मोठी घोषणा; म्हणून वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना मिळणार ४० हजार रुपये

कोरोना रुग्णांची वाढणारी संख्या लक्षात घेता अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची (work from home ) मुदत डिसेंबरपर्यंत वाढवली आहे. जे कर्मचारी घरातून काम करत आहेत अशा लोकांसाठी काही कंपन्या अतिरिक्त पैसे देत आहेत. जेणेकरून त्यांना इंटरनेट, टेबल, खुर्ची आणि अन्य गोष्टी विकत घेता येणार आहेत.

नवी दिल्ली: कोरोना व्हायरसमुळे (corona virus) जगभरातील अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरातून अर्थात वर्क फ्रॉम होमची (work from home ) सुविधा दिली आहे. याची सर्वात पहिल्यांदा सुरुवात गुगलने (google) केली होती. त्यानंतर फेसबुक (facebook) आणि अन्य आयटी कंपन्यांनी (it companies) देखील कोरोना (corona) चा धोका टाळण्यासाठी वर्क फ्रॉम होम सुरू केले. सुरुवातीला ३ महिने त्यानंतर पुन्हा तीन महिन्यांची वाढ दिल्यानंतर देखील कोरोनाचा धोका कमी न झाल्याने अनेक कंपन्यांनी डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. गुगलने तर पुढील वर्षी म्हणजे जून २०२१ पर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे.

जे कर्मचारी घरातून काम करणार आहेत अशा कर्मचाऱ्यांना गुगलने ७५ हजार रुपये (१ हजार डॉलर) देण्याचे जाहीर केले होते. ही रक्कम घरातून ऑफिसचे काम करताना लागणाऱ्या फर्निचर, इंटरनेट आदी गोष्टींसाठी असल्याचे गुगलने म्हटले होते. गुगलनंतर आता आणखी एका कंपनीने कर्मचाऱ्यांना घरातून काम करताना आवश्यक वस्तू विकत घेण्यासाठी अधिकचे पैसे देण्याची घोषणा केली आहे.

मोबाइल मेसेजिंग प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणाऱ्या हाइक (Hike) ने त्यांच्या कर्मचाऱ्यांना या वर्षाच्या अखेरपर्यंत घरातून काम करण्याची परवानगी दिली आहे. त्याच बरोबर प्रत्येक कर्मचाऱ्याला ४० हजार रुपये दिले जाणार आहेत.

कंपनीने दिल्लीतील ऑफिसमध्ये येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरामदायक खुर्ची आणि टेबल देणार असल्याचे म्हटले आहे. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येणार नाहीत त्यांना खुर्ची आणि टेबल विकत घेण्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये दिले जातील. त्या शिवाय इंटरनेट आणि अन्य कामकाजाच्या वस्तू विकत घेण्यासाठी पैसे दिले जाणार आहेत.

यासाठी दिले जाणार पैसे

> २५ हजार रुपये फर्निचर आणि अन्य वस्तू
> १ हजार ५०० प्रत्येक महिन्याच्या इंटरनेटसाठी

स्वत:च्या इच्छेने ऑफिसला येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी

कंपनीने हे स्पष्ट केले की, जे कर्मचारी ऑफिसला येत आहेत ते त्यांच्या इच्छेने येत आहेत. यासाठी सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेच्या अन्य मापदंडाचे पालन केले जात आहे.

इनव्हर्टर आणि युपीएससाठी पैसे

जे कर्मचारी घरातून काम करत आहेत अशा कर्मचाऱ्यांना वीज गेली तर त्यासाठी इनव्हर्टर आणि युपीएस घेण्यासाठी काही कंपन्या कर्मचाऱ्यांना पैसे देत आहेत. त्याच बरोबर वायफाय अपग्रेड करायचा असेल तर त्यासाठी देखील कर्मचाऱ्यांना पैसे दिले जात आहे.