warship launch

स्वदेशी युद्धनौका निर्मितीच्या इतिहासात आज देश एका ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार झाला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्या उपस्थितीत भारतीय नौदलाच्या दोन आघाडीच्या युद्धनौका प्रोजेक्ट 15B श्रेणीतील मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका 'सुरत' (Surat) आणि प्रोजेक्ट 17A श्रेणीतील 'उदयगिरी' (Udaygiri) , या स्टेल्थ लढाऊ जहाजाचे (Warship Launch) आज मुंबईतील (Mumbai) माझगाव डॉक्स लिमिटेड येथे एकाच वेळी जलावतरण झाले. प्रोजेक्ट 15B श्रेणीतील जहाजे ही मुंबईतील माझगाव डॉक्स लिमिटेड येथे तयार करण्यात आलेली भारतीय नौदलाची अद्ययावत स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आहेत.

  संरक्षणमंत्र्यांनी आपल्या भाषणात या युद्धनौकांचे वर्णन देशाच्या सागरी क्षमता वाढविण्याच्या सरकारच्या अटल वचनबद्धतेचे मूर्त स्वरूप असे केले. रशिया -युक्रेन संघर्ष आणि कोरोनामुळे जागतिक पुरवठा साखळीत व्यत्यय येत असताना भारताने ‘आत्मनिर्भरता’ साध्य करण्यावर लक्ष केंद्रित केले. महामारी असूनही जहाज निर्मिती सुरू ठेवून सध्याच्या भू-राजकीय परिस्थितीत भारतीय नौदलाच्या धोरणात्मक गरजा पूर्ण केल्याबद्दल त्यांनी माझगाव डॉक्स लिमिटेडचे अभिनंदन केले.

  या दोन युद्धनौका भारतीय नौदलाच्या शस्त्रागाराचे सामर्थ्य वाढवतील आणि भारताच्या सामरिक सामर्थ्याचे तसेच आत्मनिर्भरतेच्या सामर्थ्याचे प्रतिनिधित्व करतील,असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले.

  हिंद-प्रशांत क्षेत्र खुले आणि सुरक्षित ठेवण्याचे कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असल्याबद्दल संरक्षणमंत्र्यांनी भारतीय नौदलाचे कौतुक केले. “हिंद-प्रशांत क्षेत्र संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे आहे. भारत या क्षेत्रातील एक जबाबदार सागरी भागधारक आहे. क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासाचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन (SAGAR-Security and Growth for All in the Region) शेजाऱ्यांसोबत मैत्री, मोकळेपणा, संवाद आणि सहअस्तित्व या भावनेवर आधारित आहे. त्याच दृष्टिकोनातून भारतीय नौदल आपले कर्तव्य प्रभावीपणे पार पाडत आहे,”असे ते म्हणाले.

  rajnath singh in mumbai for warship launch

  नौदलाच्या महिलेच्या हस्ते जलावतरण करण्याच्या परंपरेनुसार, नेव्ही वाईव्हज वेलफेयर असोशिएशन(पश्चिम क्षेत्र)च्या अध्यक्षा  चारू सिंग आणि माझगाव डॉक्स लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालकांच्या पत्नी जयश्री प्रसाद यांनी शुभेच्छा देत जहाजांचे अनुक्रमे ‘सुरत’ आणि ‘उदयगिरी’ असे नामकरण केले. नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार आणि भारतीय नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

  surat warship