reliance jio to roll out 10 crore low cost android phones by december
रिलायन्स जिओ लवकरच १० कोटी स्वस्त ४जी स्मार्टफोन करणार लाँच

मुंबई : टेलिकॉम क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता रिलायन्स जिओ (Reliance Jio) स्मार्टफोनच्या बाजारात आपली ताकद दाखवण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. कारण, रिलायन्स जिओ डिसेंबर 2020 च्या अखेरपर्यंत भारतात 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन (smartphone) लाँच करण्याची शक्यता आहे.

बिजनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, रिलायन्स जिओ डिसेंबर अखेरपर्यंत 10 कोटी स्वस्त 4जी स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्वस्त 4जी स्मार्टफोन गुगल अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. या वर्षी डिसेंबर अखेरपर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरूवातीला फोन कंपनी लाँच करु शकते, असं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. जिओचा हा 4G फोन गुगलसोबतच्या भागीदारीअंतर्गत लाँच होण्याची शक्यता आहे.

काही महिन्यांपूर्वीच गुगलने जिओमध्ये 4.5 बिलियन डॉलरची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर गुगल एक स्वस्त अँड्रॉइड व्हर्जनवर काम करत असून, याच व्हर्जनमध्ये कंपनी आपला फोन लाँच करेल असं जुलै महिन्यात जिओकडून सांगण्यात आलं होतं.

गुगल आणि जिओच्या या स्वस्त 4जी स्मार्टफोनमुळे शाओमी, ओप्पो, व्हिवो, सॅमसंग आणि नोकिया यांसारख्या कंपन्यांना चांगलीच टक्कर मिळणार आहे.