संपूर्ण भारतीय बनावटीच्या विमानाची पहिली चाचणी यशस्वी; यादव यांच्या प्रयत्नांना यश

विमान निर्मिती क्षेत्रात भारताला स्वालंबी बनवू पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाने चाचणीचा पहिला टप्पा पार केला आहे. ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांनी ही चाचणी पूर्ण केली.

धुळे : विमान निर्मिती क्षेत्रात भारताला स्वालंबी बनवू पाहणाऱ्या कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाने चाचणीचा पहिला टप्पा पार केला आहे. ७४ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांनी ही चाचणी पूर्ण केली. पहिल्या टप्प्यात या विमानाचा विमानतळावरील वावर, उड्डाण अवतरण यांची चाचणी धुळे विमानतळावर काल घेण्यात आली.

कॅप्टन अमोल यादव यांनी १९९८ साली आपल्या ‘थर्स्ट एअरक्राप्ट’ कंपनीच्या माध्यमातून देशातील पहिल्यावहिल्या विमाननिर्मितीचा प्रयत्न सुरू केला. त्यानंतर त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांनी नाउमेद न होता आपले प्रयत्न सुरूच ठेवले. २००३मध्ये त्यांनी दुसऱ्या विमानाची निर्मिती सुरू केली. हा प्रकल्प काही अडचणींमुळे पूर्ण होऊ शकला नाही. २०११ साली अर्ज करूनही ‘नागरी हवाई वाहतूक संचालनालया’कडून (डीजीसीए) विमानाला मान्यता मिळण्यासाठी अनेक वर्षे गेली. २०१९ मध्ये चार वर्षांच्या कागदोपत्री टोलवाटोलवीनंतर कॅप्टन अमोल यादव यांच्या विमानाची अधिकृत नोंदणी झाली. त्यानंतर पुन्हा त्याच्या चाचण्या पूर्ण करण्यासाठी त्यांना २०२० ची वाट पाहावी लागली. दरम्यानच्या काळात ‘मेक इन इंडिया’ प्रदर्शनामध्येही कॅप्टन अमोल यांनी विमानासह सहभाग घेतला होता.  यापुढील चाचणी विमान सर्किट पूर्ण करण्याची आणि एका विमानतळाहून दुसऱ्या विमानतळावर जाण्याची असेल.

मागील सरकारकडून आलेल्या कटू अनुभवानंतर अद्याप राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारशी त्यांचा संपर्क झाला नसल्याची माहिती यादव यांनी दिली. नव्या राज्य सरकारकडून त्यांच्या या आत्मनिर्भर प्रयत्नासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा आहे. आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करून दाखवायचे आहे, हा विचार तरुण पिढी, उद्योजकांनी मनात पक्का करावा, असे आवाहन कॅप्टन अमोल यादव यांनी स्वातंत्र्य दिनी केले आहे.