‘रौंदळ’(Raundal) असं महाराष्ट्राच्या लाल मातीतील रांगडं शीर्षक असणारा हा चित्रपट पहिलं पोस्टर रिलीज झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरला आहे. यातील भाऊसाहेब शिंदेचा (Bhausaheb Shinde) रांगडा लुक रसिकांपासून चित्रपटसृष्टीपर्यंत सर्वांच्याच मनात कुतूहल जागवणारा ठरला आहे.  ‘रौंदळ’ या चित्रपटातील पहिलं गाणं ‘मन बहरलं...’ (Man Baharala Song) नुकतंच रसिकांच्या भेटीला आलं आहे. ‘मन बहरलं...’ या गाण्याद्वारे नेहाची रुपेरी पडद्यावर एन्ट्री झाली आहे. भाऊसाहेब आणि नेहा यांच्यावर चित्रीत करण्यात आलेलं हे रोमँटिक साँग गीतकार डॅा. विनायक पवार यांनी लिहिलं आहे. गायिका वैशाली माडेच्या सुमधूर आवाजात संगीतकार हर्षित अभिराज यांनी संगीतबद्ध केलं आहे. पहिल्या वहिल्या प्रेमातील अबोल भावना या गाण्यात नेहानं सुरेखरीत्या सादर केल्या आहेत.भूमिका फिल्म्स अ‍ॅण्ड एंटरटेनमेंटच्या निर्मिती संस्थे अंतर्गत बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदे यांनी ‘रौंदळ’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गजानन नाना पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पुढच्या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.