व्हॉट्सॲपला Telegram ची टक्कर, आता आलं व्हिडिओ कॉलिंग फीचर

मेसेजिंग ॲप्सची चर्चा होते तेव्हा सर्वप्रथम नाव येतं ते व्हॉट्सॲपच. आता या मेसेजिंग प्लॅटफॉर्मला टक्कर देण्यासाठी Telegram ॲप सज्ज झालं आहे. या ॲपवर आतापर्यंत युजर्सला व्हिडिओ कॉलिंगचा ऑप्शन मिळत नव्हता पण आता टेलिग्राम ॲप अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्ही प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ कॉलिंगही देणार आहे.

मुंबई : सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपला जर कोणी टक्कर देत असेल तर ते आहे Telegram. हे ॲप युजर्सचे चॅट पूर्णपणे सेफ आणि सुरक्षित असल्याचा दावा करतं. व्हॉट्सॲप डेटा लीकची काही प्रकरणं समोर आल्यानंतर वेगाने हे ॲप लोकप्रियही होत आहे. आज टेलिग्राम ॲपचा मोठा युजरबेस आहे. आजवर यात व्हिडिओ कॉलिंगचं फीचर्स युजर्सला मिळत नव्हतं. आता या ॲपमध्ये व्हिडिओ कॉलिंगचीही सुविधा मिळणार आहे.

हे ॲप २०१३ साली सिक्रेट मेसेजिंग फीचरवर लक्ष केंद्रीत करून सुरू करण्यात आलं होतं. आता टेलिग्रामचे ४० कोटीहून अधिक युजर्स आहेत. सर्वाधिक डाउनलोड होणाऱ्या टॉप-10 ॲप्समध्ये याचा समावेश आहे. अद्यापही नवीन व्हिडिओ कॉलिंग फीचर अल्फा स्टेजमध्ये आहे. टेलिग्राम ॲपवर युजर्सला चॅटिंग आणि मल्टीमीडिया शेअरिंग व्यतिरिक्त व्हॉइस कॉलिंगचा ऑप्शनही मिळत आहे. ॲपवर मिळणाऱ्या सर्व सेवा एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असून त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत.

ग्रुप कॉलिंग ऑप्शन लगेच मिळणार नाही

व्हॉट्सॲपवर व्हिडिओ कॉलिंग फीचर युजर्सला 2016 सालापासूनच मिळत आहे, तर टेलिग्रामने आतापर्यंत हा ऑप्शन युजर्सला दिला नव्हता. टेलिग्रामचं लेटेस्ट व्हर्जन व्हिडिओ कॉलिंग फीचर टेस्टिंगसोबतच ॲनिमेटेड इमोजी ऑप्शनही देणार आहे. ॲपमध्ये व्हिडिओ कॉलिंग एखाद्या कॉन्टॅक्टच्या प्रोफाइल पेजवरून करता येणार आहे. अद्याप ग्रुप कॉलिंगचा ऑप्शन दिलेला नाही तर तूर्तास वन-टू-वन व्हिडिओ कॉल्सच करता येणार आहेत.

एंड-टू-एंड एनक्रिप्शन मिळणार

ॲपवर करण्यात येणारे सर्व व्हिडिओ कॉल्स एनक्रिप्टेड आहेत आणि हे एनक्रिप्शन एका इमोजीद्वारे कन्फर्म केलं आहे. हे चार इमोजी व्हॉइस कॉलदरम्यानही एनक्रिप्शन दर्शवितात. एका ब्लॉगपोस्टमध्ये टेलिग्रामने स्पष्ट केलं आहे की, 2020 मध्ये फेस-टू-फेस कम्युनिकेशन ची गरज असल्याचे समोर आलं आणि आमच्या व्हिडिओ कॉलिंग फीचरचा अल्फा अँड्रॉइड आणि iOS दोन्हीवर युजर्सला लाभ मिळत आहे. लवकरच हेही अपडेट होण्याची शक्यता आहे.