नोकरी शोधणाऱ्यांसाठी ‘नो टेन्शन’, Google ने भारतात लाँच केलं ‘विशेष App’

या ॲपच्या माध्यमातून गुगलने भारतात Linkdin, Monster आणि Naukri.com यांसारख्या जॉब पोर्टल्सना टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.

मुंबई : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे, याला कारणही तसंच आहे. गुगलने नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक खास अ‍ॅप आणलं आहे. कंपनीने Kormo Jobs हे आपलं नवीन जॉब सर्चिंग अ‍ॅप भारतात लाँच केलं आहे. या अ‍ॅपद्वारे युजर्सना मनाप्रमाणे नोकरी शोधण्यास मदत होणार आहे.  गुगलने हे अ‍ॅप सर्वप्रथम 2018 मध्ये बांगलादेशात लाँच केलं होतं. त्यानंतर 2019 मध्ये इंडोनेशियात हे अ‍ॅप कंपनीने उपलब्ध केलं. Kormo Job द्वारे नोकरी शोधण्यासोबतच अर्जही करता येणार आहे. याशिवाय युजर्स आपला डिजिटल बायोडेटाही (डिजिटल CV) याद्वारे तयार करु शकतात. या ॲपच्या माध्यमातून गुगलने भारतात Linkdin, Monster आणि Naukri.com यांसारख्या जॉब पोर्टल्सना टक्कर देण्याची तयारी सुरू केली आहे.

गुगलने गेल्या वर्षी Google Pay मध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी ‘जॉब्स स्पॉट’ सेक्शन जोडलं होतं. त्यावेळी या सर्व्हिसमध्ये घरपोच सामानाची डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या, रिटेल, हॉस्पिटॅलिटी आणि हॉटेल क्षेत्राशी निगडीत नोकऱ्या उपलब्ध होत्या. गुगल पे इंटिग्रेशनद्वारे Dunzo आणि Zomato यांसारख्या कंपन्यांनी 20 लाखांहून जास्त जॉब्स पोस्ट केले होते असा कंपनीने दावा केला आहे. याद्वारे किती जणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या याची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही. पण आता कंपनीने ‘जॉब्स स्पॉट’चा विस्तार करत ‘कोरमो जॉब्स’हे अ‍ॅप रिब्रँड करुन नव्या ढंगात आणलं आहे.

कोरमो जॉब्समध्ये युजर्स आपल्या प्रोफाइलनुसार जॉब शोधू शकतात. याशिवाय यामध्ये अन्य अनेक टूल्स आहेत, ज्याद्वारे प्रोफाइलमध्ये करिअर आणि नवीन स्किल्स अपग्रेड करता येतात. या अ‍ॅपमध्ये डिजिटल CV तयार करता येतो, डिजिटल सीव्हीची प्रिंट काढण्यापासून तो तुम्ही इतरांसोबत शेअरही करु शकतात. कोरमो जॉब्स हे अ‍ॅप अँड्रॉइड युजर्ससाठी गुगलच्या प्ले स्टोअरवर डाउनलोडसाठी उपलब्ध झालं आहे. याद्वारे गुगल भारतात लिंक्डइन, मॉन्स्टर, Naukri.com, Shine.com आणि टाइम्सजॉब्स यांसारख्या जॉब पोर्टल्सना टक्कर देईल.