Google Pay मध्ये आता आलं नवं फीचर; करता येणार NFC बेस्ड पेमेंट

गुगल ची पेमेंट सर्विस Google Pay मध्ये आजवर फक्त युपीआय बेस्ड पेमेंट ऑप्शनचाच पर्याय उपलब्ध होता. पण आता युजर्स नवीन NFC बेस्ड पेमेंट फीचरचाही लाभ घेऊ शकतील.

नवी दिल्ली : Google अखेरीस देशात आपला प्लॅटफॉर्म Google Pay चा विस्तार करत आहे. सर्च इंजिन दिग्गज कंपनी लवकरच युपीआय बेस्ड पेमेंट व्यतिरिक्त युजर्सला कार्ड आणि NFC सिस्टमच्या माध्यमातून पेमेंटचा पर्याय देण्याची शक्यता आहे. पण अद्याप कंपनीने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही परंतु काही सपोर्ट पेजेस लाइव्ह केली आहेत. ज्यामुळे नवीन पेमेंट ऑप्शनचा वापर कसा करायचा याबाबत माहिती दिलेली आहे.

Android Police च्या एका अहवालात या फीचरची माहिती सर्वप्रथम देण्यात आली. हे फीचर आता ॲक्सिस बँक क्रेडिट/डेबिट आणि SBI क्रेडिट/डेबिट कार्ड्स पर्यंतच मर्यादित आहे. येत्या काळात आणखी बँकांपर्यंत या फीचरचा विस्तार होईल अशी आशा आहे. अहवालात म्हटल्याप्रमाणे, पेमेंटसाठी आपले कार्ड सेटअप करण्यापूर्वी युजरला व्हेरिफिकेशन प्रोसेस पूर्ण करावी लागेल. या प्रोसेसमध्ये बँकेकडून मिळालेला OTP नंबर भरावा लागेल. एकदा रजिस्टर केल्यानंतर गुगल पे ॲपच्या माध्यमातून NFC इनेबल टर्मिनलचा वापर करून पेमेंट सर्व्हिस सुरू करता येणार आहे.

अद्याप हे फीचर सर्व युजर्ससाठी रोलआउट करण्यात आलेलं नाही. पण एक Reddit पोस्टनुसार, युजर्सला गेल्याच महिन्यात हा ऑप्शन दिसायला सुरुवात झाली आहे. हे सर्व्हरच्या माध्यमातून रोलआउट होत आहे असं म्हटलं जात आहे, यासाठी हळूहळू हे सर्व युजर्सपर्यंत पोहोचेल. हे फीचर आधीच काही युजर्सपर्यंत पोहोचले आहे आणि बाकी इतरांकडे पोहोचण्याच्या तयारीत आहे, अशातच गुगल लवकरच याबाबत अधिकृत माहिती देईल अशी आशा आहे.

गुगलचे सीईओ सुंदर पिचाई निश्चितच गुगल पे कडे लक्ष देत आहेत. गुगल फॉर इंडिया 2020 इव्हेंट दरम्यान विशेषत: भारतात तयार केलेल्या G Pay ॲपवर आधारित एक ग्लोबल प्रॉडक्ट करण्याच्या तयारीत आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.