‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने (Prasad Khandekar) ‘एकदा येऊन तर बघा’ (Ekda Yeun Tar Bagha) या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटाचा टीझर (Ekda Yeun Tar Bagha Teaser) नुकताच प्रेक्षकाच्या भेटीला आला. गिरीश कुलकर्णी आणि त्यांचे कुटुंबीय एका नव्याकोऱ्या हॉटेलची सुरूवात करतात. परंतु, नव्या हॉटेलमध्ये अतरंगी पाहुण्याची एन्ट्री झाल्यावर गोष्टी कशा बदलतात हे प्रेक्षकांना 24 नोव्हेंबर रोजी चित्रपट रिलीज झाल्यानंतर जाणून घेता येईल. या चित्रपटात तब्बल 16 विनोदवीर भूमिका साकारणार आहेत. यामध्ये सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, तेजस्विनी पंडित, भाऊ कदम, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पॅडी कांबळे, राजेंद्र शिसटकर, वनिता खरात, रोहित माने, शशिकांत केरकर, सुशील इनामदार, जय चौबे, राकेश शालिन यांचा समावेश आहे.