manushi chillar

मिस वर्ल्ड (Miss World) हा किताब २०१७ साली मिळाल्यानंतर मानुषी छिल्लर (Manushi Chillar) या हरियाणाच्या मुलीचं सगळीकडे कौतुक झालं होतं. मानुषी छिल्लरला खरंतर डॉक्टर बनायचं होतं मात्र मिस वर्ल्ड झाल्यानंतर तिच्या जीवनाची दिशाच बदलली. मानुषी लवकरच अक्षय कुमारसोबत ‘पृथ्वीराज’ (Prithviraj)या चित्रपटामध्ये झळकणार आहे. चित्रपटसृष्टीमधलं हे तिचं पहिलं पाऊल आहे. आज मानुषी छिल्लरचा वाढदिवस (Manushi Chillar Birthday) आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तिचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता हे जाणून घेऊयात.

  हरियाणाच्या (Hariyana) हिसार भागात मानुषी छिल्लर एक कुचिपुडी डान्सर म्हणून प्रसिद्ध होती. मानुषीचे वडील डॉ. मित्र बासु छिल्लर एम.डी. आणि आई डॉ. मंजू बायोकेमिस्ट्रीमध्ये एम. डी. आहे. मानुषीचं शालेय शिक्षण दिल्लीच्या थॉमस स्कुलमध्ये झालं.
  मानुषी सोनीपतच्या भगत फूल सिंह सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसचं शिक्षण घेत होती. याशिवाय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधल्या कार्यशाळांमध्येही ती जायची.
  मानुषीनं २०१६ साली कॉलेजच्या एका स्पर्धेत भाग घेतला आणि ती जिंकली. त्यानंतर पुढच्याच वर्षी मिस इंडिया स्पर्धेत तिने हरियाणाचे प्रतिनिधीत्व केले. मिस इंडिया स्पर्धा तिनं जिंकली आणि एका वर्षाचा ब्रेक घेऊन तिनं मिस वर्ल्ड स्पर्धेसाठी चीन गाठलं.
  शेवटच्या फेरीत तिनं दिलेल्या उत्तरामुळे तिनं मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. तिला विचारण्यात आलं की, जगात सगळ्यात जास्त पगार कुणाला द्यायला हवा ? त्यावर मानुषी म्हणाली की, सगळ्यात जास्त पगार आईला मिळायला हवा. कारण आई आपल्या मुलांसाठी खूप गोष्टींचा त्याग करत असते. विषय फक्त सॅलरीचा नाही तर प्रेम आणि सन्मानाचा आहे.

   

  मानुषी आता ‘पृथ्वीराज’ चित्रपटाच्या माध्यमातून चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असलेला हा यशराज बॅनरचा चित्रपट ३ जूनला रिलीज होणार आहे. या चित्रपटासाठी आणि तिच्या वाढदिवसासाठी मानुषीला खूप खूप शुभेच्छा.