प्रेक्षकांमध्ये हास्याचे फवारे उडवायला येत्या १७ जूनपासून ‘भिरकीट’ (Bhirkit) प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल व भाग्यवंती सुरेश ओसवाल निर्मित ‘भिरकीट’चे काही दिवसांपूर्वीच एक मजेदार पोस्टर (Bhirkit Poster) प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या पोस्टरवरून चित्रपटाविषयी उत्सुकता अधिकच वाढली होती. त्यातच आता चित्रपटाचा टिझर (Bhirkit Teaser) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अनुप जगदाळे दिग्दर्शित या चित्रपटात गिरीश कुलकर्णी (Girish Kulkarni), ऋषिकेश जोशी (Rushikesh Joshi), मोनालीसा बागुल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे (Tanaji Galgunde), कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद यांचा हास्यकल्लोळ पाहायला मिळणार आहे. पैसा कमावण्याचे, प्रसिद्धीचे, सुखी राहाण्याचे ‘भिरकीट’ सगळ्यांच्या मागे असताना ‘तात्या’ मात्र वेगळ्याच दुनियेत जगत आहे. त्याच्या या दुनियेत नेमके काय होते आणि त्यातून तो बाहेर येतो का, हे ‘भिरकीट’ पाहिल्यावरच कळेल.