेले Apple iPad Air देखील लाँच केलं आहे. मात्र यंदा Apple ने आपल्या बहुप्रतिक्षित iPhone 12 चं लाँचिंग थांबवलं आहे.

iPhone 12 लाँच न झाल्याने लोकांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळत आहे. अनेक जण निराश झाले असून सोशल मीडियावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लोक iPhone 12 ची आतुरतेने वाट पाहत होते. या कार्यक्रमात तो लाँच केला जाईल अशी सर्वांची अपेक्षा होती. अ‍ॅपलने आपल्या कार्यक्रमात काही दमदार उत्पादने लाँच केली पण iPhone 12 लाँच न केल्याने ट्विटरवर भन्नाट प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. यावरून अनेक मीम्सही व्हायरल झाले आहेत.

Apple दरवर्षी आपला नवा iPhone बाजारात लाँच करतो. मात्र यंदा संपूर्ण जग कोरोना संकटाचा सामना करत आहे. कोरोनाच्या या महामारीचा फटाका अ‍ॅपलला देखील बसू शकतो. त्यामुळेच अ‍ॅपलने यंदा आपला बहुप्रतिक्षित iPhone 12 लाँच केला नसल्याचं म्हटलं जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अ‍ॅपलकडून नवीन आयपॅड लाँच करण्यात आलं असून विद्यार्थ्यांसाठी विशेष सवलत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना 299 डॉलरमध्ये मिळणार आहे.

अ‍ॅपलने दोन नवीन अ‍ॅपल वॉच लाँच केले आहेत. अ‍ॅपलकडून स्मार्टवॉचची सहावी सीरिज (Apple Watch 6 Series) लाँच करण्यात आली आहे. कोरोना काळातील आरोग्याचा विचार करता कंपनीनं स्मार्टवॉचच्या सहाव्या सीरिजमध्ये रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण मोजणारं फीचर दिलं आहे. यासोबतच ईसीजी, हार्ट रेट आणि अन्य सेन्सर देखील असणार असून ते अ‍ॅपल वॉच सीरिज 5 आणि सीरिज 4 सोबत असणार आहेत. कोरोनाच्या या संकटात रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण हे अत्यंत महत्त्वाचे आहे. रक्तातील ऑक्सिजन अवघ्या 15 सेकंदांत मोजण्याची सुविधा यामध्ये देण्यात आली आहे.

अ‍ॅपलच्या सीरिजमध्ये नवीन वॉच फेस

अ‍ॅपल वॉच सीरिज 6 मध्ये एलिवेशन ट्रेकिंग देण्यात आले आहे. एलिवेशन ट्रेकिंगमुळे युजरला तो किती उंचीवर आहे याची देखील माहिती मिळण्यास मदत होणार आहे. अ‍ॅपलच्या या सीरिजमध्ये नवीन वॉच फेस देण्यात आले आहेत. जे युजर्स त्यांच्या हिशोबाने कस्टमाइज करू शकतात. या सीरिजची किंमत 399 अमेरिकन डॉलरपासून सुरू होते. भारतात Apple Watch 6 Series (GPS) ची किंमत 40 हजार 900 रुपयांपासून सुरू होईल. तर Apple Watch Series 6 (GPS Cellular) 49 हजार 900 रुपयांनी सुरू होईल.