‘ख्वाडा’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसलेला अभिनेता भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) ‘रौंदळ’ (Raundal) या आगामी मराठी-हिंदी चित्रपटामुळे पुन्हा लाइमलाईटमध्ये आला आहे. ‘बबन’ या गाजलेल्या चित्रपटानंतर ‘रौंदळ’ मध्ये पुन्हा एकदा प्रेक्षकांना भाऊसाहेबचा एक नवा अवतार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटातील नवं गाणं ‘भलरी’(Bhalari Song) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुगीच्या हंगामात पीक काढणीच्या वेळी समूहाने गायला जाणारा गीतप्रकार म्हणजेच ‘भलरी’, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. भलरीला आपल्या साहित्यात ‘श्रमगीत’ म्हणूनही विशेष दर्जा आहे . हा लोप पावत चाललेला गीतप्रकार ‘रौंदळ’ सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडण्यात आला आहे. हा चित्रपट ३ मार्च २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बाळासाहेब शिंदे यांनी हे गाणं लिहिलं असून, संगीतकार हर्षित-अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. गणेश चांदनशिवे, वैशाली माडे आणि हर्षित-अभिराज यांनी आपल्या आवाजाने गाण्याला चार चांद लावलेत. भाऊसाहेब शिंदेनं या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून नेहा सोनावणे ही नवोदित अभिनेत्री त्याच्या साथीला आहे.