एका सर्वसामान्य गृहिणीच्या स्वप्नांचा रंजक प्रवास सांगणारी कथा म्हणजे ‘गोष्ट एका पैठणीची’(Goshta Eka Paithanichi). प्रत्येक स्त्रीला तिच्याकडे एखादी जरतारीची पैठणी असावी, असे मनापासून वाटते. असंच खूप सामान्य स्वप्नं बाळगणाऱ्या इंद्रायणीच्या आयुष्यात आलेली पैठणी तिला कसा तिला रंजक प्रवास घडवते, हे पाहायला मिळणार आहे, शंतनू रोडे (Shantanu Rode) लिखित, दिग्दर्शित ‘गोष्ट एका पैठणीची’ मधून. नुकतंच या चित्रपटातील गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. ‘बहर आला’(Bahar Ala Song) असे बोल असणारे हे गाणे शंकर महादेवन यांच्या आवाजाने अधिकच बहरले आहे. सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि सुव्रत जोशी (Suvrat Joshi) यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचे बोल आणि संगीत माणिक - गणेश यांचे आहेत. गाण्यात सायलीच्या हातात तिचे स्वप्न दिसत असून त्या सत्यात उतरलेल्या स्वप्नाचा ती आनंद घेत आहे. पैठणी नेसून इंद्रायणीचे सौंदर्य बहरलेले असतानाच हे पैठणीचे उभे आडवे धागे तिच्या आयुष्यात काय गुंतागुंत आणतात, हे चित्रपट पाहिल्यावरच कळेल.येत्या २ डिसेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका आहेत.